मंगेश फरपट
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कुटासा दहीहंडा रोडवर दोन दिवसीय राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत व शंकर पटाचे आयोजन आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. अनेक वर्षानंतर या भागांमध्ये शंकर पट होत असल्याने नागरिकांचा मोठा प्रमाणात उत्साह बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी होत आहे.
शनिवारी दि. 19 मार्चरोजी बैलगाडा शर्यतीचा प्रारंभ आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर, जिल्हा महासचिव आनंद वानखडे , जिल्हा उपाध्यक्ष परिमल लहाने, कुटासा सरपंच अनंत लाखे, उपसरपंच ओमकारराव रामागडे, ग्रामपंचायत गटनेते शाम राऊत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी हिंगोली यवतमाळ औरंगाबाद सह मध्य प्रदेशमधून बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला.
कुटासा पंचक्रोशीत अनेक वर्षांनंतर शंकर पट होत असून केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीवर निर्बंध घातले होते मात्र नुकतेच हे निर्बंध निघाल्याने आता कुटासा दहीहंडा पंचक्रोशी मध्ये बैलगाड्यांचा भिर्र आवाज दनानला असून शंकर पट पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
शंकरपटाचा समारोप रविवार, 20 मार्च रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परिसरात शंकर पट झाल्याने शेतकरी व गावक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शंकर पटाच्या यशस्वीतेसाठी कुटासा व दहीहांडा परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले आहेत. यावेळी शंकर पटाच्या निमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनेसंदर्भात माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहेत.