सोमवारपासून मंदिरे उघडणार! गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हीच’श्रीं’ ची इच्छा समजा! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
2855

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरे मार्च महिन्यापासून पूर्णपणे बंद होती. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून मंदिरे उघडणार असल्याची घोषणा केली. मात्र गर्दी टाळून स्वतः बरोबर इतरांचेही रक्षण करा, हा फक्त सरकारी आदेश नसून ही ‘श्रीं’ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.
तसंच, ‘लॉकडाउनच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा’, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळेही उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील. देवाच्या दर्शनासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही हे लक्षात घ्यायला हवे. भक्तांच्या भावनेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisements
Previous articleसीसीआय कापूस खरेदीचा 15 नोव्हेंबरपासून शुभारंभ
Next articleबुलढाण्यात मॉलला आग; इलेक्ट्रॉनिक दुकान जळून खाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here