घे, शरीरच हवंय ना तुला माझं…!

0
544

व-हाड दूत विशेष

जीव गुदमरतो माझा वासनांध तुझ्या मिठीत. नको तुझा तो जीव घेणा वासनांध स्पर्श. मलाही आवडेल तो स्पर्श, बघ जमते का तुला प्रांजळ प्रेम करणे, अलगद हात धरणे, हितगुज करणे, भविष्याची, सुख-दुःखाची चर्चा करणे, निखळ मैत्री करणे.
भावनांची लगट असावी पण तू ना फक्त शारीरिक लगट अपेक्षित धरतो. मलाही वाटते शरीर सुख घ्यावं आणि….आणि तो माझ्या शारीरिक गरजेचा एक भाग सुद्धा आहे. मलाही त्याची आवड आहे. पण तुझ्या प्रेमाचा केंद्रबिंदू फक्त माझ्याकडून शरीर सुख. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र तुझ्या थोडक्या गप्पांचा आणि हालचालींचा शेवट त्या वासनांध शरीरसुखावर येऊन होतो. पशूप्रमाणे तुझी वागणूक खरोखर मला पत्नी म्हणून आवडत नाही हे ही तुला कळत नाही.
मोबाईलमधील त्या ओकारी आणणार्‍या किळसवाण्या अश्लील चित्रफिती तू जेव्हा बळजबरीने दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो ना तेव्हा अक्षरश: कीव येते तुझ्या वागण्याची. खरंतर आता एका अपत्यानंतर मी पूर्ण स्त्री आहे हे परत सिद्ध करायची गरज वाटत नाही.
मी गृहिणी जरी असती तरी तुला याबाबत इतका वेळ दिला नसता. तू भीती दाखवतो मला उंबरठा चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे तुझे हाल होईल. पण मी त्याही स्थितीत आनंदी असेल. प्रणय सुख वेगळं असतं आणि शारीरिक लचके तोडणे वेगळे. अरे नैसर्गिक जे घडतं ना तेच फळं उत्तम असतं. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे ऋतू जसे बहरत जातात तसे नैसर्गिक प्रेम बहरत जावे, हे तुला या जन्मातही कळणार नाही. तुझ्यासारख्या असंख्य कामुक माद्या आहेत, ज्या तुझ्यासारख्या नराला दिवसरात्र शोधत असतात. त्यांचही डोकं तुझ्यासारखेच वासनांध युगात बुडालेले असते.
अध्यात्म, साहित्य, पर्यटन या सारख्या असंख्य मानवी गोष्ट आहेत या जगात, ज्यांच्या तू खूप दूर आहेस. भावनाप्रधान चित्रपट बघायचे तर तुला नकोच आहेत पण अश्लिलतेने बरबटलेले चित्रपट तुझ्या प्रथम पसंतीचे असतात. स्त्रीच्या शरीर ठेवणीवरुन तिची सुंदरता ठरविणारा तू काय वेगळे अपेक्षित करणार?
मला तर भीती वाटायला लागली आहे. जर मला अर्धांगवायूचा झटका आला किंवा एखाद्या अपघातात जर माझे हे सुंदर रुप आणि शरीर पंगु झाले तर….? असे असंख्य प्रश्न माझ्या जनावरासारख्या मृत पावलेल्या शरीराचे लचके तोडणार्‍या गिधाडाप्रमाणे मला तोडत असतात. घटस्फोट घेतला ही असता आणि आपली वाट वेगळी निवडली असती. पण आणखी एक वाईट विचार पिंडाला शिवणार्‍या कावळ्यासारखा मनाला शिवून जातो तो म्हणजे दुसराही जर तुझ्यासारखाच मिळाला तर ? माझ्या शरीराचे उर्वरित लचके तोडायला मी आणखी एका नराधमाची निवड केली असे होईल.
मी कायद्याची पाईक चाकर असूनही स्वतःला न्याय मिळवून देण्यास असमर्थ आहे. कारण या समाजाचा अघोरी कायदा दुर्दैवाने एकविसाव्या शतकातही खूप जटील आहे.
माहेरी याबाबत बोलणे म्हणजे स्वतःच स्वतःच्या शरीराचा परत लिलाव करुन घेणे होय. मैत्रिणी म्हणतात तू आधुनिक काळात जगत नाहिस. तुझे विचार बुरसटलेले आहेत. मग मी बालवाडीत असल्याप्रमाणे त्याचे प्रगत विचार ऐकते. ते विचार मला रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरण्याचे, बेछूट वागण्याचे, नियंत्रण जाईपर्यंत मद्य प्राशन करण्याचे, अंग भरपूर दिसेल ज्यामुळे आंबटशौकिन पुरुष मागे लागतील असे कपडे घालण्याचे, साबणाच्या जाहिरातीत दिसणार त्याप्रमाणे बाळाची आई दिसत नसण्याचे, विक्षिप्त कामक्रीडा करुन त्याचे चित्रीकरण करण्याचे ते सल्ले असतात. त्यानंतर त्या माझी आणि आधुनिक जगाची सांगड घातली जाईल याची हमी वजा खात्री देतात.
मी मुंबईत जन्माला आली येथे शिकली, लहानाची मोठी झाली आणि वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी विवाहित झाली. तरी माझ्या विचाराला अशी आधुनिकता कधीच शिवली नाही रे. साधे तुझ्या मित्रासोबत मला अनावश्यक कधी बोलावेसे वाटत नाही.
फ्लड, अफेअर्स, लिव इन रिलेशन, बाँय फ्रेंड, एक्स्ट्रा मँरिट्युअल अफेअर मला आवडत नाही. माझेही मित्र आहेत ना पण त्यांना माझ्या स्वभावाबाबत ठाऊक आहे त्यामुळे ते सर्व मर्यादा पाळून असतात. मला कधीच त्यांचा नंबर दुसर्‍या नावाने सेव्ह करावा लागत नाही. स्पिकर आँन करुन मी कोणासमोरही बोलू शकते, एवढी स्पष्टता आहे आमच्यात.
असो पण तुझ्या मनाच्या बंदद्वाराला मी हत्तीसारखी धडक देऊन तोडू शकत नाही, खरंतर याबाबत तुझ्यासोबत मी टिकाव धरू इच्छित नाही. तरीही मी आनंदी आहे कारण तुला मी माझ्या शरीराचा ताबा दिला आहे. माझ्या स्वच्छंदी मनाचा नाही. त्याचा कालही, आजही आणि उद्याही मीच मालक आहे, तू (नवरा) नाही.

संजय कमल अशोक
पत्रकार
दैनिक मातृभूमि, अकोला
7378336699

Advertisements
Previous articleधांडेंच्या निवडीने सकारात्मक लेखणीचा सन्मान
Next articleउभ्या ट्रकला कार भिडली; एकाच कुटुंबातील तिघे ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here