कोविड रुग्णांच्या उपचारात अनियमितता; सहा हॉस्पिटलचालकांना दंड, जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

0
178

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोविड हॉस्पिटल म्हणून कोविड पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार करतांना अनियमितता असल्याने व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न केल्याबद्दल अकोला येथील सहा हॉस्पिटलचालकांना प्रत्येकी 50 हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. एका रुग्णालयाने रुग्णास जादा शुल्क आकारले म्हणून आकारलेले जादा शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत आदेशात देण्यात आलेली माहिती अशी की, येथील सिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, आधार हॉस्पिटल नवीन बसस्टॅण्ड जवळ हार्मोनी हॉस्पिटल, माऊंट कारमेल शाळेजवळ, श्री गणेश हॉस्पिटल, रतनलाल प्लॉट चौक, डॉ. भिसे यांचा दवाखाना , जयहिंद चौक व बिहाडे हॉस्पिटल या ठिकाणी कोविड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीने पाहणी व चौकशी केली. याठिकाणी प्रामुख्याने खालील अनियमितता दिसून आल्या- आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट उशीराने झाल्या, काही अहवाल प्रलंबित असणे, चाचण्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तसेच अहवाल जिल्हा प्रशासनास न कळविणे, कोविड चाचणी निगेटीव्ह व एचआरसीटी स्कोअर जादा असतांना शासनाच्या रुग्णालयात वा कोविड रुग्णालयात संदर्भित करण्या ऐवजी नातेवाईकांच्या संमतिशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे, शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सुचनांप्रमाणे डीसीएच किंवा डिसीएचसी ला तात्काळ संदर्भित न करणे इ. तसेच बिहाडे हॉस्पिटल येथे एका रुग्णास जादा शुल्क आकारणी केल्याचेही चौकशीत आढळल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रत्येक हॉस्पिटलचालकांना प्रत्येकी 50 हजार रुपये दंड व बिहाडे हॉस्पिटलला रुग्णास जादा आकारलेली रक्कम परत करण्याचे आदेशीत केले आहे. तसेच याबाबतची अनियमितता दिसून आल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

Advertisements
Previous articleपारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात ऑक्सिजन प्लांट उभारणार
Next articleदारूच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा रक्ताच्या बाटल्या भरूया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here