45 वर्षावरील दुसर्‍या टप्प्याच्या लसीकरणाची गती मंदावली

0
45

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा :कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णसंख्या तसेच मृत्यूसंख्या आटोक्यात राहावी या उद्देशाने शासनाकडून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. परंतु 45 वर्षावरील दुस-या टप्प्याची गती मंदावलेली दिसत आहे. 18 वर्षावरील युवक, युवतींच्या लसीकरण बाबत अद्याप स्पष्टता नाही. नागरिक आता लस घ्यायला पुढे येत आहेत परंतु लस उपलब्ध नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.
लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात 16 जानेवारी पासून मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार 45 वर्षावरील अधिक वय असलेल्या 8 लाख 89 हजार 266 नागरिकांपैकी आतापर्यंत 20 टक्के नागिरकांना कोरोना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. ही टक्केवारी बघता 45 वर्षावरील नागरीकांच्या लसीकरणाच्या दुस-या टप्प्याचीही गती मंदावली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गती वाढवण्याची गरज आहे.
आगामी काळात 18 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरण मोहिमेला सुरूवात होणार आहे. सुरूवातीला खासगी लसीकरण केंद्रावरुन मोहीम राबवण्यात येणार आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त असल्याने लसीकरण केंद्रही वाढवावे लागणार आहेत. अशातच 45 वर्षावरील अधिक वय असलेल्यांचा दुसरा डोसही देण्यात येत असल्याने एकाच वेळी लसीकरण केंद्रावर गर्दी होणार आहे. जिल्ह्यात अंदाजे 29,64,200 च्या जवळपास लोकसंख्या आहे. यातील तरुणांना प्राधान्य क्रमाने लस देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर यंत्रणा कार्यरत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 95 केंद्रांवर लसीकरण होत आहे. दुस-या डोससाठी अंदाजे 95 हजार नागरिकांनी नोंदणी केली असून त्यापैकी 21,477 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याची टक्केवारी 2.65 टक्के आहे.
ुवकांच्या लसीकरणाविषयी अनिश्चितता
आपल्यालाही कोविड प्रतिबंधक लस मिळणार असल्याने युवकांमध्ये उत्साह होता. परंतु शासनाकडून आता शनिवारपासून होणा-या कार्यक्रमाबाबत स्पष्टता केलेली दिसत नाही. त्यामुळे युवक, युवतींना कोविड लस केव्हा मिळेल याविषयी उत्कंठा आहे. नोकरी तसेच शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेल्या युवकांना लसीची प्रतीक्षा आहे.
लसीकरणाला वेग यावा
युवकच नाही तर विभिन्न वयोगटातील नागरिकांनाही लसीसाठी वाट बघावी लागत आहे. लसींची अनुलब्धता हे कारण सांगितले जात आहे. परंतु आता लोकांची लस घेण्याची तयारी असल्याने शासनाने लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. लोकांना आता कोविड संसर्गपासून सुरक्षिततता हवी आहे. आणि लसीकडे ते डोळे लावून बसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here