मी धनश्री निलेश देव अभ्यंकर बोलतेय!

0
129

अकोला: प्रभाग क्रमांक तीन मधील मतदार बंधु भगिनींनो !नमस्कार!

मी आज आपल्याशी अवचितच बोलतेय, म्हणून आपल्याला निश्चितच आश्चर्य वाटेल हे मी समजू शकते. पण मी गेल्यानंतर अनेक प्रश्न माझ्यासाठी अनुत्तरीत राहिले. आणि म्हणून मग त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्याचा एक भाग म्हणून मी आपल्याशी संवाद साधण्याचे ठरवले (अर्थात एकतर्फी).
आज दिनांक 24. 2 .21. बरोबर चार वर्षापूर्वीच आजच्या दिवशी आपण मला प्रचंड मताधिक्क्याने निवडून देऊन माझ्यावर विश्वासाचं शिक्कामोर्तब केले होते. निवडून येणे हा आनंदाचा भाग पण त्याचबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांना योग्यरीत्या निभावणे याचं प्रचंड दडपण होतं माझ्यावर. कारण हा विश्वास आपण दुसऱ्यांदा माझ्यावर टाकला होता. नंतर मी आणि निलेश झपाटल्या सारखे आपला विश्वास सार्थ करण्याकरिता रात्रंदिवस कार्यरत होतो. खरं सांगते आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा वेळ काढावा लागत होता. प्रभागात वेगवेगळ्या कल्पनांना आम्ही मूर्त स्वरूप देत होतो. लोकोपयोगी कामात स्वतःला झोकून देत होतो. मस्त चालले होते आमचे (पण मग याला कुणाची तरी नजर लागली).
आज आपल्याशी अनेक विषयांवर मी बोलणार आहे.
मतदारांच्या आयुष्याशी निगडित असणारा मालमत्ता कर वाढीच्या प्रश्नाला आम्ही हात घातला. याविरोधात कल्पकतेने आंदोलने केली. प्रशासन गांगरून गेल. पण यावर कुठलीही कारवाई करण्यास त्यांनी नकार दिला. लोकांच्या जीवाशी खेळण हा प्रशासनाचा आवडता खेळ. मग याला आम्ही न्यायालयात आव्हान दिले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कणखरपणे बाजू मांडली. त्यांचं अभ्यासपूर्ण विवेचन आमच्यासाठी एक शिकवण होती. आज खंत वाटते की ज्या प्रश्नांवर जिवाचं रान केलं त्याचं पुढं काय होणार? पण मला खात्री आहे की मी सुरू केलेलं हे यज्ञकुंड निलेश कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रज्वलित करत राहिल आणि कधीतरी मला याचं सकारात्मक उत्तर मिळेल—-मी वाट पाहीन—-वाट पाहीन मी….
दुसरा निगडीत प्रश्न पाणीपट्टी वाढीव देयके रद्द करण्याचा प्रश्न अथवा न्यायालयात प्रलंबित तुमच्या-माझ्या वीज बिलांच्या प्रश्नाचे काय झाले? याविरुद्ध सुद्धा आम्ही काहूर माजवलं, आंदोलनं केली. पण दुर्दैवानं माझ्या हयातीत या प्रश्नांचा छडा मी लावू शकली नाही. मग हे आठवलं की मनात काहूर माजतं आणि मी अस्वस्थ होते. पण एक गोष्ट नक्की माझ्या आंदोलनामध्ये प्रामाणिकता असेल, त्यात माझा काही स्वार्थ नसेल तर मला या प्रश्नांचं सुद्धा उत्तर सकारात्मकच मिळेल——मी वाट पाहीन—–वाट पाहीन मी……
मतदार बंधु भगिनींनो माझ्या अचानक जाण्याने अनेक अनुत्तरीत प्रश्न माझ्या भोवती फेर धरतात आणि माझ्याकडे बघून भेसूर हसतात. पण ह्यांच हे हसण मला त्यांच्या रडण्यात परिवर्तित झालेलं आवडेल. निलेश मी आयुष्यात तुझ्या कडून कधीच काही मागितलं नाही मृत्युनंतर एकच मागते तु आणि तुझे मित्र मंडळ अर्धवट सोडलेले प्रश्न तडीस न्याल आणि हीच मला तुझ्याकडून खरीखुरी श्रद्धांजली असेल.
उपरोक्त प्रश्नांच्या बाबतीत मी असमाधानी असेलही कदाचित पण आज अभिमानाने सांगते की एक प्रश्न मी माझ्या जिवंतपणी पूर्ण केला. त्याचे समाधान शब्दातीत आहे आणि तो म्हणजे महानगरपालिका हद्द वाडीमध्ये मी शर्थीचे प्रयत्न करून गोड्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला त्यामध्ये न्यू तापडिया नगर, पंचशील नगर, दुबे वाडी इत्यादी भाग येतो (त्या लोकांनी दिलेले आशीर्वाद माझ्या सार्थक ला मिळोत. शेवटी आई आहे ना मी).
प्रभाग क्रमांक तीन मधील मतदार बंधु भगिनींनो आणि संपूर्ण अकोलेकरांनो आज एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी आपणा समोर मांडणार आहे. मी आणि माझ्या कुटुंबियांनी जे भोगलं ज्याची आम्हाला झळ लागली, त्यातून आमचं संपूर्ण कुटुंब होरपळून गेला. माझा सार्थक पोरका झाला, निलेश एकाकी पडला. सासू सासरे, आई वडील, भाऊ उन्मळून पडले. विषय आहे कोरोना.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली. कुणाची आई, कुणाचे बाबा, कुणाचा पती, कुणाची पत्नी, कुणाचा भाऊ, कुणाची बहीण या झंझावातात उन्मळून पडले.
अकोल्यात सुद्धा कोरोनाची
लाट आली. मी व निलेश कामाला लागलो. काढा वाटणे, सॅने टाईज करणे, गोरगरिबांना धान्य वाटप करणे. झपाटल्यासारखं आमचं काम सुरू होतं. आणि एका अवचित क्षणी बेसावधपणे कोरोनाने माझा घात केला. क्षणातच होत्याचं नव्हतं झालं.
म्हणून आज हात जोडून सांगते बाबांनो काळजी घ्या तुमची, तुमच्या कुटुंबियांची. आपल्या अवतीभवती सर्वदूर काही अभ्यासू (?) लोक कोरोनावर रोज नवनवीन सिल्याबस काढत असतात त्यातील काही मुद्दे—
१. कोरोना नाहीच हा तर फ्लू आहे.
२. दरवर्षी इतके लोक तर तसेही मरतात.
३. हे एक फार मोठे षडयंत्र
आहे.
४. जागतिक पातळीवर यात आर्थिक बाब सम्मिलित आहे.
पण कृपा करून यांचेकडे अजिबात लक्ष देऊ नका.
या सगळ्यांना एकच उत्तर म्हणजे माझा मृत्यू. काय वय होतं माझं ?अवघे 38 वर्ष .हे काय मरण्याचं वय आहे ?मला कुठलाही आजार नव्हता. मग माझा मृत्यू कशाने झाला?
या लोकांना माझा आणखी एक प्रश्न. की ज्यांच्या घरातील कुणि सदस्य गेला असेल अचानक पणे त्याचा या उपरोक्त गोष्टींवर विश्वास बसेल?
मी जिवंत असताना एक फेसबुक पोस्ट बघितली होती. कुठल्यातरी जिल्हाधिकार्‍यांना गावातील कोणीतरी म्हणाला कोरोना वगैरे काही नाही आहे. जिल्हाधिकारी अतिशय हुशार म्हणाले अगदी बरोबर कोरोना नाहीच आहे. पण मग उद्यापासून तुम्ही कोरोना वार्डमध्ये स्वयंसेवक म्हणून या. नंतर तो परत कधीही आला नाही हा भाग वेगळा.
अनेक गोष्टी आपण या काळात ऐकल्या मुलांनी वडिलांचं शव स्वीकारलं नाही मग सामाजिक संस्थांनी त्यांचे अंत्यविधी केले.
कृपया सरकारने दिलेल्या सूचना पाळा. सरकारने तरी अशा कोणत्याही जगावेगळ्या सूचना दिल्या.
१. मास्क लावा
२. हात धुत रहा.
३. एकमेकांमध्ये अंतर ठेवा.
मग आपण का ईगो करतो. परिस्थिती आपल्या घराच्या उंबरठ्यावर येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत का? नकाना बिन कामाच फिरू. नकाना अनावश्यक गर्दी करू. काही लोक उगीचच माहोल देखके आता असं म्हणतात. अरे मृत्युचं तांडव हे माहोल आहे का?
हात जोडून विनंती करते कृपया या सगळ्यांचं काटेकोर पालन करा. करोना आहे, फ्लु आहे की षडयंत्र आहे याचा आपण नंतर अभ्यास करू पण आगोदर मृत्यूचं तांडव ,भितीच सावट यापासून स्वतःला दूर ठेवू.
खात्री बाळगा हे ही दिवस जातील, रात्रीचा गडद अंधकार नष्ट होऊन सूर्योदय होईल. तुमचं जीवन खुशाल होईल पण…… फक्त थोडी कळ सोसा. आणि सर्व सूचना काटेकोरपणे पाळा व कोरोनाला दूर ठेवा.
शब्दांकन.. दिलीप देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here