खातं कायं बे? शेगाव कचोरी ! 

0
366

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव: खमंग आणि खुशखुशीत कचोरी सोबत मिठ लावून तळलेली हिरवी मिरची. . सुटलं ना तोंडाला पाणी! विदर्भच काय?  विदेशातही शेगाव कचोरीने खवय्यांना भुरळ पडली आहे. शेगाव ही विदर्भपंढरी. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या वास्तव्याने पुनीत असलेली संतनगरी. दररोज लाखो भाविकांची ये-जा अनुभवणार शहर. याच शेगावात आल्यानंतर येथील प्रसिध्द अशी ‘शेगाव कचोरी’ खाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो.
तिरथराम शर्मा यांच्या वारसांकडून आजही खास मसाल्याची रेसीपी असलेली ही कचोरी बनवली जाते. त्यामुळे ती दिसताच ‘ खातं कायं बे? शेगाव कचोरी !’ हा प्रश्न हमखास एकमेकांना विचारल्याच जातो. ही कचोरी खाल्याशिवाय अनेकांचा नाश्ता देखील होत नाही.
शर्माजींच्या या कचोरीची परंपरा खुप जुनी आहे. ही चव लोकांना कळली ती शेगावतल्या रेल्वे स्थानकावर. तिरथराम करमचंद शर्मा हे मुळचे लाहोरचे. स्वातंत्र्यानंतर हे शहर पाकिस्तानात गेले. दरम्यान फाळणीच्या सुमारास तिरथराम हे लाहोर सोडून अमृतसरमध्ये आले. तेथेही त्यांनी कचोरीचा व्यवसाय सुरु केला. तेथून पुढे मुंबईत आणि नंतर ते शेगावात ते स्थाईक झाले. रेल्वे स्टेशनवरील कॅन्टीनच टेंडर निघलं आणि शेगावाच्या कचोरीला जगमान्यता मिळण्याचा प्रवास सुरु झाला. आज चवथ्या पिढीतही कचोरीचा व्यवसाय सुरु आहे. तिरथराम करमचंद शर्मा शेगाव कचोरी सेंटर या नावाचा ब्रॅण्ड तयार झाला. आयएसओ मानांकनही याला प्राप्त झाले आहे. दर्जेदार बेसन आणि मैद्याच्या वापराबरोबरच कचोरी बनवताना एका विशिष्ट प्रकारचा मसाला ते आजवर वापरत आले आहेत. परिणामी कचोरीचा दर्जा टिकून राहिला. मिरची, अद्रक, लसुन एकजीव करुन तो उत्तमप्रतीच्या तेलातून तळून काढल्या जातो. त्यानंतर त्यात शर्मांच्या घरीच तयार होणारा परंपरागत मसाला मिसळला जातो. नंतर बेसन टाकून ते मिश्रण आणि अन्य पदार्थ एकत्र केले जातात. सर्वात महत्वाच म्हणजे मसाला तयार करतांना त्यात महाराजांचा आशिर्वाद असतोच असही भुपेश शर्मा यांनी प्रक्रियेत सांगितल आहे. शेगावच काय तर बुलडाणा, नागपूर, औरंगाबाद, यवतमाळ, नाशिक यासह अन्य मेट्रो सिटीमध्येही शर्मा भावंडाची दुकानं आहे. वैशिष्ट्ये म्हणजे या सर्व दुकानांमध्ये लागणार मसाला शेगावमध्ये याच कुटूंबात तयार होतो. त्यामुळे एकच चव सर्व ठिकाणी सारखी असते. बुलडाण्यात दहा रुपयात तिन कचोरी मिळतात. तर शेगावात सहा रुपयाला एक कचोरी मिळते. कचोरी सॅण्डवीच, चीज कचोरी, मिक्सेज कचोरी, जैन कचोरी अशी वेगळी रुपही या कचोरीची शेगावात पहायला मिळतात. शर्मा कुटूंबीयातील चवथ्या पिढीने या संबधी लज्जत आणि आधुनिकता याची सांगड घातली आहे. समृध्द अशा साडेसहा दशकांची परंपरा या कचोरीला लाभली आहे.
पाकिस्तान आणि जपानचा प्रवास या कचोरीने आधीच केला आहे. आता फ्रोझोन कचोरी महिनाभरापेक्षा अधिक काळ फ्रिजमध्ये टिकत असल्याने कॅनडा आणि युएसएमध्येही ही पोहचत आहे. त्यामुळे शेगाव अन् कचोरी ही वेगळी ओळख देखील आहे. त्यामुळे शेगावला दर्शनासाठी गेल्यावर पाऊल आपोआपच कचोरीच दुकान शोधु लागतात. आणि सहजच खातं कायं बे? शेगाव कचोरी !  हे शब्द आपसुकच एकमेकांकडे पाहून तोंडातून बाहेर पडतात.

Advertisements
Previous articleआधी निघालेले आरक्षण रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड
Next articleट्रक नदीत कोसळला , एकाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here