जिल्ह्यांत व्हेंटिलेटरची कमतरता : डॉ. झिशान हुसेन

0
93

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

संक्रमित रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढले
अकोला :शहर तसेच जिल्ह्यात व्हेंटिलेटरची कमतरता भासत असल्यामुळे संक्रमित रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढले आहे. या बाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचे हृदयरोग तज्ञ, नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.
व्हेंटिलेटरचे व्यस्त प्रमाण
डॉ. झिशान हुसेन म्हणाले, कोरोना संक्रमित रुग्णांची स्थिती गंभीर झाल्यास त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. ही आमच्यापुढील मोठी समस्या आहे. शहरात जीएमसी आणि   सरकारी रुग्णालयासह काही मोजक्या रुग्णालयातच व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. जेव्हा रोग्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे त्यावेळी व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही तर रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे मृतकांचा आकडा वाढत आहे.
एक लाख लोकांसाठी 30 व्हेंटिलेटर
ते म्हणाले, सरकारचे काम आहे की एक लाख लोकांमागे 30 व्हेंटिलेटर उपलब्ध करावे. परंतु अकोला शहरात 80 ते 100 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. अकोला जिल्ह्याची लोकसंख्या  20 लाखाच्या आसपास असून त्यासाठी किमान 600 व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. विदेशात एक लाख लोकांमागे 40 व्हेंटिलेटर  उपलब्ध असतात. परंतु आमच्याकडे तहान लागल्यावर विहीर खोदण्यात येते. आरोग्य क्षेत्रांत असे होऊ नये, असे ते म्हणाले.
गंभीर रुग्णांची स्थिती खराब
शुक्रवारी सकाळपासून शहरात एकाही हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड रिकामे नाही. कोरोना संक्रमित रुग्ण जेव्हा  गंभीर स्थितीत येतो तेव्हा व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यास त्याच्या जीवावर बेतू शकते. कारण उपचार करणा-या डॉक्टरची प्राथमिकता रुग्णाचा जीव वाचवणे ही असते. डॉ. हुसेन म्हणाले, कोविड साठी तीन प्रकारचे हॉस्पिटल आहेत. ज्यात कोविड केअर सेंटर,आयसोलेशन, डेडीकेट कोविड सेंटर तथा डेडीकेट कोविड हॉस्पिटल, या ठिकाणीही व्हेंटिलेटरची कमतरता राहते. शासनाने ही कमतरता दूर करावी, याकडेही डॉ. झिशान हुसेन यांनी लक्ष वेधले.
ऑक्सिजनची कमतरता
डॉ.हुसेन म्हणाले, अजूनही सर्व ऑक्सिजन प्लांट सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनसाठी प्रयत्न करावा लागत आहे. आवश्यकते नुसार ऑक्सिजन उपलब्ध झाला पाहिजे. परंतु तो वेळेवर मिळाला नाही तर ऑक्सिजन अभावी रुग्णांची स्थिती गंभीर होऊ शकते. प्रसंगी त्याच्या जीवावर देखील बेतू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here