व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील पळशी खुर्द येथे गावपुढार्यांनी ग्रामविकासासाठी पुढाकार घेतल्याने ग्रामपंचायतच्या सात सदस्यपदांसाठी केवळ सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे येथे निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता मावळल्याचे चित्र असून पळशी खुर्द हि जिल्ह्यातील पहिली अविरोध ग्राम पंचायत म्हणून समोर आली आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत प्रसिद्धी दिल्यानंतर निवडणुक अविरोध झाल्याचे घोषित केले जाणार आहे.
खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द या गावाची मतदारसंख्या एक हजार 247 इतकी असून येथे तीन प्रभाग आहेत. त्यामध्ये सात सदस्यसंख्या आहे. प्रभागनिहाय आरक्षणानुसार बुधवारी दि. 29 डिसें.रोजी पळशी खुर्द येथील सात उमदेवारांनी अर्ज दाखल केले. त्यात प्रभाग 1 मध्ये कस्तुरी संदीप वाकोडे, एससी महिला राखीव, संजय नामदेव धनोकार, सर्वसाधारण, रूपाली आशिष खोंदिल नामाप्र स्त्री, प्रभाग 2 मध्ये अविनाश गजानन आढाव नामाप्र, चंद्रकला रामचंद्र डोंगरे एससी महिला, प्रभाग 3 मध्ये रामभाऊ संपत वाकोडे एससी राखीव, सुकेशनी दिपक इंगळे सर्वसाधारण स्त्री, असे सात सदस्यांचे अर्ज दाखल झाले. हा आदर्श परिसरातील गावांमधील गावपुढार्यांनी घेण्यासारखा असल्याचे पळशी खुर्द या गावातील पुढार्यांनी दाखवून दिले आहे.