शेतकऱ्यांच्या संशोधनास शास्त्रीय जोड दिल्यास कृषी विकास जलद गतीने होईल – कृषिमंत्री ना. दादाजी भुसे

0
309

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे चांगले काम करीत असून विद्यापीठांनी शेतकरी संशोधनास प्रोत्साहन देऊन प्रयोगशील शेतकरी संशोधक घडवावेत. कृषी विद्यापीठावर शेतकऱ्यांचा अतिशय विश्वास असून विद्यापीठाद्वारे शेतकरी केंद्रित संशोधन कार्य केल्या जात आहे ही आनंदाची बाब आहे. बिजोत्पादन हि काळाची गरज असून सर्व विद्यापीठांनी जास्तीत जास्त बियाण्याची निर्मिती करावी. शेतकरी हा कष्टातून शेती करीत असून दर्जेदार बियाणे, साठवणूक, कृषी माल स्वच्छता, विपणन व बाजार भाव या महत्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल या मार्गाने गेल्यास राज्यातील शेतकरी समृद्ध होइल. असे प्रतिपादन ना. दादाजी भुसे, कृषीमंत्री यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या 48 व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
शेतीमध्ये कृषी तंत्रज्ञानामुळे विकास झाला असून कृषी विद्यापीठांच्या अविरत प्रयत्नांमुळे शेतकरी समृद्ध होत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकरी व कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे करावा ज्यामुळे तंत्रज्ञान सहजपणे उपयोगात येईल. कौशल्यावर आधारित प्रशिक्षणे हि सध्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने अल्प मुदतीचे किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षणनाचे आयोजन केल्यास कुशल मनुष्यबळ कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध होईल असे प्रतिपादन मा.ना. संजयजी धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री शिक्षण माहिती व दूरसंचार यांनी केले.
संयुक्तर कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकी निमित्य अभिनंदन करतांना मा.श्री. एकनाथ डवले, कृषी सचिव महाराष्ट्र राज्य मन्हाले की जुने संशोधन कालबाह्य होते परंतु हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नवे संशोधन हि काळाची गरज आहे. संशोधनाची दिशा ठरविताना कापणी पश्चात व्यवस्थापनावर लक्ष्य द्यावे लागेल. कृषी विद्यापीठातील संशोधन केंद्रे अतिशय चांगले काम करीत असून त्यांच्या संशोधनाचे मूल्यमापन करून शासनाद्वारे सन्मानित करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्यासह देशाला उच्चप्रतीचे पिक वाण, यंत्रे- अवजारे तथा आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी तत्पर असलेल्या या राज्यस्तरीय बैठकीचे यजमानपद भूषविणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू मा. डॉ. व्ही. एम भाले यांनी स्वागताध्यक्ष पद भूषवित बैठकीचे प्रास्ताविक केले. बैठकीची सुरुवात कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. याप्रसंगी राज्यातील कृषी विद्यापीठातील निवृत्त होणाऱ्या संशोधकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला तथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ” संयुक्तय कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक 2020″ चा ऑनलाईन पद्धतीने समारोप समारंभ आज महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा प्रतिकुलपती मा. ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. या समारोप समारंभाप्रसंगी भारत सरकारच्या शिक्षण, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व मानव संसाधन विकास खात्याचे राज्यमंत्री मा.ना.ऍड.श्री संजय धोत्रे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव माननीय श्री एकनाथ डवले आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे महासंचालक मा. श्री.विश्वजीत माने यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महत्त्वाकांक्षी संशोधनात्मक बैठकीचे समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू सर्वश्री मा.डॉ. के. पी. विश्वनाथा, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, मा. डॉ. ए. एस. ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तथा मा.डॉ. एस डी सावंत कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्वच कृषी विद्यापीठचे संचालक, अधिष्ठाता,सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख विशेषत्वाने उपस्थित होते.
समारोप सत्राचे सूत्र संचालन डॉ. पं दे कृ वि अकोलाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन यजमान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर तथा यजमान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे यांचेसह सर्व संचालक, कुलसचिव आणि बैठकीचे यशस्वितेसाठी गठित विविध समिती अध्यक्ष, सहअध्यक्ष, सचिव तथा सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कृषी विद्यापीठाकडे चक्राकार पद्धतीने या महत्त्वाकांक्षी सभेचे यजमानपद यंदा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे असून पाच दिवस चाललेल्या कृषीच्या या महाकुंभात राज्यांतर्गत तथा देशपातळीवर विविध पिक वाणे, यंत्रे-अवजारे तथा संशोधनात्मक शिफारसी व तंत्रज्ञान सादरीकरण चर्चा करण्यात आली. यावर्षी चारही कृषी विद्यापीठांमधून एकूण 208 शिफारसी, 16 पिक वाण, 12 यंत्रे व अवजारे तर 180 पिक उत्पादन तंत्रज्ञान या बैठकीमध्ये सादर झाल्या. यापैकी एकूण १८३ शिफारसी, ११ पिक वाण, ८ यंत्रे व अवजारे तर १६३ पिक उत्पादन तंत्रज्ञान शिफारसी मान्य करण्यात आल्या.

Live:- https://youtu.be/3UDfumRaaVI

मंजुर करण्यात आलेल्या शिफारशीचा गोषवारा :
१. शेती पिक व पीक सुधारणा धोरण : एकुण १७ विविध पिकांबाबत संशोधन कार्याविषयी सादरीकरण केले.
२. नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन : पिक उत्पादन तंत्रज्ञान विषयक एकुण ४२ शिफारशी मंजुर करण्यात आल्या. त्यामध्ये जमिन सुपिकता व अन्नद्रव्य विषयक १६, कोरडवाहू शेती विषयक ७, बागायती पिके ११, तण व्यवस्थापण ३, एकात्मिक शेती २, कृषि वानिकी ३ इत्यादी शिफारशी मंजुर करण्यात आल्या.
३. उद्यानविद्या : फळ पिके ६, भाजीपाला पिके १ आणि मसाला पिके ४ अशा एकुण ११ शिफारशी मंजुर करण्यात आल्या.
४. पशु व मत्स्य विज्ञान : पशु व मत्स्य विज्ञान बाबत एकुण ५ शिफारशी मंजुर करण्यात आल्या.
५. मुलभुत शास्त्र अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान : वनस्पती शरीरक्रिया व अजैविक ताण व्यवस्थापण २, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान १५, गृह विज्ञान ९, काढणी पश्चात तंत्रज्ञान ६ अशा एकुण ३२ शिफारशी मंजुर करण्यात आल्या.
६. पीक संरक्षण : किड व रोग नियंत्रण विषयक एकूण ११ शिफारशी मंजुर करण्यात आल्या.
७. कृषि अभियांत्रिकी : मृद व जल संवर्धन २, कृषि प्रकिया अभियांत्रिकी ३, प्रक्षेत्र संरचना अभियांत्रिकी ४, विद्युत व इतर उर्जा १, कृषि औजारे व यंत्रे १, जल सिंचन व निचरा १६ अशा एकुण २७ शिफारशी मंजुर करण्यात आल्या.
८. सामाजिक शास्त्रे : कृषि विस्तार शिक्षण ११, कृषि अर्थशास्त्र ११ आणि सांख्यिकी शास्त्र १ अशा एकुण २३ शिफारशी मंजुर करण्यात आल्या.
९. शेती पिके वाण प्रसारण समिती : शेती पिकांच्या एकुण ९ सुधारीत वाणांची प्रसारणासाठी शिफारस करण्यात आली. त्यामध्ये भात (पीडीकेव्ही साकोली रेड राईस – १), नाचणी (दापोली -३), तुर (बीडीएन २०१३-४१), मुग (फुले चेतक), मटकी (फुले सरिता), चवळी (फुले सोनाली), हरभरा (फुले विश्वराज), भुईमुग (टीएजी-७३) या वाणांची प्रसारण करण्यासाठी शिफारस करण्यात आली.
राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत झालेल्या सहा वाणांची नोंद घेण्यात आली. त्यामध्ये गहु (फुले सात्विक), करडई (फुले निरा), करडई (फुले भिवरा), कपाशी (आय सी ए आर – सी आय सी आर – पिकेव्ही ०८१ बीटी), कपाशी (आय सी ए आर – सी आय सी आर रजत बीटी), कपाशी (पीकेव्ही हायब्रीड – २ बीजी-२), कपाशी (एन एच एच -४४ बीजी-२) या वाणांची नोंद घेण्यात आली.
१०. उद्यानविद्या पिक वाण प्रसारण समिती : फळ पिकांचे २, भाजीपाला पिकाचा १ असे ३ नविन वाण प्रसारीत करण्यासाठी मंजुर करण्यात आले. त्यामध्ये द्राक्ष्याची मांजरी मेडीका, मांजरी शामा व चवळीची पिडीकेव्ही ऋतुजा हे वाण प्रसारीत करण्यासाठी शिफारस करण्यात आली.
११. कृषि यंत्रे, औजारे प्रसारण समिती : ट्रॅक्टर चलित फुले कुट्टी यंत्र, ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमॅकेनिक नियंत्रीत ऑफसेट फळबाग व्यवस्थापन यंत्र, ट्रॅक्टर चलित फुले बंधीस्त वाफे औजार, बासाकोकृवि विकसीत नाचणी मळणी व सडणी यंत्र, पिडीकेव्ही लाखोळी दाल मिल प्लांट, पॉवर चलित काजु बी प्रतवारी यंत्र, पिडीकेव्ही जैव उष्ण वायु चक्राकार वाळवणी यंत्र, वनाकृवि सौर उर्जा चलित पक्षी/जंगली प्राणी घाबरवणारे प्रकाश किटक सापळा असे एकुण ८ कृषि औजारे व यंत्रे प्रसारीत करण्यासाठी शिफारस करण्यात आली.
१२. अजैविक आणि जैविक ताण व्यवस्थापन, नोंदणी प्रस्ताव व अपयुक्त सूक्ष्मजीव समिती : जैविक ताण व्यवस्थापणाबाबत करडई पिकाच्या दोन वाणांची मावा प्रतिकारक्षम स्त्रोत म्हणुन शिफारस करण्यात आली.
या संयुक्त बैठकीत चारही कृषि विद्यापीठांच्या एकुण १८३ शिफारशी मंजुर करण्यात आल्या असुन त्यामध्ये पिकांचे वाण ११, कृषि औजारे यंत्र ८ आणि १६३ उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी मंजुर करण्यात आल्या आहेत.

Advertisements
Previous articleमोदी सरकारला हद्दपार करण्याचा संकल्प घ्या: राणा दिलिपकुमार सानंदा ; शेतकरी व कामगार विरोधी काळया कायद्याविरोधात जिल्हा काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
Next articleबंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराजांचं निधन, मुख्यमंत्र्यांसह अनेकांची श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here