रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी आयकॉन रुग्णालयाविरुद्ध चौकशीचे आदेश

0
301

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नेतृत्वात 5 सदस्यीय समिती गठीत
अकोला:स्थानिक आयकॉन हॉस्पिटलमध्ये गणेश गुरबाणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ऑक्सिजन अभावी आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा लोकेश गुरबाणी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हान यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करीत संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या आदेशाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शहरातील आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोरोना उपचारासाठी सुप्रसिद्ध व्यावसायिक गणेश गुरबाणी दाखल झाले होते. काही काळ रूममध्ये राहिल्यावर त्यांना घाईघाईने आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे नातेवाईक यांचे म्हणणे आहे. आयसीयूमध्ये असतांना रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे गणेश गुरबाणी यांचा 18 मे रोजी मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक यांनी रुग्णालय प्रशासनावर केला होता. तसेच त्याच दिवशी आणखी रुग्णांचा मृत्यू सुद्धा ऑक्सिजन अभावी झाल्याचे नातेवाईक यांचे म्हणणे असून सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्यता बाहेर येणार असल्याचा दावा ते करीत आहे. सदर प्रकरणी गणेश गुरबाणी यांचे चिरंजीव लोकेश गुरबाणी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली. प्रकरणाचे गांभिर्य ओळखून जिल्हाधिकारी पापळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता 5 जणांची चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी त्यादिवशीची रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्याची मागणी मृतक स्वर्गीय गणेश गुरबाणी यांचे चिरंजीव लोकेश गुरबाणी यांनी केली. सोबतच गठीत चौकशी समिती ही रुग्णालयांची निष्पक्ष चौकशी करणार जेणेकरून या प्रकरणाची संपूर्ण सत्यता समोर येईल अशी आशा गुरबाणी यांच्या परिवाराने यावेळी व्यक्त केली.
चौकशी समितीला सहकार्य करणार का ?
स्वर्गीय गणेश गुरबाणी यांच्या मृत्यूला आयकॉन रुग्णालय प्रशासन जबाबदार असून ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबियांनी केला होता. त्यावेळी रामदासपेठ पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मागितली असता ती त्यांना सादर करण्यात आली नसून त्यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना कुठलेच सहकार्य करण्यात आले नसल्याची माहिती आहे. पोलिसांना सहकार्य न करणारे आयकॉन रुग्णालय प्रशासन हे चौकशी समितीला सहकार्य करणार का ? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.
चौकशी समितीत यांचा समावेश
डॉ. राजकुमार चव्हाण (अध्यक्ष)
डॉ. मुकुंद अष्टपुत्रे (सदस्य सचिव )
डॉ. महाशब्दे ( सदस्य )
डॉ. प्रवीण सपकाळ ( सदस्य )
डॉ. निलेश अपार (सदस्य )

Advertisements
Previous articleराज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन
Next articleबियाण्याची उगवण न झाल्यास उत्पादक कंपन्यांवर कारवाई- पालकमंत्री ना. बच्चू कडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here