व-हाड दूत न्युज नेटवर्क
रत्नागिरी : एमपीएससी परिक्षा पुढे ढकलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात युवकाने आत्महत्या केली. महेश झोरे असं आत्महत्या केलेल्या तरुणांचं नाव आहे. वाढतं वय आणि एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे जात असल्याचं कारण देत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाला एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागत असल्याचे शासनाने स्पष्ट केले. याच गोष्टीचं नैराश्य महेशच्या मनात होतं. अखेर राहत्या घरातच त्याने गळफास घेऊन आपली जीवननात्रा संपवली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले गावातली ही घटना आहे. आत्महत्या करण्याअगोदर महेशने एक सुसाईड नोट लिहिली. या सुसाईड नोटमध्ये परीक्षा पुढे जात आहे म्हणून मी आत्महत्या करतो आहे, असं त्याने नमूद केलं. स्थानिक पोलीस स्टेशन लांजा येथे त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेशच्या मृत्यूबद्दल पोलिस प्रशासनाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. रत्नागिरी पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी स्थानिक पोलिसांकडून याबद्दलची माहिती घ्या, असं सांगितलं. तर दुसरीकडे स्थानिक पोलिस पोलिस अधिक्षकांचं नाव सांगून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. एकूणच या प्रकरणात उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहे.
अधिकारी व्हायचं स्वप्न अधुरं
महेशच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असून त्याचे आई आणि वडील कामासाठी मुंबईला असतात. प्रतिकूल परिस्थिती असताना देखील अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगून महेश गेले अनेक दिवस अभ्यास करत होता. मात्र नैराश्याने मनात इतकं घर केलं की महेशने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या
Advertisements