विविध विषयांचा आढावा व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा केला गौरव
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: येथील पंचायत समितीतर्फे आज आमसभा व सरपंच शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर हे होते. यावेळी पंचायत समिती प्रशासनाने विविध विषयांचा आढावा व माहिती सादर केली तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज दि. २७ मार्चरोजी आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई भोजने, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, पं.स. सभापती राजेश वावकार, उपसभापती आनंदराव डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, शंकरराव इंगळे, सुशांत बोरडे, श्रीमती पुष्पा इंगळे, आशिष वाटकर, पंचायत समिती सदस्य श्रीमती सुषमा ठाकरे, मंगला शिरसाठ, सचिन थोरात, छायाताई वानखडे, तहसिलदार सुनिल पाटील, गटविकास अधिकारी राहुल शेळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. या आमसभेत पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने विविध योजनांबाबतची माहिती तसेच अंमलबजावणीबाबतची सद्यस्थितीदर्शक माहिती सादर करण्यात आली. यावेळी कापशी ग्रामपंचायतीला सन 2020-21 आर आर पाटील सुंदर ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्ह्यात प्रथम तसेच कर वसुलीचे उत्कृष्ट काम याबद्दल गौरविण्यात आले. तर वृक्ष लागवड व संवर्धनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी म्हातोडी ग्रामपंचायत, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची थकबाकीसह 80 टक्के वसुली केल्याबद्दल गोपालखेड ग्रामपंचायत व वडद बु. या ग्रामपंचायतीने 90 टक्के करवसुली केल्याबद्दल गौरविण्यात आले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी केले. या कार्यक्रमास अकोला तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य आदी उपस्थित होते.
अकोला पंचायत समितीची आमसभा व सरपंच शिबीर उत्साहात संपन्न
Advertisements