बंदिस्त पान: अविस्मरणीय महाबळेश्वर

0
140

मंगळवार म्हणजे चंगळवार ! समजले नाही ना ? अहो, ह्यांच्या दुकानाला सुट्टी आणि गंमत म्हणजे स्वयंपाकाला शॉर्ट कट असायचा. कारण आमचे मोठे दिर मस्त चटकदार कांदा भजी,वडा व पाव , भरपूर अगदी गरमा गरम आम्हा सर्वांसाठी घेऊन यायचे . मग काय मस्त ताव मारायचा! त्या दिवशी आम्ही दोघी जावा घर आवरत पितळेची भांडी घासून ठेवत असू. मला स्वच्छतेची पहिल्यापासून आवड होतीच. आता सोबत जाऊ होती. आमचे छान जमायचे. त्यामुळे तो दिवस घरासाठी राखून ठेवलेला असायचा. मात्र संध्याकाळी मग फिरायला जायचे. माझे मोठे दीर व जाऊ मानाने मोठे मात्र आमच्यात मैत्रियुक्त वातावरण होते. त्यामुळे त्यांचे कधीही कोणते दडपण वाटले नाही.आम्ही नेहमीच चेष्ठा मस्करी करत. मी सासरी आहे की माहेरी हे कळत नव्हते .कारण माहेरी वातावरण खूप कडक होते. संध्याकाळी निवांत बसलो की सासरे स्वतः म्हणायचे की,दोघी जावा जरा फिरून या.आता फिरून या म्हणजे नक्की काय तर राजवाडयावर म्हणजे सातारची चोपाटी जाऊन काही तरी खाऊन या ! बापरे , येथे सगळे काही विरुद्ध होते. कारण पुण्यात राहून कधीही कामाशिवाय आम्ही बाहेर जात नव्हतो आणि येथे सगळे बिनधास्त .वाह ! माझे नशीब चांगले असे म्हणायचे दुसरे काय ? फक्त सासूबाई थोडया कडक स्वभावाच्या होत्या. मात्र त्यांचे देखील विचार आधुनिक होते.एकदा आमच्या घरातील सर्व जण नाशिकला त्यांच्या मामाच्या लग्नाला गेले होते. म्हणजे आता फक्त आम्ही दोघेच घरात पण….. काय सांगू तुम्हाला, सकाळी लवकर उठून स्वयंपाक करणे, घरातील आवरा आवर करून मी दिरांच्या इलेक्ट्रिकच्या दुकानात बसायला जात असे. एक गडी होता मी पैसे घेण्याचे काम करायची व ते त्यांच्या दुकानात जणू आमचा बाघबान झाला होते मी येथे तो तेथे असे काही.असो ! दुपारी जेवुन लगेच दुकानात व रात्री जेवुन पुन्हा रोजचे रुटीन. बोलायचे ही त्राण नसायचे. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० ला उठून पाणी भरावे लागत असे .नंतर एक दोन महिन्यांनी ह्यांचे मामा व मामी म्हणजे नवीन जोडी आली . आता त्यांना फिरायला घेऊन जाण्याची जबाबदारी ह्यांच्यावर होती. मग आमचे चार दिवस महाबळेश्वरला जाण्याचे ठरले .आम्ही चौघेही खूप खुश होतो. त्या वेळी ह्या लहान लहान गोष्टीतून खूप आनंद मिळायचा. एसटीने तेथे पोहोचलो. त्यांच्या मित्राच्या हॉटेल मध्ये रहाण्याची व्यवस्था केली होती. त्यावेळी रूम ३०० रुपयात मिळाली .पण ते ही त्यावेळी जास्त होते. कारण ह्यांचे नवीन दुकान होते.ठरल्याप्रमाणे सर्व ठिकाणे पाहिली . क्षेत्र महाबळेश्वर, सर्व पॉईंट्स पाहिले .त्यावेळी आजच्या एव्हढी गर्दी नसायची. त्यामुळे मस्त ए आर रहमानची गाणी आणि ते वातावरण. आहा ! अजून काय पाहिजे ! एके दिवशी प्रतापगडला गेलो. तेथे मस्त दही थालीपीठ खाल्ले. थंडी आणि ते गरमागरम थालीपीठ ठेचा आणि त्या रंगलेल्या गप्पा गोष्टी.मामा व मामींचा स्वभाव खूप फ्री होता. त्यामुळे खूप मज्जा केली.तीन नंबरच्या संगीतामामी जामखेडच्या .एकाच वयाच्या असल्यामुळे छान जमले होते. जणू मला एक मैत्रीण मिळाली होती. नंतर एक दिवस आम्ही बामणोलीला गेलो. मस्त बोटिंग केली. खूप थंडी होती .आम्ही दोघी तर कुडकुडत होतो. मग चहा पिल्यावर बरे वाटले.हसत खेळत हे चार दिवस कधी व कसे गेले हे समजलेच नाही. मात्र ह्या आठवणींनी कायमचे मनात घर केले.

लेखन : रश्मी हेडे
संपादन : देवेंद्र भुजबळ
मो.क्र. 9869484800

Advertisements
Previous articleअंधश्रद्धेला छेद देणा-या पहिल्या महिला राजमाता जिजाऊ – उज्वलाताई साळुंखे
Next articleअकोल्यात चिकन, मटणाचे भाव कायम! बर्ड फ्लूचा धोका नाही- जिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here