शब्दशुभेच्छा : मा. राजेश राजोरे साहेब
✍️ राजेंद्र काळे, जिल्हा प्रतिनिधी, दै. देशाेन्नती बुलडाणा
जेवढा वेळ त्यांनी परिवाराला दिला नसेल, त्यापेक्षा कितीतरी पट वेळ त्यांनी ‘देशोन्नती’ला दिला,
अर्थात अजूनही देत आहे!
‘देशोन्नती’च्या या वृत्तयज्ञात प्रकाशभाऊंनंतर सर्वाधिक आहूती कोणाची असेल तर ती, राजोरे साहेबांची..
साहेबांना काही ठिकाणी त्यांचा स्वभाव आडवा आला, हे वास्तवच! सरळ-सरळ वागण्यामुळे त्यांना तडजोड कधी करता आलीच नाही, असो!
वडील शिक्षक, त्यामुळे अंगभूतच करडी शिस्त भिनलेली.. समाजसेवेच्या ओढीतून पत्रकारीता क्षेत्र निवडले. महासागरच्या हॉकर्सपासून ते देशोन्नतीच्या निवासी संपादकापर्यंतचा त्यांचा प्रवास तसा काटेरीच, संषर्षाने भारलेला पण समन्वय साधलेला!
गावखेड्यातल्या वार्ताहरांना लीड देत असतांना, शहरी पत्रकारीतेतही त्यांनी कधी भिड बाळगली नाही.. कायम ते निर्भीड राहिले, म्हणूनच कोणाचीही भीडभाड न ठेवण्याची धमक त्यांनी ‘देशोन्नती’च्या ग्रामीण पत्रकारितेत रुजवली.. प्रेरणाच होती त्यामागे, प्रकाशभाऊ व्यवस्थेवर करीत असलेल्या ‘प्रहार’ची. म्हणूनच ‘देशोन्नती’ ठरले ते, निर्भीड बाण्याचे दैनिक!
ग्रामीण पत्रकारीतेला नवा आयाम देण्याचे काम करत असतांना, ताठ मानेनं जगण्यासाठी पोट भरलेलं असावं लागतं.. यासाठी त्यांनी ग्रामीण पत्रकारीतेत जाहीरात व्यवसायाचे तंत्र-मंत्र वार्ताहर-प्रतिनिधींमध्ये रुजविले. त्यामुळे पत्रकारीता क्षेत्रातही स्वाभिमानाने जाहीरात कमिशनच्या माध्यमातून पैसा कमविल्या जावू शकतो, ही धारणा रुढ होवून.. पत्रकारीतेतला स्वाभिमान राजोरे साहेबांनी शिकवला. परिणामी शबनम गळ्यात अडकवून नेहरु शर्टवरील पत्रकारांची प्रतिमा, व्यावसायीक प्रतिभेनेही उजळून निघत ती सुट-बूट अन् टू-व्हीलर व कारपर्यंत आली. गाडीमागे अभिमानाने ‘देशोन्नती’चे स्टीकर चिटकले. पण ही व्यावसायीकता भिनवत असतांनाही, पत्रकारीतेशी कुठेही तडजोड न करण्याचे धडेही त्यांनी तेवढ्याच कणखरतेने शिकवले.
पत्रकारीता क्षेत्रातील चांगलेच नव्हेतर, वाईट प्रवृत्तींवर राजोरे साहेबांनी ‘पत्रकारीतेतील वास्तव’ या लेखमालेच्या माध्यमातून ‘प्रहार’ केला. पत्रकारीता क्षेत्रातील लक्तरेही त्यामुळे वेशीवर टांगल्या गेली. या निर्भीड बाण्यांचे सर्व क्षेत्रातून स्वागत झाले. यावरच ‘पत्रकारीतेतील वास्तव’ हे त्यांचे पुस्तक आले. पुढे त्यांनी ‘सरळ-सरळ’ हा स्तंभ दर मंगळवारी हाती घेतला. शेरोशायरीने सुरुवात अन् त्यानेच शेवटही, या अंगाने त्यांचे हे सरळ-सरळ लिखाण, सकारात्मक वृत्ती अन् नकारात्मक प्रवृत्ती.. यामधील सखोल अभ्यासाचा केंद्रबिंदू ठरले. त्यातील काही भाग ‘यांच्या लाथा-त्यांचे बुक्के’ या शिर्षकाखाली पुस्तक रुपानेही प्रसिध्द झाले आहे.
लेखणीतून नव्हे तर वाणीतूनही प्रबोधन, हीही राजोरे साहेबांची खासीयत. त्यातूनच एक व्याख्याता म्हणून त्यांची अपावधीत ओळख झाली. प्रजापती ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या मिडीया सेमिनारचे, राजोरे साहेब अविभाज्य घटक बनले.
निर्भीड पत्रकारीतेची किंमतही त्यांना चुकवावी लागली आहे. अवैध सावकारी विरोधात मोहिम उघडल्यावर त्यांच्या घरापर्यंत हल्लेखोरांची मजल गेली. मुलाच्या अपहरणात धावून आलेले ‘देवदूत’ ही राजोरे कुटुंबियांना तारुन गेले. दैनिक पत्रकारीतेतील दैनंदिन ताण व सततचा प्रवास, यामुळे शुगर-बीपी सारख्या व्याधीही त्यांना जडल्या. पण तरीही नित्यनियमाने व्यायाम, योगा व सतत नवनिर्माणात गुंतवून ठेवण्याची जिद्द.. या ‘लाईफस्टाईल’मुळे त्यांच्या दैनंदिनीत कुठलीही अडचण आली नाही.
हे सर्व गुण असतांना,कमालीचा तापट स्वभाव त्यांच्यासाठी अनेकदा अडचणीचा व काही जवळच्यांना दूर लोटणारा ठरला. अर्थात व्यवस्थापन चालवतांना तो करारी बाणा लागतोच!
अनेकांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या
मा. राजेश राजोरे साहेब
यांचा आज 26 फेब्रुवारीला वाढदिवस
माझी ‘देशोन्नती’मध्ये नियुक्ती करतांना, घटना कव्हर करण्यात अग्रेसर असणाऱ्या ‘देशोन्नती’मध्ये राजकीय अनुषंगाने रोखठोक पत्रकारीतेची अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केली होती. ‘वृत्तदर्पण’ही चालू करण्याचा साहेबांचाच आग्रह होता. त्या अनुषंगाने माझ्या पत्रकारीता जडण-घडणीत मा.साहेबांचा वाटा निर्विवाद.. तो स्वतंत्र लिखाणाचा विषय होवू शकतो.
आजतरी मा.साहेबांची शब्दशुभेच्छा अर्पित करतांना म्हणावेसे वाटते.
‘‘रुके तो चाँद, चले तो हवाओ जौ है..
वो शख्स धुप मे देखो तो छाँव जैसा है!’’
HappyBirthdaySaheb 🎂