वेगळी वाट….. रुद्रमच्या काळ्या गव्हाची व-हाडात चर्चा

0
130

यूट्यूब ठरले प्रेरणास्त्रोत, मधूमेहींसाठी काळा गहू गुणकारी
मंगेश फरपट |
व-हाड दूत न्युज नेटवर्क

अकोला: रुद्रम मिलिंंद झाडे हा कृषीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी. पदवीधर झाल्यानंतर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचे त्याने ठरवले. सोशल मिडियाचा व्यवस्थित उपयोग केल्यास त्यातून नवी वाट गवसू शकते हे रुद्रमला समजले. यूट्यूबवर त्याने एक व्हिडिओ पाहिला. यात त्याला काळ्या गव्हाच्या लागवडीची माहिती मिळाली. पूर्ण माहिती काढल्यानंतर त्याने काळ्या गव्हाची लागवड केली. आज त्याचा गहू सोंगणीला आला आहे. रुद्रमच्या काळ्या गव्हाची संपूर्ण व-हाडात चर्चा होत आहे. मधुमेहींसाठी काळा गहू गुणकारी असल्याचे डॉक्टर सांगतात.

रुद्रम हा कृषी पदवीधर. सध्या तो सागर, मध्यप्रदेश येथे एमएसस्सी अॅग्री करीत आहे. त्याच्या घरी 40 एकर शेती असून कृषी क्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रयोग करण्याच्या हेतूनेच त्याने कृषी शिक्षणक्रम निवडला. यासाठी सातत्याने त्याचे कृषी क्षेत्रातील वाचन राहते. पंजाबच्या नॅशनल ॲग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या डॉ. मोनिका गर्ग यांनी निर्मीत केलेल्या काळ्या गव्हाबद्दल त्याला माहिती मिळाली. सखोल अभ्यास केल्यानंतर त्याने काळ्या गव्हाची लागवड करण्याचे ठरवले. पंजाबमधून बियाणे उपलब्ध करून त्याने आकोलखेड शिवारातील शेतात अर्ध्या एकरावर काळ्या गव्हाची लागवड केली. आज हा गहू सोंगणीला आला आहे. शेतक-यानाही या काळ्या गव्हाचे कुतूहूल आहे. यासाठी ते त्याच्या शेतात भेट देत आहेत. एकरी 15 ते 16 क्विंटल उत्पादन होवू शकते असा अंदाज रुद्रमने व्यक्त केला आहे. भविष्यात काळ्या तांदळाचा, पिवळ्या टरबूजाचा प्रयोगही तो करणार आहे.

काळा गहू मधूमेहींसाठी गुणकारी
काळ्या गव्हात सामान्य गव्हापेक्षा 60 टक्के जास्त लोह आहे तसेच इतर प्रथिने आणि पोषक घटक देखील असतात. तसेच हा गहू शुगर असणा-यांसाठी फायद्याचा असल्याची माहिती आहे. सामान्य गव्हापेक्षा काळा गहू हा एक आयोग्यदायी पर्याय म्हणून समोर येत आहे.
अनेक शेतक-यांनी केला पेरा
रुद्रम याने काळ्या गव्हाचे बियाणे पंजाब येथून आणले असून इतर शेतक-यांना तो बियाणे उपलब्ध करुन देतो. त्याच्याकडे आतापर्यत कोल्हापूर, इगतपुरी,नाशिक,सांगली, जयसिंगपूर येथील शेतक-यांनी काळ्या गव्हाचे बियाणे लागवडीसाठी नेले आहे. तर आकोलखेड शिवारात शेतक-यांनी या गव्हाच्या बियाण्यांची लागवड करत मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here