शाश्वत शेतीसाठी जैविक शेती हाच सर्वोत्तम पर्याय- ना. संजय धोत्रे

0
308

अकोल्यात महासंघ ऑरगॅनिक मिशनची स्थापना

योगेेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क

अकोला: रासायनिक शेतीचे दुष्परिणाम जमिनीचे आरोग्य,अन्नधान्य उत्पादन ते मानवी आरोग्यावर व पर्यावरणावरही दिसून येतात. शेतीच्या शाश्वततेसाठी ‘जैविक शेती’हाच सर्वोत्तम पर्याय असून जैविक पद्धतीने उत्पादीत केलेल्या शेतमालाच्या विक्री , प्रचार, प्रसारासाठी स्थापन झालेल्या ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’मुळे ही चळवळ अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास केंद्रीय मानव संसाधन तथा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी व्यक्त केला.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या 37 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन ‘ महासंघ ऑरगॅनिक मिशन’ या नावाने महासंघ स्थापन केला. तसेच त्याच महासंघाच्या मॉम या ब्रॅण्डचीही निर्मिती केली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ना. धोत्रे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य  साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, महासंघ ऑरगॅनिक मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, श्रीमती साधना पोहरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती निरजा, जैविक शेती मिशनच्या सल्लागार वंदना द्विवेदी, श्रीमती बिनिता शहा,  पी.सी. नायडू,  संचाल्क आत्मा किसनराव मुळे,  सेंद्रीय शेतीचे राज्य समन्वयक  कृषी आयुक्तालय पुणे सुनील चौधरी,   प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे,  उपसंचालक अशोक बाणखेले तसेच महासंघाचे शेतकरी सभासद हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
आपल्या ऑनलाईन संबोधनात ना. धोत्रे म्हणाले की, एकेकाळी अन्नधान्याचा तुटवडा असतांना रासायनिक खते, बी बियाणे, किटकनाशके यांचा शेतीत वापर करण्यास सुरुवात झाली.  यामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली खरी मात्र त्याचे दूरगामी दुष्परिणामही झाले. यामुळे शेतीचा भांडवली खर्च वाढला, उत्पादनाचा खर्च वाढला. त्यामुळे शेती फायद्याची रहात नाही. थोडक्यात आज शेती आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते  शेती रासायनिक पद्धतीने करण्यामुळे अधिक आहेत. जमिनीचे आरोग्य उत्तम राखून उत्तम आहार आणि आरोग्यासाठी पोषणमूल्य असलेल्या कसदार अन्नधान्याची निर्मिती करावयाची असेल तर  जैविक शेती शिवाय पर्याय नाही. या शेतीमुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते. पर्यावरणाची साखळी कायम राखून नैसर्गिक पद्धतीने  दर्जेदार मालाचे उत्पादन होते, असे ना. धोत्रे यांनी सांगितले. ते म्हणाले की विदर्भातील सहा  जिल्ह्यांमधील शेतक-यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या महासंघाला पुढे जाण्यासाठी लागणारी सर्व मदत शासनाच्या वतीने करण्यास आपण कटीबद्ध आहोत,याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
ना. धोत्रे यांच्या हस्ते महासंघाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तर श्रीमती निरजा यांच्या हस्ते  व्यापार माहितीपत्राचे  अनावरण करण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती निरजा, जैविक शेती मिशनच्या सल्लागार वंदना द्विवेदी, श्रीमती बिनिता शहा,  पी.सी. नायडू,  संचालक आत्मा किसनराव मुळे,  प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे,  उपसंचालक अशोक बाणखेले यांनी या उपक्रमास ऑनलाईन सहभागातुन शुभेच्छा देऊन मदतीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्प संचालक आरिफ शाह यांनी केले. या कार्यक्रमास  महासंघाचे पदाधिकारी, सभासद शेतकरी उपस्थित होते.

काय आहे महासंघ ऑरगॅनिक मिशन?
महाराष्ट्र शासनाने सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख  जैविक शेती मिशनची स्थापना केली आहे.  या मिशनचे कार्यक्षेत्र असलेले  अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा हे जिल्हे आहेत.  या मिशनने केंद्र शासनाच्या परंपरागत  कृषी विकास योजनेचे अभिसारण करुन 355 शेतकरी गटांची निर्मिती केली. त्यापैकी 10 गटांचा एक समूह व समूहस्तरावर कंपनी कायद्यान्वये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली. या पद्धतीने स्थापन झालेल्या 37 कंपन्यांनी मिळून ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’नावाने महासंघाची निर्मिती केली आहे. या कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या जैविक पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनांचे  प्रचार, प्रसार व विक्री ‘मॉम’ या ब्रॅण्ड नावाने केले जाणार आहे.

7423 शेतकरी सभासद
सद्यस्थितीत 355 गटांमार्फत 7423 शेतकरी  सभासद आहेत. प्रमाणिकरणाखाली एकूण 10 हजार 804 हेक्टर क्षेत्र असून  लाभार्थ्यांचे क्षेत्र 7100 हेक्टर आहे. सभासद शेतक-यांनी मिळून एक कोटी 65 लाख 74 हजार रुपयांचे भांडवल जमा केले असून आता ही कंपनी आपली उत्पादने एकाच ब्रॅण्डने बाजारात आणेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Advertisements
Previous articleबुलडाण्यात दगडाची पेरणी!
Next articleबियाण्यांची थैली, बिलावर शिक्के!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here