मुलींनाही चांगले शिक्षण, समान संधी द्या !

0
101

जागतिक महिला दिन विशेष
आज विविध क्षेत्रात महिला पुरुषांचे बरोबरीने किंबहुना अधिक चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. कित्येक महिलांनी आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वावर नावलौकिक मिळविला आहे. मुलींना मुलांच्या बरोबरीने शिक्षण, समान संधी मिळाली तर मुली सुद्धा कुटुंबाचा आधार बनू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना चांगले शिक्षण, मुलाच्या बरोबरीने वागणूक देण्याची गरज आहे.
आपल्या देशात अनेक थोरपुरुषांच्या जडणघडणीत, त्यांच्या कार्यात स्त्रियांचे योगदान आपण अभ्यासले आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना प्रेरणा देवून त्यांची जडणघडण करणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या संघर्षात साथ देणाऱ्या  रमाई यासारखी किती तरी उदाहरणे आपल्याला इतिहासात पाहायला मिळतील. या सर्व स्त्रिया आपणाला वंदनीय आहेत. शेतकरी, कामगार ते देशाच्या विविध क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या स्त्रिया आजही देशाच्या, समाजाच्या जडणघडणीत योगदान देत आहेत. मात्र, आजही मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अद्यापही बदललेला नाही.
‘मुलगी नको’ या मानसिकतेतून स्त्रीभ्रूणहत्या सारखे प्रकार सुरु झाल्याने सरकारला स्त्रीभ्रूणहत्या विरोधी कायदा करावा लागला. तसेच मुलींना समाजात समान वागणूक मिळावी, चांगले शिक्षण मिळावे, यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’ राबवून जनजागृती करावी लागत आहे. मुलगा-मुलगी हा भेदभाव समाजातून नष्ट होणे आवश्यक आहे. मुलीला सुद्धा मुलाच्या बरोबरीने शिक्षण, विविध क्षेत्रात समान संधी व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुलगी शिकली, सामर्थ्यवान बनली तर आपल्या देशाचा व समाजाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे. आई, बहिण, पत्नी, मुलगी यांच्यासह प्रत्येक स्त्रीचा सन्मान करायला शिकले पाहिजे. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांना सुद्धा सहभागी करून घेवून त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या घरापासून या बदलाची सुरुवात करूया. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांनी मुलींना, महिलांना सन्मान देण्याचा संकल्प करूया !

– उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बाल कल्याण विभाग, जि.प. वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here