‘रक्तदान करुन जपली बांधिलकी’ जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

0
130

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला : शासकीय सेवेत काम करणारे जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज येथे रक्तदान करुन जिल्ह्यातील जनतेशी असलेली बांधिलकी जपली. येथील ऑफिसर्स क्लब मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.
येथील ऑफिसर्स क्लब मध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी ऑफिसर्स क्लबला ५० वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून आज जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते. त्यांचे समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, तहसिलदार विजय लोखंडे, ऑफिसर्स क्लबचे सह सचिव रमेशप्रसाद अवस्थी, डॉ. अशोक भोपळे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पापळकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व सुदृढ नागरिकांचे कर्तव्य आहे की त्यांनी स्वेच्छेने रक्तदान करावे. याच भावनेने जिल्हा प्रशासनातील अधिकारी रक्तदान करुन आपला सेवाभाव व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, तहसिलदार विजय लोखंडे या अधिकाऱ्यांनी रक्तदान करुन या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर दिवसभर हे शिबिर सुरु होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी तर आभार प्रदर्शन रमेशप्रसाद अवस्थी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here