बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करा– जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

0
135

अमरावती:परतीचा पाऊस तसेच या अगोदर आलेल्या किडीचा प्रादूर्भाव यामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात शेती व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे निर्देश देतानाच ही मदत दिवाळीअगोदर मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील शेती पिकांची प्रत्यक्षपणे पाहणी श्री. कडू यांनी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यावेळी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाअगोदरही किडीच्या प्रादूर्भावाने शेतकरी बांधव त्रस्त झाला होता. आता शेतात खूप कष्ट करुन घाम गाळला तर, निसर्गाने दगा देऊन हाती आलेले पीक गमावले. सोयाबीन काळे पडले असून गंजीसुध्दा खराब झाली आहे. कापसाची बोंड खराब झाले असून तूरीचे सुध्दा नुकसान झाले आहे. सुरूवातीला बियाणे खराब निघाले नंतर किडीचा प्रादूर्भाव व आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.शेतपिकांच्या नुकसान भरपाईसह ज्या शेतीचा पावसामुळे पोत जाऊन नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना सुध्दा मदत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाहीही श्री. कडू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना दिली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here