लसीकरणाचा स्लॉट घोटाळा! कोविड योद्धांच्या नावावर दुस-यांनाच लस; नोंदणीची पद्धत बनली डोकेदुखी

0
245

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला:कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी आता प्रत्येकजणच लस मिळण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र नोंदणी करायला गेले की, कधीही पहा स्लॉट बुक झालेला दिसतो. त्यामुळे नेमकी नोंदणी कधी करायची हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी कोविड योद्धांच्या नावावर दुस-यांनाच लस दिल्याच्याही घटना घडत आहेत. एकंदरीत सर्वत्रच लसीकरण मोहिमेचा फज्जा उडालेला दिसत असून योग्य नियोजनाची गरज आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्वांचे लसीकरण अभियान जाहिर केले. मात्र पुरवठ्याअभावी मोहिमेचा फज्जा उडतांना दिसत आहे. यात सरकारने लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्करसाठी 13 जानेवारीपासून तर दुस-या टप्यात 60 वर्षावरील  ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी फेब्रुवारीपासून लसीकरण सुरु केले. या दोन्ही टप्प्यांना विशेष प्रतिसाद मिळू शकला नसल्याचे ही वास्तव आहे. त्यामुळे आता 45 वर्षे वयोगटातील सर्वच नागरिकांना लसीकरण करता यावे यासाठी आवाहन केले जात आहे. त्यात आता 18 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींचाही लसिकरण मोहिमेत समावेश करण्यात आल्याने आणखीनच गोंधळ उडाला आहे. आतापर्यंत 11 लाखाहून अधिक लोकांना अमरावती विभागात लस घेतल्याची नोंद आहे. तर यामध्ये नव्याने लस घेतलेल्या 18 ते 44 वयोगटातील 9 हजार 646 नागरिकांचा समावेश आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे डिमांड केल्यानंतर लसीचा पुरेसा साठाही उपलब्ध झाला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री असलेल्या ना. बच्चूभाऊ कडू, ना. डॉ. राजेंद्र शिंगणे व ना. यशोमतीताई ठाकूर यांनी अमरावती विभागासाठी जास्तीत जास्त लस साठा कसा उपलब्ध होईल यादृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे ब-यापैकी लस साठा उपलब्ध होवू शकला. मात्र वितरण करणा-या यंत्रणेवरील अधिका-यांचे नियंत्रण सुटल्याने लस घोटाळा समोर येत आहे. यामुळे प्रामुख्याने 45 वर्षे वयोगटातील महिला, पुरुष लसीच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे. आतातर या प्रवर्गातील पहिली लस घेतलेल्या व्यक्तींना दुसरी लसीची प्रतिक्षा करावी लागत आहे. यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातीलच बहुतांश लसीकरण केंद्रावर गर्दी पहायला मिळते. याठिकाणी जिल्हाधिकांच्या आदेशाची पायमल्ली झालेली दिसत असतांना अधिकारी मात्र उंटावरून शेळ्या हाकण्यात दंग आहेत. वरिष्ठ अधिकारीच सिरिअस नसल्याने कनिष्ठ कर्मचा-यांकडून योग्य कामाची काय अपेक्षा ठेवणार.
जिल्हानिहाय लस घेतलेले नागरिक
(आकडेवारी 3 मे पर्यंतची)
अकोला – 2 लाख 3 हजार 216
बुलडाणा – 2 लाख 75 हजार 745
वाशिम – 1 लाख 59 हजार 150
यवतमाळ – 2 लाख 39 हजार 211
जिल्ह्यातील 3 लाख 4 हजार 2
नोंदणी करायची तरी केव्हा?

https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर कधीही नोंदणी करायला जात आधीच बुक झालेले दिसते. त्यामुळे नेमकी नोंदणी कोणत्या वेळेत करायची हा प्रश्न अनेकांना पडला आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विचारले तर सिस्टिमकडे बोट दाखवून  हात वर केले जात आहेत. त्यामुळे आता पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालून लसीकरण मोहिमेला वेग द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
ग्राहक पंचायतने घेतला आक्षेप
शासनातर्फे नगर परिषद, महानगर पालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालये, जिल्हा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लसीकरण करण्यात येते. स्थानिक पातळीवर अभियानात नियोजनाचा अभाव दिसून येतो. ऑनलाईन नोंदणी करायची सांगितली आहे, प्रत्यक्षात नोंदणीला विविध केंद्रावर महत्व दिल्या गेले नाही. त्यामुळे अनेकांना पुर्ननोंदणी करावी लागते. शिवाय नागरिकांना सकाळी ६ वाजता नोंदणी टोकन क्रमांक दिला जातो. त्यामुळे सकाळपासूनच अनेक केंद्रावर गर्दी दिसते. या प्रकारात सामान्यांसह वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोकाही अधिक वाढला आहे. जिल्हाधिका-यांनी या प्रकाराची दखल घेवून नियोजनबद्ध लसिकरण मोहिम राबवावी अशी मागणी संघटनमंत्री हेमंत जकाते, जिल्हाध्यक्ष मनोहर गंगाखेडकर आदींनी केली आहे.
18 ते 44 वर्ष वयोगटासाठी कोव्हॅक्सीन लस प्राप्त
18 ते 44 वर्ष वयोगटातील व्यक्तीना लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आज कोव्हॅक्सीन लसीचे एकूण 12 हजार डोस प्राप्त झाले आहे.  18 ते 44 वर्ष वयोगटातील  व्यक्तीने लसीकरणे करण्याकरीता आरोग्य सेतु किंवा कोविन ॲपवर आपली नोंदणी करुन अपॉईंटमेंट शेड्युल करणे आवश्यक आहे.

  • डॉ. मनिष शर्मा, नोडल ऑफिसर , लसीकरण
Advertisements
Previous articleनांदु-यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार : 3 जण ताब्यात
Next articleसंपूर्ण लॉकडाऊन’चाच पर्याय – जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here