महिलांच्या सुरक्षेसोबत सक्षमीकरणासाठी नयना देवरे यांचे प्रयत्न

0
386

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

नंदुरबार :शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि एका मुलाने तरी शेतकरी व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक नयना देवरे यांच्याकडे शेतकरी कुटुंबातील महिला समस्या घेऊन आल्यावर तातडीने ती सोडविण्याचा त्या प्रयत्न करतात. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षाची जबाबदारी सांभाळताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी समुपदेशन करण्याचे कामही त्या करतात.
नयना यांनी यापूर्वी जळगाव, बुलडाणा, मुंबई येथे देखील चांगल्या कामाने आपला ठसा उमटविला आहे. वस्तुत: पोलीस दलात आल्यावर आपल्याला चांगले वातावरण उपलब्ध होईल का, महिला म्हणून समस्या येतील का अशा शंका त्यांच्या मनात होत्या. मात्र मुंबई येथे एका क्लिष्ट प्रकरणात चांगली कामगिरी बजावल्याने वरिष्ठांकडून झालेल्या कौतुकाने मनातील शंकेची जागा आत्मविश्वासाने घेतली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर आपली जबाबदारी उत्तमरितीने सांभाळून त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. गेली दोन वर्षे त्या महिला कक्षात काम करीत आहेत. चांगल्या कामगिरीसाठी जळगाव आणि नंदुरबार पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या पाठीवर अभिनंदन पत्राद्वारे कौतुकाची थापही दिली आहे.
सकाळी दहाला कार्यालयात आल्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या समस्या सोडविण्याचे त्यांचे काम सुरू होते. काही वेळा सासरच्या मंडळींना समजावून महिलेच्या संसाराची घडी नीट करण्याचा प्रयत्न होते, तर काही वेळा महिलेला शारीरिक त्रास देण्यात आला असल्यास तिला कायदेशीर प्रक्रीयेबाबत मार्गदर्शनही करण्यात येते. दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्षात येणाऱ्या तक्रारींची दखलही तात्काळ घेतली जाते.
दोन पिढींमधील वैचारिक अंतरामुळे काहीवेळा मुली घर सोडून जातात. अशा मुलींना शोधून घरच्यांच्या स्वाधीन करण्याचे कामही त्यांनी केले आहे. नंदुरबारमध्ये आर्थिक परिस्थिती आणि शिक्षण नसल्याने पालकांना बऱ्याचदा मुलांनी रोजगाराकडे लक्ष द्यावे असे वाटते, तर मुलींना शिक्षण हवे असते. अशावेळी पालकांना शिक्षणाचे महत्व सांगून आणि मुलींना पालकांना मदत करण्याबाबत समजावून कौटुंबिक समस्या सोडविल्या जातात. भावनेच्या भरात अल्पवयीन मुलींना कोणत्याही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून त्या प्रयत्नशील असतात.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन काळात जुनागढला निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला घरी आणण्याचे वेगळे समाधान मिळाल्याचे त्या सांगतात. कौटुंबिक हिंसाचारामुळे असहायतेची भावना महिलांच्या मनात निर्माण होते. त्यांना आधार देण्याचे कार्य नयना देवरे यांनी केले आहे. त्यांनी तीन महिलांना गृहउद्योगासाठी प्रोत्साहीत केले. आज या महिला स्वावलंबन आणि सन्मानाच्या जीवनाकडे वाटचाल करीत आहेत.
पोलीस विभागात काम करतांना त्यांनी आपल्यातल्या संवेदनशील महिलेचे दर्शनही कार्यातून घडविले आहे. लॉकडाऊन काळात परिसरात धुणेभांडी करणाऱ्या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने घरात येणारे उत्पन्न पूर्णत: बंद झाले. अशावेळी त्यांनी सासरच्या मंडळीच्या मदतीने त्या महिलेला धान्य पुरविले. दररोज समस्या आणि तपासाच्या वातारणात असे क्षण समाधान देणारे असल्याचे त्या म्हणतात. नंदुरबारला रूजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साधारण 150 संसार जोडण्याचे काम केले आहे.
नयना यांचे पतीदेखील पोलीस दलात आहे. दोघांची भूमीका एकमेकांना सहाय्यक अशीच आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्या दोन मुलांपैकी 2 वर्षाचा मुलगा सासू-सासऱ्यांकडे राहतो. लहान मुले पाहिल्यावर मुलाची आठवण येऊन वाईट वाटत असले तरी बिघडलेले संसार जोडून मिळणाऱ्या आनंदात आईचे अश्रू विसरण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कर्तव्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दुय्यम स्थान देऊन ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ ही भूमीका सक्षमपणे अदा करण्याचे प्रशिक्षण पोलीस दलात दिले जाते. त्याच मार्गावर नयना दमदारपणे वाटचाल करीत आहेत.
नयना देवरे-कुटुंबियांची चांगली साथ मिळाली आहे. पिडीत महिलांनी कुणाचा आधार घेवून जगण्यापेक्षा स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना गृहउद्योग करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असतो. एखादे कुटुंब पुन्हा एकत्र आले की मिळणारा आनंद दिवसाचा थकवा घालविणारा असतो.

Advertisements
Previous articleआरक्षणाच्या मुद्दय़ावरून वाशिमच्या 14 जिल्हा परिषद सदस्यांचे पद धोक्यात,  सर्वोच्च न्यायालयाचा निकाल: जिल्हा परिषदेत खळबळ 
Next articleउद्या शेगावात श्रींचा १४३ वा प्रकटदिन उत्सव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here