बुलडाणा: आता दुपारी 2 पर्यंत मिळतील जीवनावश्यक सेवा

0
89

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

▪️किराणा, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी 7 ते 2 खुली राहणार, कृषी निगडीत सेवा, दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत
▪️सर्व बँक, वित्तीय संस्था सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील

बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना बधीतांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील निर्बंध 15 जून पर्यंत वाढविण्यात आले आहे. जिल्ह्यात 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 15 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी निर्बंध असलेले आदेश परित केले आहे.

या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन,मटन,पॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने, स्वीट मार्ट), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस पंप सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. शनिवार व रविवार सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार बंद राहतील. जी दुकाने शॉपिंग मॉल, सेंटर च्या आत आहेत अशा दुकांनाना परवानगी राहणार नाही. एकल स्वरूपाची व स्वंतत्र असलेल्या दुकानांना परवानगी असणार आहे.

तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) आदी दुकाने सकाळी 6 ते सकाळी 9 व संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. तसेच घरपोच दुध विक्री नियमित वेळेनुसार सुरू राहील. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 वाजे पर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार रोजी सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. पावसाळी हंगाम सामग्री संबंधित दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. सदर ठिकाणी सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर, सॅनीटायझर आदी नियमांचे काटेकोर पालन करावे. पेट्रोल पंप सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 आणि शनिवार व रविवार सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत सुरू राहतील. या वेळेनंतर शासकीय मालवाहतूक, रूग्णवाहिका अत्यावश्यक वाहनांकरीता तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे व मालाची वाहतुक करण्याकरीता शहानिशा करून ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल इंधन पुरवठा करता येणार आहे. एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग, हायवेवरील पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

मद्य विक्री नमुना एफएल 2, फॉर्म – ई, फॉर्म ई 2 व एफएलडब्ल्यु 2 या अनुज्ञप्तीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमुना सीएल 3 अनुज्ञप्तीतून केवळ सीलबंद बाटलीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येईल. घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. सर्व वकीलांची कार्यालये , चार्टड अकाऊंट यांची कार्यालये सकाळी 10 ते संध्या 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. ऑप्टीकल्सची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत उघडण्यास मुभा असेल. जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील सीएससी केंद्र सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील. वृत्तपत्रांची घरपोच सेवा करता येईल. सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिगर बॅकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्तीय संस्था, सहकारी संस्था, पतपेढी, विमा, पोस्ट पेमेंट बँक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. बँकांचे कार्यालयीन कामकाज नियमित वेळेनुसार सुरू राहील. बँकेच्या ठिकाणी मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनी टायझेशन आदी कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे.

हॉटेल, रेस्टारंट, खानावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास हॉटेल, रेस्टारंट, खानावळ येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळुन आल्यास संबंधीत आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. शिवभोजन थाळी नियमित वेळेनुसार सुरू राहील. जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यापुढे टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था यांची राहणार आहे. आठवडी बाजार बंद राहतील. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. भाजी मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहणार आहे.

सार्वजानिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा, उदयाने, बगीचे पुर्णत: बंद राहील. तसेच सार्वजानिक ठिकाणी मॉर्निंग वॉक व इवेनिंग वॉक करण्यास बंदी राहील. याबाबत संबधीत नगरपालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबधीतांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. सर्व केशकर्तनालये,सलुन,स्पा,ब्युटी पार्लर संपुर्णत: बंद राहील. शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था,प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णत: बंद राहतील तथापी ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी सबंधीत शिक्षणाधिकारी (प्राथमीक/माध्यमीक) यांची राहील. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल हे पुर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पध्दतीने घरगुती स्वरुपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणुक, जेवणावळी,बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्न समारंभाकरीता केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल व सदरचा लग्न सोहळा 2 तासापेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी. विवाह सोहळा बेकायदेशीररित्या पार पडणार नाही याची दक्षता शहरी भागात संबधीत मुख्यधिकारी नगर पालिका तसेच ग्रामीण भागात संबधीत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी घ्यावी व नियमानुसार त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. लग्न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था,पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची राहील. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक व्यवसाय नाटयगृहे, कलाकेंद्र, प्रेषक गृहे, सभागृहे संपुर्णत: बंद राहील. सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहतील. गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी 7 ते सायं 6 या वेळेत करण्यात यावे. परंतु ग्राहकांनी गॅस एजन्सी मध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळुन आल्यास संबधीत एजन्सी कारवाईस पात्र राहील. सदर पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचेशी संबधीत शासकीय, निमशासकीय कार्यालये 100 टक्के कर्मचारी उपस्थिती सह सुरु राहतील. या कार्यालय व्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीसह सुरू राहतील.

सर्व आपले सरकार सेवा केंद्रे व सेतु केंद्रे नगारीकांकरीता बंद ठेवण्यात येत आहेत तथापी नागरीकांना ऑनलाईन स्वरुपात वेगवेगळया प्रमाणपत्र व सुविधांकरीता अर्ज सादर करता येतील. MIDC, उदयोग, कारखाने, सुतगिरणी येथे केवळ in-situ पध्दतीने कामकाज सुरु राहील. याबाबत सनियंत्रणाची जबाबदारी व्यवस्थापक,जिल्हा उदयोग केंद्र बुलडाणा यांची राहील. शासकीय यंत्रणामार्फत मान्सुन पुर्व विकास कामे आवश्यक पाणी पुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहतील. संबंधीत शासकीय यंत्रणांना या करीता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही. याकरीता त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधु नये.

सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पुर्णत: बंद ठेवण्यात येत आहेत. निवेदन/अर्ज केवळ ऑनलाइन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. ई कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरु राहतील तसेच स्थानीक दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांचे कडे ग्राहकांच्या घरी जातांना बिल व संबंधीत दुकानदारामार्फत देण्यात येणार ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था यांनी करावी. संबधीत कर्मचा-यांना निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील, सदर अहवालाची वैधता 7 दिवसांकरीता असेल.

सर्व सार्वजानिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतुक नागरीकांना फक्त अत्यावश्यक कामाकरीता अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रुग्णांकरीता रिक्षा व खाजगी वाहनांस परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतुक शाखेकडे राहील. जिल्हयाच्या सर्व सिमा या आदेशाद्वारे सिल करण्यात येत असुन, मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास केवळ बुलडाणा जिल्हयात प्रवेश देण्यात येईल. याकरीता वेगळया स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांचे कडुन रितसर परवागनी प्राप्त करुन घ्यावी.

जिल्हयाच्या मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तथापी मालवाहतुक साठा, खत साठा इत्यादी बाबतीत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी राहील. इतर कारणांकरीता व अत्यावश्यक वैदयकीय कारणांकरीता जिल्हयाबाहेर वाहतुक करावयाची असल्यास http: //covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन ई-पास काढुन वाहतुक करता येईल. पावसाळयापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचे कामे पुर्ण होण्याच्या दृष्टीने केवळ in-situ पध्दतीने सुरु राहील. पाणी टंचाई तसेच पाणी पुरवठा संबधीत कामे सुरु राहतील. प्रसामाध्यमांशी संबंधीत व्यक्ती/पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांचे कार्यालय, सर्व प्रकारचे दैनिक नियतकालिके, वृत्तपत्रांचे वितरण तसेच टि.व्ही. न्युज चॅनल सुरु राहतील. उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहरी भागात संबधीत मुख्याधिकारी नगरपालिका/नगर पंचायत तसेच ग्रामीण भागाकरीता संबधीत गटविकास अधिकारी यांची राहील व या सर्व प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी हि संबधीत तालुक्याचे incident commander तथा तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील. वरीलप्रमाणे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे लागु होतील तसेच कोणत्याही क्षेत्रास, संस्थेस, व्यक्तीस कामकाज सुरु ठेवण्याकरीता विशेष परवानगी दिनांक 15 जुन 2021 पर्यंत देण्यात येणार नाही.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता,1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे

Advertisements
Previous articleअकोल्यात लॉकडाऊन निर्बंध शिथील; आता दुपारी 2 पर्यंत मिळणार जीवनावश्यक सेवा
Next articleपर्यावरणपूर्वक अंत्यसंस्कारासाठी ‘गोकाष्ट’चा उपाय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here