मुलींना समानतेची वागणूक मिळावी: रंजनाताई बोरसे

0
495

जागतिक महिला दिन विशेष 
जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव. खरं तर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्रीचा. तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही. कालच साजरा करण्यात आलेल्या या दिनानिमित्ताने काही नामवंत स्त्रिया सांगताहेत त्यांना जाणवलेला स्त्रीत्वाचा अर्थ, स्त्री म्हणून त्यांनी अनुभवलेला जगण्याचा अर्थ …….

जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.
१९०९ पर्यंत महिला दिन २८ फेब्रुवारीला साजरा केला जायचा. आंतरराष्ट्रीय महिला वस्त्रे निर्मिती कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी महिला दिन साजरा करण्यात आला होता. ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा, असे ठरविण्यात आले होते. पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता. त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यादिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला होता. पण त्यानंतर ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला. महिला दिन हा कोणत्याही संघटनेचा म्हणून ओळखला जात नाही. तर जगभरातील वेगवेगळ्या देशांतील सरकारांकडून महिला दिन साजरा केला जातो.
‘तिच्या’ वाटय़ाला आलेले अर्धे आभाळ अजूनही काळवंडलेलेच आहे. हे मळभ हटवण्यासाठी तिचा निकराचा लढा सुरूच आहे. अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनून ती आपल्या शत्रूंशी लढत आहे. हे शत्रू किती आहेत याची गिनती करणे सोपे आहे, पण ते कोण आहेत हे ओळखणे अवघड आहे. जगातल्या सर्वात सुरक्षित जागेत म्हणजे आईच्या पोटात तिच्या गळला नख लावण्याचे दुष्टकार्य केले जाते तेही ‘जन्मदात’ आईबापाच्या संमतीने आणि आजी-आजोबा, आत्या, मामा यांच्या साक्षीने. कदाचित आईच्या मनाविरूद्ध ते घडत असेल. आपल्या गर्भाच्या मृत्यूबरोबर (की हत्या?) मातृप्रेमाच, वात्सल्याच्याही चिंधडय़ा उडवल्या जाताना तिला पाहावे लागते.
या जगात प्रवेश केल्यावरही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती असते. घरातल्या जवळच्या नातेवाईकापासून गावच्या गुंडापर्यंत कुणीही तिच्या ‘वाटेवरच्या काचा’ बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो. प्राणिजीवन टिपणार्‍या टी.व्ही. वाहिनवरील खूँखार श्वापदेही असे प्रसंग पाहून माना खाली घालतील. तिच्या आयष्यातल्या स्वप्न सोहळा म्हणजे लग्न असेल तर त्यानंतरही तिला ‘तच्या’ आई, बहिणीच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यांची लालसा स्टोव्हच्या इंधनापेक्षा जास्त ज्वालाग्राही बनते व असे अनेक स्टोव्ह भडका उडवून तिच्या स्वप्नांची राख करतात. सासू नावाची स्त्री, सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का करते, हे मानवजातीला आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे!
तिचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे पुरूषी मानसिकता. साबण, चारचाकी किंवा कोणतेही उत्पादन विकण्यासाठी जाहिरातीतले तिचे प्रदर्शन असो, मोबाईलवरून मोबाईलकडे फिरणार्‍या ओंगळवाण्या, गलिच्छ चित्रफिती असोत, त्यातून तो पुरूषी अहंगंडच दिसून येतो. तो भाषेमध्येही कसा उतरला आहे, याचे उदाहरण नुकतेच ऐकावास मिळाले. गोटय़ांच्या खेळात जी गोटी हरते व मार खाते तिला कन्नड भाषेत ‘हेण्णु’ (मुलगी) व जिंकलेला आणि मारणार्‍या गोटीला ‘गंडु’ (मुलगा) म्हणतात.
अशा अनेक शत्रूंना रिचवत, पचवत ‘ती’ तिची लढाई लढत आहे. ती समाजाच्या नीतीमत्तेचा कणा आहे. बेहिशोबी संपत्ती गोळा करणार्‍या नवर्‍याचा हात तिने थांबवला वा मुलींशी बेताल वर्तन करणार्‍या आपल्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली तर चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. निसर्गाने तिला ‘प्रेम’ नावाची विलक्षण देणगी दिली आहे. ते तिचे शस्त्र आहे. या शस्त्राने ती अनेक अवघड शल्यकर्मे सहजरित्या पार पाडते. तिच्या शब्दात मंत्राचे सामर्थ्य आहे. या मंत्राने ती अग्नी फुलवूही शकते व विझवूही शकते. त्या मंत्राचा ती कसा उपयोग करते, यावर समाजाचे अस्तित्व अवलंबून आहे.
तिच्या डोळतल अंगाराला कायद्याचे कवच लाभले तर दुष्कर्मे करणारे क्रूरकर्मा निश्चितच पुढे येण्यास कचरतील. ज्ञानदेव म्हणतात की, ‘स्त्री-पुरूषन्नामभेदे। शिवपण एकले नांदे।’ म्हणजे शिवशक्तींचे स्वरूप वरून जरी दोन दिसत असले तरी त्यांचे तत्त्व एकच आहे. स्त्री-पुरूष समानता याच्यापेक्षा सोप्या व वेगळ्या शब्दात सांगता येणार नाही. अर्थात हा विचार समाजात रूजायला आणखी किती दिवस लागतील, हे सांगता येत नाही.
महिलांमध्ये मुळातच जीवनाचे गांभिर्य जास्त असते. समान वयाचा मुलगा आणि मुलगी यांचे बारकाईने निरीक्षण केल्यास मुलगी अधिक परिपक्व असते हे लक्षात येते. मुलगे हे चंचल असतात आणि मुलींना लहानपणापासून जीवनाकडे गंभीरपणे बघण्याचे आणि जबाबदारीच्या जाणीवेने वागण्याचे शिक्षण दिलेले असते. मुलगी ही उद्याची माता असते. म्हणून तिला तुझ्या हाती पाळण्याची दोरी आहे हे विसरू नकोस असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला पुढे चालून कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची आहे अशी एक सूक्ष्म जाणीव प्रत्येक मुलीमध्ये असते आणि या जाणीवेमुळेच तिच्यात आपोआपच चांगले व्यवस्थापन कौशल्य विकसित झालेले असते. जगातल्या अनेक उद्योगांमध्ये पुरुष आणि महिलांमधला फरक अनेकांनी अनुभवलेला आहे. महिलांचे व्यवस्थापन कौशल्य पुरुषांपेक्षा सरस असते हे विशेषत्त्वाने पुरुषांनी मान्य केलेले आहे. ती सगळ्याच गोष्टींकडे गांभिर्याने पहात असल्यामुळे ते गांभिर्य पुढच्या पिढीत उतरवण्याचे दायित्व आपल्यावर आहे हीही जाणीव तिच्या मनामध्ये सतत जागती असते. अशा सगळ्या गुणांनी मंडित असलेल्या महिलांकडे आणि मुलींकडे पुरुष मात्र हीनत्वाच्या भावनेने बघत असतात. त्यांचा हा दृष्टिकोन सुधारावा आणि त्यांच्या मनात स्त्री जातीविषयी विश्‍वास निर्माण व्हावा यासाठी सार्‍या जगात आज जागतिक महिला दिन पाळला जातो.
आपल्या देशात तर अलीकडच्या काळात महिलांचे हे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. दहावी आणि बारावी सारख्या मोक्याच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेव्हा तर मुलींच्या पासाचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.
समान परिस्थितीतील मुले, शिक्षणही समान परंतु लिंगभेदामुळे येणारे गांभिर्य इतके भिन्न असते की मुली घरकामात लक्ष घालूनही मुलांपेक्षा अधिक गुण मिळवतात. हे सारे दिसत असूनही समाजातले पुरुष मुलींकडे किंवा महिलांकडे आदराने तर सोडूनच द्या पण समानतेच्या भावनेनेसुध्दा बघायला तयार नाहीत. अजूनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीशी विवाह होतो तेव्हा आजवर रूढ असलेल्या पध्दतीनुसार मुलगी मुलाच्या घरी जाते हा प्रवाह उलटा करण्याची हिम्मत अजून तरी कोणत्याही देशात दाखवली गेलेली नाही. सगळ्या जगात, सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये मुलगी विवाहानंतर मुलाच्या घरी नांदायला जाते. हा व्यवहार म्हणून मान्य करू परंतु आपल्या भाषेमध्ये या नातेसंबंधाविषयी बोलताना ‘अमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली’, अशी भाषा वापरली जाते. तिच्यातूनच समाजाची मानसिकता प्रकट होते.
सध्या तर मुली मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत आणि भारतात हळूहळू शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या बरोबर व्हायला लागले आहे. निदान या पातळीवर तरी, मुलीच्या जातीला शिकून करायचेय काय? असा प्रश्‍न विचारण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य झाले आहे. परंतु या शिक्षणाच्या समान संधीचा अर्थ लोकांच्या मनात मुलीविषयी समानतेची भावना निर्माण झाली आहे असा काढू लागलो तर ती चूक ठरेल. आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता, रोटी व्यवहार अशा रूढींचा त्याग केला गेला आहे. परंतु त्या त्यागामागे सामाजिक जाणीव आहे असे म्हणता येत नाही. नाईलाज म्हणून, निरुपाय म्हणून आणि आता गत्यंतरच नाही म्हणून या रूढींचा आपण त्याग केलेला आहे. तीच गोष्ट मुलींच्या शिक्षणाला लागू आहे. मुलगा आणि मुलगी यांच्याकडे समानतेच्या भावनेतून बघण्याची वृत्ती वाढली म्हणून मुली शाळेत जात आहेत असे नाही. तर शिकल्याशिवाय मुलींचे लग्न ठरू शकणार नाही या निरुपायापोटीच मुलींना शाळेत पाठवले जात आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण वाढत असले तरी मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती वाढली आहे असे काही नाही. तेव्हा समाजामध्ये मुलींकडे समानतेच्या भावनेने प्रवृत्ती वाढवली गेली पाहिजे.
तुझ्या सारख्या ध्येय प्रेरणेने प्रेरित झालेल्या व इतरांना प्रेरित करणाऱ्या मुलींची आज खरी गरज निर्माण झाली आहे….
तुझ्या ‘अर्ध्या आभाळा’तला श्रद्धेचा, विश्वासाचा सूर्य कधीच न मावळो हीच या जागतिक महिला दिनानिमित्त तूला शुभेच्छा…!!!

सौ. रंजनाताई निना बोरसे, 
प्रदेश सरचिटणीस, जय मल्हार सेना महाराष्ट्र

Advertisements
Previous articleअल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
Next articleबजेटमध्ये विदर्भाच्या वाटयाला वाटाण्याच्या अक्षदा- अॅड. आकाश फुंडकर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here