शकुंतला इतिहास जमा करणे षड्यंत्र की संयोग !

0
164

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

मुर्तिजापूर: मुर्तिजापूर-यवतमाळ–अचलपूर या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या खर्चातील ५० टक्के वाटा राज्य शासनाने उचलण्याबाबत रेल्वे मंत्रालयाने पत्रव्यवहार करूनही कुठल्याही हालचाली होत नसल्याने ‘शकुंतला’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वेचे रूपडे केव्हा पालटणार हा प्रश्न कायम आहे. सद्यस्थितीत तर रुपडे पालटण्या ऐवजी अस्तित्वावरच घाला घालण्यात आला आहे. हा मार्ग इतिहास जमा करण्याच्या हालचाली गेल्या अनेक वर्षापासून सुरू झाल्या होत्या. म्हणून सदर प्रकारास षडयंत्र म्हणावे कि संयोग ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कारण या प्रकाराला मुर्तीजापुर दारव्हा मार्गे पुसद जाणारी शकुंतला रेल्वेच्या फेऱ्या बंद करून हळूच प्रारंभ करण्यात आला होता असे जाणकारांचे म्हणणे आहे. मुर्तीजापुर येथून दारव्हा मार्गे पुसद जाणारी शकुंतला रेल्वेच्या फेऱ्या बंद करण्यात येऊन त्या फेऱ्या का बंद करण्यात आल्या ? याबाबत सर्वसामान्यांना काहीच कळू देण्यात आले नाही. त्या मार्गाचे काय झाले हे गेल्या कित्येक वर्षापासून रेल्वे विभागाने व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कळूच दिले नाही. विशेष बाब म्हणजे मुर्तिजापूर– दारव्हा ते पुसद सुरू असलेल्या शकुंतलेच्या फेर्‍या बंद झाल्यावर देखील त्या भागातील लोकप्रतिनिधी तसेच राजकीय वलय असलेल्यांनी कुठलाही आवाज उचलला नाही.कुठलीही हालचाल केली नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच सदर प्रकार षडयंत्र कि संयोग असल्याचे म्हटल्या जात आहे.शकुंतला इतिहास जमा करणे षड्यंत्र की संयोग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here