आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही; घरबसल्या करता येईल नोंद

0
150

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

पुणे: वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर ( एकुमा ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे अशा सहा प्रकाराच्या नोंदींसाठी आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. घरबसल्या या नोंदी करणे शक्‍य झाले आहे. कारण महसुल विभागाने त्यासाठी ई हक्क प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महसूल विभागाकडून यापूर्वीच डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे,तर सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाऊ लागू नये,यासाठी डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उपलब्ध करून दिला आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे कोणत्याही छोट्या कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात गाठावे लागू नये,यासाठी महसूल विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार शासनाने वारसनोंद,कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदींसाठी ई हक्क प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
● काय आहे ही प्रणाली

एकादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी यापूर्वी तलाठी कार्यालयात जावे लागत होते. आता नागरिकांना महाभुमी या संकेतस्थळावर अथवा pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगीन करून ऑनलाईन अर्ज केला,तरी हे काम होणार आहे. तुम्ही केलेला ऑनलाईन अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल तलाठी या अर्जांची ऑनलाईन पडताळणी करतील कागदपत्रे अपूर्ण असेल तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. *सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तलाठी त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार आहे. आतापर्यंत अशा प्रकारे एक हजार 200 नागरीकांनी त्याचा फायदा घेतला आहे.*
● बॅंकांना अशा प्रकारे होणार फायदा – शेतकरी अनेकदा शेतीपीक अथवा उद्योग व्यवसायासाठी बॅंकांकडून कर्ज घेतात. त्यासाठी घर अथवा जमिनी गहाण ठेवताता. *कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनींवर बोजा चढविणे अथवा कर्ज फेडल्यानंतर तो बोजा काढून घेण्यासाठी बॅंका व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो.* तो आता या सुविधेमुळे कमी होणार आहे. *’इ- हक्क’* ही प्रणाली महसूल विभागाने बॅंकांना देखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे अथवा काढण्यासाठी बॅंकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे.

ई हक्क प्रणाली सुविधेचा लाभ घ्या: तहसीलदार चव्हाण
वारसनोंद, बॅंकांचा बोजा चढवणे अथवा उतरविणे यासारख्या गोष्टींसाठी नागरीकांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच ही कामे घरबसल्या मार्गी लागावीत,यासाठी महसूल विभागाने इ हक्क प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. *त्याचा नागरीकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा.-निलप्रसाद चव्हाण ( तहसीलदार, कुळकायदा शाखा )*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here