व-हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप करुन रेणू शर्मा यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या गंभीर आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर आल्याचं चित्र होतं. विरोधकांनी तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन, आमदारकीच रद्द करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी सहमतीतून संबंधातून दोन मुलं असल्याचं जाहीर केलं. मात्र करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या प्रकारानंतर रेणू शर्मा यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशन गाठून धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. जिथे धनंजय मुंडे विलन ठरतायत असं वाटत असतानाच, चित्र तेव्हा बदललं जेव्हा भाजपचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी याप्रकरणात एण्ट्री घेतली. कृष्णा हेगडे यांनी थेट रेणू शर्मा यांनी आपल्यालाही हनिट्रॅप करुन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा केला. इतकंच नाही तर रेणू शर्मा यांनी आपल्यालाही कॉल, मेसेज केलेच, पण मनसे नेते मनीष धुरी यांनाही असंच फसवण्याचा प्रयत्न केल्याचं हेगडे यांनी सांगितलं.
मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ
यामुळेच धनंजय मुंडे यांच्यावरील डाग हळूहळू पुसट होताना दिसत आहेत. काही वर्षापूर्वी बीडमधील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान, तुम लाख कोशिशे करो मुझे बदनाम करने की,मै जब भी बिखरा हूं तब तब मै दुगनी रफ्तारसे निखरा हूँ हा शेर सादर केला होता. रेणू शर्मा प्रकरणात त्यांचा हाच शेर लागू होतोय की का असं आता हळूहळू दिसत आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही : शरद पवार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना, धनंजय मुंडे यांचं प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं. तसंच पक्षांतर्गत चर्चा होऊन त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र रेणू शर्मा यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक अशा तीन तक्रारी दाखल झाल्यानंतर, धनंजय मुंडे हे धोक्याबाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळेच शरद पवार यांनी आज या सर्व प्रकरणानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. “महिलेची तक्रार असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं, मात्र त्या महिलेविरोधातच तीन जणांनी तक्रार केली आहे. त्यामुळे ACP दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने या प्रकरणाची चौकशी करावी. पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही”, असं शरद पवारांनी ठामपणे सांगितलं.
रेणू शर्मांवर बूमरँग?
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप केल्याने मंत्रिमहोदयांच्या अडचणी वाढल्या. असं असलं तरी रेणू शर्मा यांच्याविरोधातही तक्रारी वाढत असल्याने हे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरॅंग होताना दिसत आहे. कारण रेणू शर्मा यांच्याविरोधात खुद्द धनंजय मुंडे यांनी तर तक्रार केली आहेच, पण त्यांच्याविरोधात इतर तीन तक्रारीही दाखल झाल्या आहेत. जर केवळ धनंजय मुंडे यांचीच तक्रार असती तर एकमेकांविरोधात तक्रार असं समजून प्रकरणाला तितकंस गांभीर्य आलं नसतं. पण अन्य तीन तक्रारी, त्याही बड्या नेत्यांच्या तक्रारी असल्याने प्रकरण आणखी गंभीर बनलंय.
कृष्णा हेगडेंनी वात पेटवली
भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी सर्वात आधी रेणू शर्माविरोधात तक्रार दिल्याने, धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव कमी होण्यास सुरुवात झाली. रेणू शर्मा यांनी रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा हेगडे यांनी 14 जानेवारी रोजी केला. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असा दावा कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
..तर माझाही धनंजय मुंडे झाला असता : मनीष धुरी
“जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी 2010 मध्ये अनुभव घेतलाय. पण मी 2008- 2009 मध्ये फसणार होतो, मात्र माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही (रेणू शर्मा) आणि हिचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय”, असं मनीष धुरी म्हणाले.
रिझावान कुरेशींनाही रेणू शर्मांकडून अडकवण्याचा प्रयत्न?
रेणू शर्मांनी जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणाला छळल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे माध्यमांच्या हाती लागली आहेत. यावरुन रेणू शर्मा यांनी कुरेशी यांच्यासोबत सोशल मिडीयावरून ओळख झाल्यानंतर मैत्री केली. त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि असं बरेच काही घडलं हे जवळपास 2 वर्ष चालले त्यानंतर मात्र या महिलेने रिझवान कुरेशी विरोधात याच आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केल्याचं यातून समोर येतंय.
ब्लॅकमेलिंगचा खेळ?
या सर्व प्रकारानंतर ब्लॅकमेलिंग हा एकच आरोप आतापर्यंत समोर येत आहे. कालपर्यंत विलन वाटणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवरच एकामागे एक असे तीन आरोप झाले. त्यामुळे धनंजय मुंडेंवरील डाग धुसर होत आहेत आणि धनंजय मुंडेंनी म्हटल्याप्रमाणे “तुम लाख कोशिशे करो मुझे बदनाम करने की,मै जब भी बिखरा हूं तब तब मै दुगनी रफ्तारसे निखरा हूँ” हे खरं होताना दिसत आहे.
Advertisements