मनातलं बोला…

0
369

व-हाड दूत विशेष
कुष्ठरुग्णांच्या आयुष्यात जगण्याची उमेद पेरणा-या वरोरा येथील आनंदवनात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं गुढ अजूनही कायमच आहे. सर्व सामान्यांना भेडसावणा-या समस्यांप्रमाणे त्यांना कदाचित कोणती अडचणही नसेल मग त्यांनी आत्महत्या का केली. असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होताहेत.
डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या चर्चेला पुर्णविरामही मिळाला नाही तोच बुलडाणा शहरातील बालसुधार गृहातील दोन विधी संघर्षग्रस्त मुलांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याने समाजमन हादरून गेले आहे. यापूर्वी सुद्धा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने जून महिन्यात आत्महत्या केली. ह्या सर्व आत्महत्या नैराश्यातून झाल्या असाव्यात असा कयास बांधल्या जातोय. कारण कुठलेही असो या जगातून अचानक एखाद्या व्यक्तीने निघून जाणे ही धक्कादायकच बाब होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, नैराश्य हे जगातील मृत्यूच्या वीस कारणांपैकी महत्त्वाचे कारण आहे. याच कारणामुळे दरवर्षी जगभारत आठ लाख व्यक्तींच्या आत्महत्या होताहेत. अलीकडे १५ ते २९ या वयोगटामध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. जगातील ७९ टक्के आत्महत्या या कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये होत आहेत. एका आकडेवारीनुसार जगात 40 सेकंदाला एक जण जीवन संपवत आहे. गेल्या 50 वर्षात भारतातील आत्महत्यांचे प्रमाण दीड पटीने वाढले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दर दिवसाला 2 पेक्षा अधिक आत्महत्या होत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. फाशी घेणे, किटकनाशकांचे इंजेक्शन घेणे, जाळून घेणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी जीवन संपवले जाते, असेही निरीक्षणही ‘डब्ल्यूएचओ’ने नोंदविले आहे. महाराष्ट्रानंतर केरळ, तामिळनाडू राज्यातही आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. कुणाची पत्नी माहेरी गेली म्हणून आत्महत्या, कुणी पतीने सोडून दिले म्हणून आत्महत्या, ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेवून दिला नाही म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या, तर मालकाने झापले म्हणून अभियंत्याची नैराश्यातून आत्महत्या, नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतक-याची आत्महत्या. आजारपणामुळे आजोबाची आत्महत्या. नोकरी नाही म्हणून सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या, अशाप्रकारच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. रोज कुठे ना कुठे, कुणी ना कुणी आत्महत्या केल्याचे कानावर येतेच.
तीव्र व घोर निराशा, हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण आहे. मग हे कसे टाळता येईल. यावरही सोशल मिडियाच्या माध्यमातून खुल्या चर्चा होण्याची गरज आहे. जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात शासनाने आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी आत्महत्या प्रतिबंध पथक कार्यान्वीत केले आहे. मात्र या पथकाकडूनही 10 सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध दिन सोडला तर फारशी जनजागृती किंवा उपाययोजना इतर वेळी करतांना दिसल्या नाहीत, ही खेदाची बाब आहे. असो, शासन आपल्या परीने प्रयत्न करीतच आहे. सोबत सामाजिक संघटनांही या गंभिर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून आत्महत्येचे प्रमाण कमी करता येईल. या विषयाला समाजानेही आता गंभिरतेने घेण्याची गरज आहे.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, मनाच्या तात्कालिक अवस्थेवर विजय मिळवला तर आत्महत्या रोखली जाऊ शकते. त्यासाठी असे विचार मनात येणाऱ्यांनी आपल्या विश्वासू व अत्यंत जवळच्यांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे, त्यांच्यासमोर व्यक्त झाले पाहिजे. अर्थात, अशी व्यक्ती पूर्वग्रहदुषित व अनार्थ न करणारी आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. मनातंल बोलण्यासाठी आता कुणी व्यक्तीच पाहिजे असे नाही. आपण सोशल मिडियाच्या माध्यमातूनही व्यक्त होवू शकतो. आपल्या मनावरील ताण कमी करू शकतो. यामधूनही आपल्याला आपल्या समस्येवर उपाय मिळू शकतो. त्यामुळे गरज आहे फक्त ती व्यक्त होण्याची. आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देण्याची. नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. प्रश्न कितीही बिकट असो, त्यावर उत्तर हे निश्चितच आहे. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. शेवटी एकच सांगते..

आयुष्य इतकं स्वस्त आहे का,
की जे क्षणात संपवता यावं…
कोणताही विचार न करता आपण
या खेळातून निघून जावं… 

सौ. अर्चना योगेश फरपट
(संपादक, व-हाड दूत)

या विषयावर आपल्याही प्रतिक्रिया आम्हाला पाठवा. ई-मेल – editor@varhaddoot.com

Advertisements
Previous articleमाय लेकाने धारदार शस्त्राने केली पित्याची हत्या
Next articleमहामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्डयात पडल्याने इसम गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here