नोकरीवरून काढल्याने वाढदिवशीच केला व्यावसायिकाचा गेम

0
241

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: गिट्टी खदानच्या व्यावसायीकाची हत्या टिप्परचालकाला नोकरीवरून काढल्याने झाली असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी टिप्परचालकासह त्याच्या तीन मित्रांना अटक केली आहे.
२६ डिसेंबररोजी राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी परिसरात अप्पू पॉइंट जवळ गिट्टी खदान व्यावसायीक गोपाल अग्रवाल (45) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.  या हत्येचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसात समोर आणले. जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून याबाबतची माहिती दिली. संजय स्टोन क्रशर मध्ये पर्यवेक्षक असलेले राजेश भांगे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 26 डिसेंबरच्या रात्री स्टोन क्रेशरचे मालक संजय अग्रवाल यांचे चुलत भाऊ गोपाल अग्रवाल (45) मोटरसायकलने बोरगांववरून अकोला येत होते. एमआयडीसी अप्पू पॉइंट जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन अपरिचित व्यक्तींनी गोपाल अग्रवाल यांच्यावर गोळी झाडली व त्यांची हत्या करून 1 लाख 50 हजार रूपये असलेली बॅग हिसकावून पलायन केले. स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली. यामध्ये मुख्य आरोपी सागर कोठाळे हा संजय अग्रवाल यांच्या स्टोन क्रेशर मध्ये टिप्पर ड्रायवर चे काम करीत होता. जवळपास दोन महिन्यापूर्वी संजय अग्रवाल यांचे चुलत भाऊ मृतक गोपाल अग्रवाल यांनी त्यांना काही कारणाने नोकरीवरून काढून टाकले. हा राग मनात ठेवून सागरने गोपाल अग्रवाल यांच्यावर बंदुकीची गोळी झाडली. याप्रकरणी आरोपीला विजय राठोड़ रा. कातखेडा, लखन राठोड़ रा. कुंभारी जि. अकोला, रणधीर मोरे रा. राहुल नगर, शिवणी अकोला या तीन मित्रांनी मदत केली.
त्या दिवसापासून पाहत होता वाट!
नोकरीवरून काढल्याच्या दिवसापासून गोपाल अग्रवाल यांची हत्या करण्याचे सागर कोठाळे याने मनात ठरवले होते. गोपाल अग्रवाल यांच्या वाढदिवसाला सागर कोठाळे याने अग्रवाल यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देखील दिल्या. त्यानंतर याच दिवशी गेम करायचा ठरवले. अखेर वाढदिवसाच्या दिवशीच मोटारसायकलवरून घरी जात असतांना मित्रांच्या सहाय्याने गोपाल अग्रवाल यांची हत्या करण्यात आली.
अशी घटली घटना
गोपाल अग्रवाल संजय स्टोन क्रेशर चे सुपरवायजर राजेश भांगे यांच्यासोबत 1 लाख 50 हजार रू. ची रकम घेऊन मोटरसायकलने डबलसीट अकोलाच्या दिशेने निघाले. त्यानुसार अप्पू टी­-पॉइंट जवळ सागर कोठाळे याने गोपाल अग्रवाल यांच्यावर मागून गोळी झाडली. यावेळी राजेश भांगे मोटरसायकल चालवित होते आणि गोपाल अग्रवाल मागे बसले होते. मोटरसायकल सोडून गोपाल अग्रवाल आणि राजेश भांगे तेथून जिवाच्या आकांताने पळाले, कसातरी राजेश भांगे याने आपला जीव वाचविला. परंतु आरोपींना गोपाल अग्रवाल यांनाच लक्ष्य करायचे होते.

Advertisements
Previous articleज्ञानगंगा अभयारण्यात रानगवा पर्यटकांचे वेधतोय लक्ष
Next articleजुन्या वादातून दिराने केला भावजयीचा खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here