आता संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन

0
554

जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद
नागरिकांनी कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील मेहकर शहर, लोणार शहर, सिं. राजा शहर, शेगांव शहर, जळगांव जामोद शहर, नांदुरा शहर, मोताळा शहर व संग्रामपूर शहर येथे कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात बुलडाणा, खामगांव, मलकापूर, चिखली व दे. राजा  नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी आज 23 फेब्रुवारी रोजी सायं 6 वाजेपासून 1 मार्च चे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहेत.
या आदेशान्वये प्रतिबंधीत क्षेत्रात  किराणा, स्वस्त धान्य दुकाने, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, पीठ गिरण्या सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत  सुरू राहणार आहेत. दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. या प्रतिबंधीत क्षेत्रात रात्री 8.30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. ग्राहकांनी  दुकानामध्ये खरेदी करण्याकरिता जवळपास असलेल्या बाजारपेठा, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतो दुरचा प्रवार टाळावा. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे.
सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आदी कामांकरीता परवानगी असणार आहे. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधीत क्षेत्रातील पोलीस निरीक्षक यांची पुर्व परवानगी घेऊन अनुज्ञेय असणार आहे.  ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्ययामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधीत ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील.
सर्व आठवडी बाजार बंद राहतील.  खाद्यगृहे, रेस्टॉरंट हे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र अशा खाद्यगृहे, रेस्टॉरंट मधून केवळ घरपोच पार्सल सेवा देण्याकरीता अनुज्ञेय राहील. सर्व खाजगी वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रूग्णालय बंदचा आधार घेवून रूग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. जिल्ह्यातील ॲम्बुलन्स सेवा 24 तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतुक, वितरण, विक्री व साठवण सुरू राहील. संचारबंदीच्या कालावधीत संपन्न होणाऱ्या पुर्वनियोजित परीक्षा त्यांचे वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. तसेच परीक्षार्थी यांना सदर कालावधीमध्ये परीक्षेचे ओळखपत्र व पालकांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल. कृषि सेवा केंद्र व कृषि निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया उद्योग सकाळी 9 ते दु .3 या वेळेत सुरू राहतील. चिकन, मटन व मांस विक्री, अंडी विक्री दुकाने सकाळी 9 ते दु 3 वाजेपर्यंत सुरू असतील.
मात्र प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आठवड्या अखेर शुक्रवारी सायं 5 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. तसेच दुध विक्रेते, डेअरी यापुढे सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 8.30 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील.  या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Advertisements
Previous articleमाझी व पूजाची बदनामी करणे थांबवा: ना. संजय राठोड
Next articleशेगाव न प उपाध्यक्षापदी भाजपाच्या सुषमा शेगोकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here