शेतकर्‍यांची दिवाळी, केंद्रीय मंत्र्यांच्या दारी.. तुपकरांच्या नेतृत्वात स्वाभिमानीची उपराजधानीत धडक !

0
607

मंगेश फरपट | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नागपूर: एकादशी हा दिवाळीचा पहिला दिवस मानल्या जातो, याच दिवशी सकाळी संविधान चौकात पणत्या पेटवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांच्या आंदोलनात्मक दिवाळीचा आरंभ केला तो, केंद्रीय मंत्र्यांच्या दारी धडक देण्याचा संकल्प घेऊन. अचानक ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते संविधान चौकात दाखल झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी विधेयकाचा विरोध तर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना किमान हे.25 हजार रुपये भरपाई मिळावी,यासाठी केंद्राने पॅकेज घोषित करावे, तसेच सोयाबीनचा भाव किमान प्रति क्वि.6000 रुपये स्थिर राहण्यासाठी केंद्राने धोरण आखावे, CCI ची तालुकानिहाय कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी चालू करावे, यासह अन्य मागण्या घेऊन उपराजधानीत महाराष्ट्रातील पहिला दिवाळीचा आंदोलनात्मक फटाका फोडण्यात आला. हा मोर्चा गडकरी वाड्याकडे आगेकुच करत असतांना, मध्येच पोलिसांनी अडवून तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली.
‘शेतकर्‍यांची दिवाळी, ना.नितीन गडकरी यांच्या दारी..’ हा नारा घेऊन. ‘गडकरी साहेब, मोदी साहेबांना शेतकर्‍यांना मदत द्यायला सांगा हो !‘ हे आर्जव घेऊन आज बुधवार 11 नोव्हेंबर रोजी नागपूर येथील संविधान चौकात सकाळी 8 वाजता पणत्या पेटविण्यात आल्या तसेच चिवडा,लाडू, ठेचा भाकरी व आकाश दिवे घेवून आंदोलना सुरुवात झाली. शेतकर्‍यांना हेक्टरी किमान 25 हजार रूपये नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने भरीव पॅकेज घोषीत करावे, हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुका सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, सोयाबीनचा प्रतिक्विंटल किमान 6 हजार रूपये हमीभाव स्थिर करण्यासाठी केंद्राने धोरण आखावे, पीक विमा कंपन्यांना शेतकर्‍यांना विमा देण्यासाठी केंद्र सरकारने बाध्य करावे व केंद्राने आणलेले कृषी बील हे रद्द करावे.. या प्रमुख मागण्या घेऊन रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचा आरंभ झाला.
यावेळी विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या समवेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. आपला लढा हा कुण्या व्यक्ती विरोधात नसून राज्यकर्त्यांना जाग आणण्यासाठी आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन आरंभीच तुपकर यांनी केले होते. “गडकरी साहेब मोदींना जागे करा जागे करा..”, “मोदी सरकार हाय हाय..”, दादागिरी नाही चलेगी, “मोदी सरकार होश मे आयो..” अशा प्रचंड घोषणा देत देत ही रॅली गडकरी वाड्याकडे आगेकूच करत असतांना मध्येच पोलिसांनी रॅली थांबवली दरम्यान रविकांत तुपकरांची व पोलिस अधिकाऱ्यांची चांगलीच बाचाबाची झाली. ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाल्याने वातावरण तापले होते. आम्ही नितीनजी गडकरी यांच्याकडे दिवाळीचा फराळ घेऊन चाललेलो असल्यामुळे आम्हाला जावू द्या व आमच्या मागण्या त्यांच्या कानावर पोहोचविण्यासाठी आम्ही जाणारच, अशी भुमिका तुपकर यांनी घेतली.तुपकरांची आक्रमक भूमिका पाहून पोलीसही चक्रावून गेले. महाराष्ट्रात विविध पक्षांतर्फे वेगवेगळी आंदोलने सुरू असतांना त्यांना अटकाव केल्या जात नाही, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचेच आंदोलन का दडपता हा प्रश्न तुपकरांनी केला. पोलिसांनी अटकेची सुरवात करताच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी अचानक राष्ट्रगीत चालू केल्याने पोलिसांनाही “सावधान” च्या स्थितीत उभे राहून काही काळ अटकेसाठी थांबावे लागले. मात्र पोलिस त्यांच्या भुमिकेवर ठाम राहिल्याने पोलिस व्हॅनमध्ये आंदोलकांना जबरदस्तीने डांबून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
या आंदोलनात रविकांत तुपकरांसमवेत दामोदर इंगोले,राणा चंदन, अमित अढावू, ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, दयाल राऊत,रवी पडोळे,प्रवीण मोहोळ, अंकुश कडू, बालाजी मोरे, अमोल राऊत, पवन देशमुख, शे.रफिक शे.करीम, नितीन राजपूत, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम, राजेश गवई, दत्ता पाटील, विजय बोराडे, सहदेव लाड, सचिन शिंगोटे, आकाश माळोदे, राम अंभोरे, दत्ता जेऊघाले, रामेश्वर पवार, प्रफुल्ल देशमुख, अतिष पळसकर, सुधाकर तायडे, रशिद पटेल, हरी उंबरहंडे, संतोष तेह्वाकर, सोपान खंडारे, उमेश राजपूत, संकेत दुरूगकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
सकाळीच 8 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल इलेक्ट्रॉनिक मिडियाने लाईव्ह घेतल्याने प्रशासनही खळबळून जागे झाले. ‘शेतकर्‍यांची दिवाळी केंद्रीय मंत्र्यांच्या दारी ‘ हे आंदोलन चांगलेच आंदोलनात्मक फटाके फोडणारे ठरले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी गडकरी साहेबांनी पुढाकार घ्यावा
नितीनजी गडकरी यांचे केंद्र सरकार मध्ये मोठे वजन आहे. मोदी साहेब त्यांचा शब्द टाळूच शकत नाही. त्यामुळे गडकरींनी मोदींना जागे करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे. महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोदींनाही मते दिली आहेत. त्यामुळे मोदी सरकारने महाराष्ट्रातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी,अशी मागणी तुपकरांनी केली. पोलिसांनी आमचे आंदोलन दडपण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे. आज महात्मा गांधींच्या मार्गाने आलो मात्र यानंतर शहीद भगत सिंहांच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा सज्जड इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला.

Advertisements
Previous articleएसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी
Next articleपेरणी यंत्र उलटून मजूर जागीच ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here