काकाजींच्या प्रेरणेने अनेक जीवन घडतील ती उत्तम स्मरणिका : डॉ. मोहन भागवत

0
150

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: स्व. शंकरलाल उपाख्य काकाजी खंडेलवाल यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अनेक जीवन घडतील ती उत्तम स्मरणिका राहील आणि ते दायित्व आजच्या पिढीवर असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने मंगळवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी खंडेलवाल महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. निस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व आहे असे सांगून डॉ. भागवत म्हणाले, काकाजी खंडेलवाल डॉ. हेडगेवार कुलोत्पन्न होते. शुद्ध सात्विक प्रेमातून त्यांनी माणसे जोडली. आपलेपणाची अनुभूती त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मिळाली. कंटकाकीर्ण मार्गावर साथ करणारे मित्र आत्मविश्वास जागवतात असे त्यांचे वागणे असे. सुदैवाने आम्हाला त्यांचे सानिध्य लाभले होते. ज्यांनी त्यांना पाहिले नाही त्यांच्यासाठी स्मरणिका अनुसरणीय राहील, असा विश्वास व्यक्त केला. ‘ऐसी कळवळीयाची जाती लाभाविण केली प्रिती’ या तत्वानुसार शंकरलाल खंडेलवाल यांनी जीवन व्यतित केले. अशा व्यक्तींचीच जन्मशताब्दी साजरी होत असते, त्यातून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले. सरसंघचालकांच्या हस्ते सुरुवातीला भारतमाता प्रतिमा पूजन करण्यात आले. समारोह समितीचे अध्यक्ष अतुलभाई गणात्रा, आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल, सचिव महेंद्र कवीश्वर  यांनी शाल, श्रीफळ देऊन डॉ. भागवत यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात गोपाल खंडेलवाल म्हणाले, 1 ऑगस्ट 2020 पासून स्व. शंकरलालजी खंडेलवाल जन्मशताब्दी वर्षाला आरंभ झाला असून काकाजींच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात येत आहे. सरसंघचालकांच्या हस्ते ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.
उत्कर्ष शिशुगृहाला पहिला पुरस्कार
काकाजींच्या स्मरणार्थ सेवा कार्यासाठी दिला जाणारा पहिला पुरस्कार उत्कर्ष शिशुगृहाचे अध्यक्ष विजय जानी, प्रकल्प प्रमुख दादा पंत यांनी सरसंघचालकांच्या हस्ते स्वीकारला.
स्मृतीग्रंथाचे विमोचन
विवेक मुंबईने प्रकाशित केलेल्या संघ समर्पित काकाजी स्मृती ग्रंथाचे विमोचन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. स्मरणिका सर्वांगसुंदर झाल्याची पावती डॉ. भागवत यांनी दिली. आरती देवगावकर यांनी लेखन केले असून निर्मितीमध्ये रवींद्र भुसारी, श्रीकांत कोंडोलीकर, महेंद्र कवीश्वर, निशीकांत देशपांडे, मधुर खंडेलवाल, समीर थोडगे, महेश मोडक यांच्या प्रयत्नातून निर्मिती झाली. विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते पल्लवी अनवेकर तसेच लघुपटाची निर्मिती करणारे स्वप्नील बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. विवेक बिडवई यांनी, तर आभार प्रदर्शन अतुलभाई गणात्रा यांनी मानले. वैयक्तिक गीत कविता वरघट यांनी गायले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. पोलिस बंदोबस्त चोख होता.

Advertisements
Previous articleसामान्य रुग्णालय व क्रीड़ा संकुलला जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी राजे यांचे नाव द्यावे- अजय घनोकार
Next articleवीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय मागे घ्या – भाजपाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here