वास्तविकता जगणारा असामान्य माणूस म्हणजे “उद्धव ठाकरे”

0
188

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस…

व-हाड दूत न्यूज नेटवर्क

‘उद्धव ठाकरे’ हे कधीच गलिच्छ राजकारणातील पुढारी नव्हते आणि नसणार, याचा दाखला उद्धव ठाकरे शासनात सक्रीय होण्यापूर्वी आणि दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही मिळाला आहे. त्यामुळे वास्तविकता जगणारा असामान्य माणूस म्हणजे “उद्धव बाळासाहेब ठाकरे” होय. आज त्यांची एकसष्ठी… त्यानिमित्याने हा लेखप्रपंच.
शासकीय नियमानुसार निवृत्तीचे वय राज्यात 58 तर केंद्रात 60 असते. 61 वा वाढदिवस हा त्या अर्थानेच महत्त्वाचा समजला जातो. आयुष्याच्या घोडदौडीमध्ये आपण काय कमवून बसलो आणि काय गमवून बसलो, याचा मागोवा घेवून चिंतन करण्याचा हा दिवस असतो. त्यामुळे 61 व्या वाढदिवसाला सर्वार्थाने महत्त्व आहे. सर्व कामातून निवृत्ती घेवून वैयक्तिक जीवन जगण्याचा हा कालखंड संबोधला जातो. अश्यातच आपणास वयाच्या निवृत्तीच्या वेळेला कार्यरत होण्याची नामी संधी आली आणि आपण ती बखुबी पार पाडत आहात असे अभिमानाने नमुद करावसे वाटते.

महाराष्ट्राच्या उदयापासून म्हणजेच 1955 च्या सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून तर 1 मे 1960 या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या कालखंडापासून तर आतापर्यंत झालेले राज्यातील राजकारण हे यापुर्वी कधीही न घडलेल्या घटनांमुळे ऐतिहासिक ठरले आहे. या राजाकारणाचा केंद्रबिंदू हा आपल्या पक्षाभोवती स्थापित होता. त्यामुळे सहाजिकच संपूर्ण भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष मुख्यमंत्रीपदाकडे लागले होते. 2019 च्या निवडणुकीनंतर आलेले अपघाती मुख्यमंत्रीपदाचे शिवधनुष्य कोण पेलणार यासाठी संपूर्ण जनता उत्सुक होती. कारण देशाची आर्थिक राजधानी असणारी महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ आणि तेथील मंत्रालयाच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार ? यासाठी राजकीय पक्षांचे दिवसरात्र मंथन सुरू होते. वेगवेगळे प्रयोग, चर्चा, घटना, भेटीगाठी होणे सुरू होते. अशातच अफवांचे पेव सातत्याने फुटत होते. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बळकाविण्यासाठी साम, दाम, दंड, भेद असे अनेक प्रयोग करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या राजकीय इतिहासात कधीही घडली नाही अशी घटना अचानक घडली. सर्व वृत्तपत्रांच्या छापून आलेल्या मुखपृष्ठावरील बातम्या खोट्या ठरल्या. कोंबड्याने बाग देण्याच्या वेळेला शपथवधीचा बिगुल वाजला आणि राज्य खडबडून जागे झाले. देशाच्या राजकारणात महाराष्ट्रात आलेल्या या भुकंपाचे तीव्र झटके अनुभायला मिळाले. उद्धवसाहेब आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हे उकरून काढणे योग्य नाही. हे सर्वश्रुत आहे. पण झालेल्या गंभीर घटनेचा आपल्यावर कोणताही परिणाम झाला नाही याचे गंभीर्य अधोरेखीत व्हावे म्हणून वरील प्रसंग कोणाचेही नाव घेता लिहिला आहे.
अश्या परिस्थिती आणि व्यक्तींवरही मात करुन मोठ्या थाटात आपण शपथविधी करत मुख्यमंत्रीपदावर आरुढ झाले. हा दिमाखदार सोहळा संपूर्ण महाराष्ट्रीयन माणूस जगभरात बघत होता. विरोधकांनी या आघाडीला अभद्र म्हणून टिका करण्याची एकही संधी सोडली नाही. संधी नसतानाही कुरापती करण्याच्या सर्व क्लुप्त्या विरोधकांनी वापरून घेतल्या.

राज्याच्या कारभाराची गाडी हाकायला सुरुवात झाली असताना कोरोना महामारी आली. जी अद्यापही सुरुच आहे. मातोश्रीच्या दालनात आपल्या शिवसेना पक्षाचा आलेख उंचावण्यासाठी आपण करीत असलेली दैनंदिन कामगिरी वेगळी होती. तरी पण आता मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी सफल आणि व्यापक कामगिरी करत आहात. शिवसेना पक्षापुरता विचार आता सहज एकांगीपणे करणे या व्यापामुळे शक्य नाही. तरीही अत्यंत प्रभावीपणे आपण राज्याच्या कारभाराचा डोलारा असे दोन्ही समर्थपणे सांभाळत आहात.

विघ्न जरी राज्याची पाठ सोडत नसले तरी आपण राज्यातील जनतेला पोटाशी धरून त्याचा सांभाळ करण्यात तसुभरही कमी केली नाही. अत्यंत संयमी, शांत आणि वास्तववादी अशाच विशेषणाने आपला स्वभाव अलंकृत केला जातो. “उद्धव बाळासाहेब ठाकरे” या नावाला अधीक व्यापक सामाजिक आणि लोकाभिमुख वलय येण्यासाठी आपण कधीच अवाजवी घोषणा केल्या नाहीत किंबहुना त्या करण्याचे टाळता. आज महापुरानंतर महाराष्ट्राला परत जोमाने उभे करण्यासाठी आपण जी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहात, ते येणार्‍या काळात दिसून येणारच आहे.

इतिहाससुद्धा आपल्या विना अनुभवीय राजकीय कारकर्दीला स्वर्णाक्षरात स्वर्णपानावर लिहिल्याशिवाय राहणार नाही. आपले सरकार पाडण्यांसाठी विरोधकांनी आपल्या सहकारी पक्षांना त्यांच्या आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना तन मन धनाने त्रास देण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व कुश्चीत कारवाया सुद्धा इतिहासात नोंदविल्या जाणार आहेत. मुंबईला कमकुवत करण्यासाठी वापरण्यात आलेली कुबुद्धी सुद्धा महाराष्ट्र विसरणार नाही. येथील चांगले प्रकल्प आपल्या केंद्रीय शक्तीचा वापर करत इतरत्र पळवून लावणे हे सुद्धा कायम स्मरणात राहील. आपले मुख्यमंत्रीपद खारीज होवून महाआघाडी सरकार ऐनकेन प्रकारे पाडण्यासाठी विरोधांकडून वापरण्यात येणार्‍या अघोरी केंद्रीय संस्थांची शक्ती सुद्धा हीन झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव सन्मानाने घेतले जात होते आणि भविष्यातही ते घेतले जाईल यासाठी आपण जी व्रतस्थ होवून लोकाभिमुख कारभाराची भूमिका घेत आहात तोच खरा दाखला म्हणावा लागेल. शिवसेनेसोबत असणार्‍या मित्र पक्षांना सुद्धा आपण दुजाभावाची जाणीव होवू देत नाही हेही तितकेच उल्लेखनीय. आपल्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यापर्यंत आपल्या राज्यावर आपल्या अखत्यारित कायम भगवा फडकत राहो, ह्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनपासून आलेल्या भावनारुपी आशीर्वादाच्या शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!

संजय कमल अशोक
पत्रकार, दैनिक मातृभूमि, अकोला
मो.क्र. 7378336699

Advertisements
Previous articleअतिवृष्टी झालेल्या भागात कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी
Next articleगाव कृती आराखडे तयार करण्यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here