सिं.राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान

0
103

बुलडाणा :जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबरच्या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान सिंदखेड राजा तालुक्यात झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात 7 महसूल मंडळे आहेत. तालुक्यात पूर्णा नदी काठच्या साठेगाव, निमगाव वायाळ, हिरवखेड पुर्णा, तढेगाव, राहेरी खु, राहेरी बु, पिंपळगाव कुंडा, ताडशिवणी, लिंगा, देवखेड, तांदुळवाडी, येथील क्षेत्र पाण्याखाली आले होते.
तसेच पाताळगंगा नदीकाठावरील सिंदखेड राजा शिवार, आलापूर, सवखेड तेजन, पळसखेड चक्का, पिंपळगाव लेंडी, या गाव शिवारात पाणी साचून जमीन देखील खरडून गेली आहे.  यामुळे पिकांचे नुकसान झाले. बेलगाव नदीकाठावरील सोयंदेव,  सोनोशी, वर्डदी, रुमना या गावांच्या शिवारात नदी दुधडी वाहून पिके पाण्याखाली गेली. त्याचप्रमाणे वाघोरा नदीकाठी बोरखेडी जलाल, तांदुळवाडी, महारखेड, पांगरखेड, हनुवतखेड येथे पावसाच्या पाण्यामुळे पिके पाण्याखाली गेली.
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा महसूल मंडळात 21 सप्टेंबर रोजी 24 तासात 96 मि.मी पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद झाली, तर साखरखेर्डा मंडळात 21 सप्टेंबर रोजीच 24 तासात 65 मि.मी, सिंदखेड राजा मंडळात 21 सप्टेंबर रोजीच 24 तासात 87.75 मि.मी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे शेंदूर्जन महसूल मंडळात 26 जून रोजी 87.75 मि.मी, 3 ऑगस्ट रोजी 82.75 मि.मी, 11 ऑगस्ट रोजी 87.25 मि.मी व 21 सप्टेंबर 2020 रोजी 73.25 मि.मी पाऊस पडला. या मंडळात चार वेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.
या चारही महसूल मंडळात एकाच दिवशी 21 सप्टेंबररोजी अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचून काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतात पाणी घुसून व एकाच दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी राहून हाती आलेल्या 59096 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या 13 मे 2015 च्या निर्णयानुसार पुर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here