ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या!

0
626

व-हाड दूत न्युज नेटवर्क
चंद्रपूर: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात तथा आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्या विकास आमटे यांच्या कन्या होत्या. त्यांनी आज सकाळीच ‘वॉर अ‍ॅन्ड पीस’ अर्थात युद्ध आणि शांतता असं सूचक कॅप्शन ट्विटमध्ये नमुद करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. शितल आमटे करजगी यांच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले आहे. त्यांनी आनंदवन येथील घरात विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती येत आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

वैद्यकीय सेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन करणं असो की आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं असो, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे असो, ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचं डिजिटलाझेशन असो किंवा मियावाकी पद्धतीने चार जंगलं वसण्याचं पर्यावरणीय योगदान असो, आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर शीतल आमटे, सशक्तपणे पुढे चालवत होत्या.

ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणं, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचं होतं. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्टया खेडयांनाच सक्षम करणारा हा उपक्रम असून सौर ऊर्जा, ‘हेल्थ एटीएम’, उपक्रमशीलतेला या स्मार्ट व्हिलेजमध्ये स्थान असेल. त्याचबरोबर अपंगांसाठी ‘निजबल’, बेरोजगार तरुणांसाठी ‘युवाग्राम’ या प्रकल्पाबरोबरच ‘मियावाकी’ पद्धतीने चार जंगले वसवत पर्यावरण रक्षणाचाही विडा त्यांनी उचलला होता.
आजोबा बाबा आमटे, आईवडील विकास-भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीने डॉ. शीतल यांनी 2003 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन त्या करत होत्या. वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च 2016 मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. पुढे अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला होता. मेडिकल लीडरशिप क्षेत्रात कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी’ सोबत ‘मशाल’ आणि ‘चिराग’ असे दोन कार्यक्रम सुरू केले.
दरम्यान शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं.
शीतल आमटे यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचं या चौघांनी म्हटलं होतं. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला होता. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली होती. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाटयावर आले होते. आज डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. शीतल यांनी आत्महत्येपूर्वी ‘वॉर अँड पीस’ या आशयाची पेंटिंग काढून ट्विटर वर शेअर केली होती. 

#drsheetalamte #WarAndPeace #acrylic #Anandvan #Chandrapur #Maharashtra

Advertisements
Previous articleआमदार रोहित पवार यांनी घेतली शेळके परिवाराची भेट
Next articleशिक्षक मतदारसंघ निवडणूक; अकोल्यात 12 केंद्रावर होणार मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here