शेत माझं लई तहानलं चातकावानी…!

0
197

जिल्ह्यात 50 टक्के पेरण्या, येत्या 48 तासांत पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: ‘पड रं पान्या, पड रं पान्या, कर पानी पानी, शेत माझं लई तहानलं चातकावानी…’ प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे लोकगित अक्षरशः काळजाचा ठाव घेतं. अकोला जिल्ह्यातील शेतकरीही गेल्या दहा दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाची अशीच चातकाप्रमाणे वाट पहात आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या एकूण नियोजित क्षेत्रापैकी  50 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तथापि, पावसाने ओढ दिल्याने नुकतेच उगवण होत असलेल्या वा वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. येत्या ४८ तासांत पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी सध्यातरी जिल्ह्यातील शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत  सुमारे 95 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तथापि, अकोला जिल्ह्यातील 25 महसूल मंडळात  75 मि.मी. पेक्षाही कमी पाऊस झाला आहे.  75 ते 100 मि.मी पाऊस झाल्याशिवाय शेतक-यांनी पेरण्या करु नये अशी शिफारस कृषी विभागाने केलीही होती, मात्र मध्यंतरी पावसाचे ब-यापैकी आगमन झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या. आणि जिल्ह्यात पेरण्यांनी वेग घेतला.

जिल्ह्यात अद्याप 50 टक्केच पेरण्या
यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आता सद्यस्थितीत जिल्ह्यात अकोला तालुक्यात एक लाख 9 हजार 751 हेक्टरपैकी 48 हजार 461 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. (सरासरीच्या 44 टक्के), अकोट तालुक्यात  71 हजार 268 हेक्टरपैकी 27 हजार 817 हेक्टर (39.03 टक्के), बाळापूर तालुक्यात  60 हजार 809 हेक्टरपैकी 31 हजार 214 हेक्टर (51 टक्के),  तेल्हारा तालुक्यात 53 हजार 470 हेक्टरपैकी 16 हजार 39 (30 टक्के),  पातुर तालुक्यात  50 हजार 291 हेक्टरपैकी  29 हजार 380 हेक्टर (58 टक्के),  बार्शीटाकळी तालुक्यात 64 हजार 851 हेक्टरपैकी 47 हजार 245 हेक्टर (73 टक्के) तर मुर्तिजापूर तालुक्यात 72 हजार 698 हेक्टर (62 टक्के) असे एकूण जिल्ह्यात 4 लाख 83 हजार 141 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 45 हजार 740 हेक्टर क्षेत्रावर (50.86 टक्के) पेरण्या झाल्या आहेत.

सध्याची पिकस्थिती
कृषी विभागाच्या पाहणीनुसार, कापूस ह्या पिकाची वाढीची अवस्था आहे. तर सोयाबीन हे पिक काही ठिकाणी उगवणीच्या तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत आहे. त्याच प्रमाणे मूग, उडीद या सारखी पिकेही वाढीच्या अवस्थेत आहे. तूर अद्याप उगवणीच्या अवस्थेत आहे. पावसाने ताण दिल्याने सर्वच ठिकाणी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. जेथे तुषार वा ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित सिंचन करण्याची व्यवस्था आहे तेथे शेतकरी पिकांना जगविण्यासाठी धडपडत आहेत.

कृषी विद्यापीठाच्या शिफारशी
पावसाअभावी ताण पडलेल्या पिकांना  शक्यतो तुषार सिंचन पद्धतीने संरक्षित सिंचन करावे, हे सिंचन करतांना ते दुपारी चार नंतर करावे. जेणे करुन बाष्पिभवन टाळता येईल व पाणी पिकांना पूर्ण मिळेल. तसेच पिकांच्या पानांवर  ग्लिसरॉल 50 मि.ली. अथवा पोटॅशियम नायट्रेट 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून बाष्पीभवन रोधक फवारणी करावी, अशा शिफारशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी सांगितले.
येत्या ४८ तासात पुनरागमनाचा अंदाज
हवामान विभागाच्या अनुमानानुसार येत्या 48 तासात विदर्भात पावसाचे पुनरागमन होणार आहे. तसेच 10 जुलैपासून विदर्भात चांगले पर्जन्यमान होण्याचे अनुमान वर्तविण्यात आले असल्याचेही डॉ. खोत यांनी सांगितले. तरी शेतक-यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहनही डॉ. खोत यांनी केले आहे.

Advertisements
Previous articleसारीमुळे अकोल्यात 20 जणांचा मृत्यू 
Next articleजिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी अर्चनाताई बोरे, तर सचिव विद्याताई जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here