बोगस दस्ताऐवजाच्या आधारे फसवणुक; ‌विवेकानंद आश्रम हिवरा बु. चे उपाध्यक्ष अशोक पाध्ये यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

0
114
  • अकोला महापालिकेतून फाईलही गहाळ, दोषी अधिका-यांवरही कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागणी
    – विजय शर्मा यांची सिटी कोतवाली पोलिस ठाण्यासह जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरात दररोज भ्रष्टाचाराचे नवनवीन प्रकार उघडकीस येत आहेत. अकोला महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधन कार्यालय या सर्व सरकारी कार्यालयाचे कार्य हे एक दुसऱ्याच्या कागदपत्रांच्या आधारे चालते. परंतु त्या कागदपत्रांची सत्यता हे यामधील एकही कार्यालय तपासून पाहत नसल्याचा अफलातून प्रकार उघड झाला आहे. असाच एक प्रकार स्थानिक सुधीर कॉलनी स्थित विवेकानंद आश्रमाचा बाबतीत सुद्धा घडला आहे. याप्रकरणी मुळ दस्तऐवजामध्ये खोडतोड करून विवेकानंद आश्रम हिवरा बु. चे उपाध्यक्ष अशोक पाध्ये यांनी शासनाची दिशाभूल केली आहे. याशिवाय महापालिकेच्या अधिका-यांना हाताशी धरून कागदपत्रांची फाईलच गहाळ केल्याची तक्रार आज २७ मार्चरोजी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या तक्रारीची प्रत अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्याकडेही सादर करण्यात आली आहे.
यामध्ये मुळ मालक विजय विश्रामजी ढवळे यांनी १७ जानेवारी १९७३ रोजी रजिस्टर्ड दानपत्राद्वारे 6030 चौ. फुटाचा प्लॉट दान दिला होता व त्यासोबत 6030 चौ. फुटाचा नकाशा सुद्धा जोडला होता. व त्यांच्या मालकीचा असलेला उर्वरित प्लॉट अंदाजे 9000 चौ. फुट हा प्लॉट विजय शर्मा व ज्ञानेश्वर सुलताने यांना मालकी हक्काने विकला होता. परंतु या प्रकरणामध्ये विवेकानंद आश्रम हिवरा या संस्थेचे उपाध्यक्ष अशोक विष्णुपंत पाध्ये यांनी कागदपत्रांमध्ये हेरफेर करुन संस्थेला दानमध्ये मिळालेला 6030 चौ. फुटाचा प्लॉट हा 13800 दाखविला त्याकरिता त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील दानपत्रासोबत जोडलेल्या नकाशात सदर कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन 6030 ला खोडतोड करुन 13800 चौ. फुट दाखविला व त्यानंतर भूमि अभिलेख कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करुन 13800 फुट प्लॉटची मोजणी सुद्धा करुन घेतली. त्यानंतर हीच बनावट कागदपत्रे अकोला महानगरपालिकेकडे सादर करुन २० नोव्हेंबर २००८ रोजी बांधकाम परवाना सुद्धा मिळवून घेतला. ह्यावर मुळ मालक यांनी आक्षेप घेतला असता तत्कालीन आयुक्त यांनी सदर संस्था आपला मालकी हक्क स्पष्टपणे सिद्ध करु शकली नाही असा शेरा देत बांधकाम परवाना रद्द सुद्धा केला. परंतु संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये यांनी बांधकाम परवाना रद्द झाल्याचा आदेश लपवून बांधकामाचा आदेश हा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करुन सदर प्लॉटच्या नोंदीविषयी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणाचा निकाल हा आश्रमाच्या बाजुने लावून घेतला. सदर प्रकरण हे आपल्या अंगाशी येत असल्याचे पाहून ह्यातील दोषी मनपाचे कर्मचारी, अधिकारी व अशोक पाध्ये यांनी मनपातील बांधकाम परवान्याविषयीची संपूर्ण कागदपत्रे असलेली फाईलच गहाळ केली. याविषयी तत्कालीन आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे तक्रार सादर केली असता सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे या प्रकरणामध्ये कारवाई करता येत नसल्याचा निष्कर्ष देवून अकोला मनपातील दोषी कर्मचारी, दुय्यम निबंधक कार्यालयातील दोषी अधिकारी व अशोक पाध्ये यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश न देता त्यांची पाठराखन केल्याचा आरोप केला आहे.
सदर प्रकरणी विजय शर्मा यांनी या आधी सुद्धा सिटी कोतवाली अकोला येथे दुय्यम निबंधक कार्यालयातील नकाशात खोडतोड प्रकरणी तक्रार दिली होती. तसेच २७ मार्च २०२२ रोजी महापालिकेतील बांधकाम प्रकरणाची फाईल क्र. 14/383/08-09 आदेश दि. 20/11/2008 या गहाळ प्रकरणी तक्रार सिटी कोतवाली अकोला येथे दाखल केली आहे. या प्रकरणी मागील तक्रारीचा अनुभव पाहता पोलीस विभाग या प्रकरणी काही कारवाई करीत नसल्यामुळे आता विजय शर्मा यांनी अकोला न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

Advertisements
Previous articleअकोला पंचायत समितीची आमसभा व सरपंच शिबीर उत्साहात संपन्न
Next articleजगाला निरामय करण्यासाठी होमिओपॅथी काळाची गरज : होमिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. संदिप चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here