पौष्टिक अन्नधान्य पिकवणे काळाची गरज – कुलगुरू डॉ. विलास भाले

0
154

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला. कृषिप्रधान संस्कृती जोपासणा-या आपल्या देशाने आंतरराष्ट्रीय पटलावर शेती आधारित अनेकानेक उत्पादने प्रसारित करीत परकीय चलनाची प्राप्ती केली असून पारंपारिक पिकांची शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली लागवड देशातील जनतेचे आरोग्य राखण्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे वतीने आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023 चे उद्घाटन प्रसंगी देशपातळीवर आयोजित पोषण वाटिका महाअभियान व वृक्षलागवड उपक्रमाचे आभासी माध्यमातून प्रसारण व स्थानिक शेतकरी, कृषि कन्या यांचे करिता पोषण संवेदनशील शेती आणि पारंपरिक भरड धान्याचे पोषणमूल्य या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी कृषी महाविद्यालयाच्या कमिटीत सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कोविड महामारी सारख्या अतिशय बिकट परिस्थितीत सुद्धा देशांतर्गत शेतकरी बंधू-भगिनींनी  अन्नधान्य, भाजीपाला, दूध-दुभते पिकवून शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचवत आपल्या सेवाभावाचा आणि अन्नदाता वृत्तीचा परिचय दिला. आता बदलत्या परिस्थितीनुसार अधिक पौष्टिक मूल्य असलेले पारंपरिक अन्नधान्य जसे ज्वारी, बाजरी, कोडो, कुटकी, भगर, राजगुरा आदी भरड धान्य भावत असून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अधिक उत्पादन वाढीसह शहरी तथा ग्रामीण भागातील जनतेला अधिक सकस व पौष्टिक अन्नधान्य पुरवीणे  सर्वार्थाने लाभदायी ठरणार असल्याचे सांगताना डॉ. भाले यांनी भरड धान्याचे आरोग्यदायी महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर विस्तार शिक्षण संचालनालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ.विनोद खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांचे मार्गदर्शनात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रमोद वाकळे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, प्रमुख संपादक, प्रा. संजीवकुमार सलामे, माहिती अधिकारी, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. किशोर बिडवे, विस्तार प्रशिक्षण अधिकारी, डॉ. सुहास मोरे यांचेसह विस्तार शिक्षण संचालनालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गानी अथक परिश्रम घेतले.

शेतकरी कल्याण विभागाचे मंत्री तोमर यांनी साधला संवाद
आभासी माध्यमातून देशभरातील कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे व इतर संस्थांमध्ये उपस्थित शेतकरी बंधू -भगिनी, कृषि कन्या व कृषि क्षेत्राशी निगडित शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी वर्गाशी संवाद साधताना भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे केंद्रीय मंत्री ना. नरेंद्र सिह तोमर यांनी भारत सरकारच्या प्रयत्नांचे फलस्वरूप युनाइटेड नेशन द्वारे आगामी वर्ष 2023 हें आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष म्हणून साजरे होणार असल्याचे सांगताना या उपक्रमाची देशांतर्गत सुरुवात आजपासून होतं असल्याचे आपले मनोगतात जाहीर केले व आगामी काळात गावोगावी अधिक पोषक धान्य निर्मिती करीत जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची गरज प्रतिपादित केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण विद्यापीठातील कृषि महाविद्यालयच्या समिती सभागृहात करण्यात आले.
विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे याप्रसंगी आयोजित स्थानिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले होते तर शेतकरी प्रतिनिधी मधुकर सरप, विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, प्रभारी अधिष्ठाता, उद्यानविद्या विभाग डॉ. अरविंद सोनकांबळे यांचे सह आयोजक संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती तर यवतमाळ येथील जेष्ठ सेंद्रिय शेती पुरस्करते शेतकरी श्री. कमलकिशोर धीरण, श्री. कुंवरसिह मोहने, पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक श्री. संघपाल वाहूरवाघ, सौ. विद्या आकोडे, ग्राम तिवसा सरपंच श्री. गजानन लुले यांचेसह परिसरातील शेतकरी बंधू भगिनी, कृषिकन्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पोषण वाटिका व आरोग्यदायी, फळदायी वृक्ष लागवड उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी साठी विद्यापीठ तत्पर असल्याचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांनी उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना अवगत केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधत उपस्थित शेतकरी बंधू – भगिनींना ज्वारी, भरड धान्य, फळ रोपं, भाजीपाला बियाणे प्रतिनिधिक स्वरूपात मा. कुलगुरु आणि इतर मान्यवरांचे शुभ हस्ते वितरित करण्यात आले तथा उपस्थिताना पोषक भरड धान्याचा सकस नास्ता व फलहार देण्यात आला. कार्यक्रमाचे तांत्रिक सत्रात भरड धान्याचे मानवी आरोग्यात महत्व या विषयावर कृषि विद्या विभागाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावर तर शाश्वत ग्रामीण उपजीविकेसाठी शेतीमध्ये वृक्ष लागवडीचे महत्व या विषयावर वनविद्या महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी उपस्थित शेतकरी बंधू – भगिनींना सादरीकरणासह मार्गदर्शन केले.

Advertisements
Previous article“खाकीतील” कर्तव्यनिष्ठेच्या वर्षपूर्तीला सॅल्यूट! एसपी अरविंद चावरिया ठरताहेत गुन्हेगारांचे कर्दनकाळ!
Next articleअकोल्यात मुलींचा जन्मदर वाढला, हजार मुलांमागे ९७२ मुलींचा जन्म

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here