कोरोना होतो तेव्हा…

0
266

जाणून घ्या,

सकाळ मीडिया ग्रुप च्या रिसर्च ॲनलिस्ट सौ. शीतल पवार मॅडम यांचा कोरोनाबाबतचा अनुभव… 

डिसेंबर-जानेवारीत चीनमधील कोरोनाच्या बातम्या येत होत्या. तेव्हा एका मित्राला म्हटलं की हा व्हायरस भारतात येऊ शकतो का? आला तर काय होईल? वगैरे… आणि बघता बघता तो व्हायरस भारतातच काय तर राज्यात पुणे-मुंबईसकट प्रत्येक शहरात, गावागावांत आज थैमान घालतोय. ऑगस्ट महिन्यात हा कोरोना आपल्या शरीरातही आलाय, असं समजलं तेव्हा खरंच पायाखालची जमीन सरकली.

मी टेस्ट का केली?

जूनपासून ऑफिसला जायला सुरुवात झाली. मी दररोज ऑफिसला जात होते. मास्क, सॅनिटायझर आणि इतर काळजी घेतली तरी कामानिमित्त सतत वेगवेगळ्या लोकांशी भेटी होत होत्या. त्यातच पाऊस सुरु झाला. दरम्यान थकवा जाणवू लागला. सुरुवातीला वाटलं की कामाचा ताण असेल. पण काही दिवसांतच जिभेची चव गेल्यासारखं वाटलं. त्यादिवशी अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घेऊन मी ब्लड टेस्ट केली. रुटीनमध्ये सर्व नॉर्मल होतं, कॅल्शियम वगळता. त्यामुळे कोरोना टेस्ट करायची की नाही यावर डॉक्टरांशी बोलावं असं ठरलं. पुढच्या दोन दिवसांत मला थोडा खोकला यायला लागला. तेव्हा टाळाटाळ करण्यापेक्षा खाजगी लॅबमध्ये टेस्ट करायचं ठरलं. दुसऱ्याच दिवशी स्वाब टेस्ट केली. (त्यासाठी आधार कार्ड लागतं.) रिपोर्ट २४ तासांनी येणार होता.

रिपोर्ट आणि आयसोलेशन

दुसऱ्या दिवशी रविवार. निवांत सुट्टीचा दिवस. आठवड्याचा बाजार, भाजीपाला सकाळीच डिलिव्हर झालेला. तो सॅनिटाईझ करून घरात ठेवला. दुपारी मी आणि आईने एकत्र गप्पा मारत भाजीपाला निवडला. अजून रिपोर्टचा इमेल आलेला नव्हता. त्यामुळे रात्री मीच स्वयंपाक करेन असं मी आणि आईने ठरवायला आणि रिपोर्ट यायला एकच वेळ पडली. रिपोर्ट आला आणि मी कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. आता पुढे काय? या विचाराने पहिली १५/२० मिनिटं खूपच गोंधळात गेली.

मी तातडीने घरातंच स्वतंत्र खोलीत गेले. तिकडेच अंथरूण पांघरुण, जेवणाचं ताट/वाटी/चमचे/पेला, बाटली-पाणी, कपडे, डेटॉल आणि इतर सॅनिटेशनच्या वस्तू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर सोबत घेतलं. आई स्वाभाविकच पॅनिक होती. तिला मी दाराच्या आतूनच फोनवरून शांत रहा वगैरे सूचना केल्या. डॉकटरांशी बोलून पुढंचं ठरवूयात असं ठरलं.

त्यांनंतर सगळ्यात आधी फोन लावला तो सोसायटीच्या मॅनेजरला. त्यांनी समजून घेतलं. सहकार्याची पूर्ण हमी दिली. आवश्यक वस्तू वॉचमन दारापर्यंत आणून देतील, असं आश्वासन दिलं. कचऱ्याची सोयही मार्गी लावली. मग मी डॉक्टरांना फोन केला. त्यांनी प्रोटोकॉल समजावून सांगितला. होम आयसोलेशनची प्रोसिजर सांगितली. माझ्या लक्षणांनुसार किरकोळ औषधं सांगितली. तोवर रात्री बराच उशीर झालेला. जेवण वगैरे आटोपून बाकी उद्या बघू असं ठरवून झोपी गेले.

सोमवारी आयसोलेशन प्रक्रियेसाठी गडबड सुरु झाली. यात प्रोसेस खूप विचित्र आहे. म्हणजे पेशन्टनी कोविड सेंटरला यायचं. आता हे सेंटर कुठे आहे हे सर्वसामान्यांना माहिती नसतं , मनपावाले फोनवर सांगतात पण गोंधळ उडतोच. त्या सेंटरवर जाऊन चेकअप, फॉर्म आणि फॉरमॅलिटीज पूर्ण करायच्या मग तुम्हाला घरी राहता येतं वगैरे. यात हे सेंटरला जाण्याचं लॉजिक पटलं नाही पण नंतर डॉ. भोंडवेंनी मला त्याची आवश्यकता वगैरे समजावून सांगितलं. कसबसं ते पूर्ण करून मी Dr Avinash Bhondwe यांनाच माझे कन्सल्टंट म्हणून रजिस्टर केलं. (म्हणजे एका प्रोसेसनंतर डॉक्टर रजिस्टर करतात. त्यांनाही आधार कार्ड आणि इतर माहिती लागते. तसंच एक कोविड निगेटिव्ह असलेला केअर टेकरही नोंदवावा लागतो.) तब्ब्ल ३ दिवस लागले हे सगळं पूर्ण करून घ्यायला. दरम्यान माझा एक्सरे, घरच्यांची टेस्ट करून घेतली. त्यांचे रिपोर्ट येईपर्यंतचे ३/४ दिवस खूप तणावाचे गेले. त्यामुळे अधिकच थकवा जाणवू लागला. औषधं, गोळ्या आणि डॉक्टरांचं डेली कन्सल्टेशन सुरु झालं. सोबत मनपा आणि पोलीस कार्यालय असे दोन्हीकडून फोन सुरु झाले. ट्रेसिंग आणि औषधं, प्रोटोकॉल वगैरे सूचना ही मंडळी सांगतात. शेवटच्या काही दिवसात काही ऑटोमेटेड कॉलही येतात. त्यावर आपण दिलेल्या अभिप्रायानुसार मनपाचे डॉक्टर फोन करतात. या फोनवर ते सर्व बेसिक माहिती देतात, आपली लक्षणं आणि सर्व माहिती समजून घेऊन आवश्यक सूचना अगर औषधंही सांगतात.

ते १४ दिवस

वैयक्तिक अनुभव सांगायचा तर सुरुवातीचे काही दिवस प्रचंड भीती आणि anxiety ने भरलेलं राहिले. सारखं वाटायचं आपल्याला काही होईल का? आपल्यामुळे उगाच घरच्यांना त्रास वगैरे. या सगळ्यात डॉक्टर आणि माझे ‘सकाळ’चे सहकारी यांची खूप महत्वाची भूमिका राहिली. सहकाऱ्यांनी मानसिक सपोर्ट खूप दिला. या दिवसात त्याची सगळ्यात जास्ती आवश्यकता असते. ‘काळजी करू नका आणि काळजी घ्या’ बस इतकंच म्हणणं पुरेसं असतं. त्याबाबत मी भाग्यवान होते, असंच म्हणायला हवं.

डॉक्टर भोंडवेना रोज सकाळी अपडेट द्यावा लागायचं. मी म्हणजे आळशी पेशंट. मला रोज फोन करायला हमखास उशीर व्हायचा. पण त्यांनी सांभाळून घेतलं. पहिले ३०/४० सेकंदात रुटीन अपडेट संपल्यावर डॉक्टर हलकंफुलकं बोलून फोन ठेवायचे. आम्हाला चर्चेला संजय राऊतांच्या कंपाउंडर स्टेटमेंटपासून सामाजिक संस्थांच्या कामावर मी लिहिलेल्या फेबु पोस्टपर्यंतचे अनेक विषय मिळाले या दिवसात. लक्षणं खूप सौम्य होती त्यामुळे मी ऑफिसचं घरून होईल तितकं काम सुरुचं ठेवलं होतं. त्यासोबत वाचन, नेटफ्लिक्स आणि फेसबुकवर लिखाणंही सुरु होतं. घरी आई असल्यामुळे खाण्यापिण्याचे हाल झाले नाहीत. बाकी आपली भांडी आपण विसळणं, कपडे धुणं, खोलीची स्वछता वगैरे करत दिवस संपायचा. सोसायटीच्या सहकाऱ्यांनी इतर मदत केल्याने १४ दिवस सुकर गेले.

१४ दिवसांनंतर दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. पुन्हा एकदा ब्लड टेस्ट केली. तीही नॉर्मल होती. मग डॉक्टरांनी कोविड नंतरचा प्रोटोकॉल समजावून सांगितला आणि फोनवरूनच मला आयसोलेशनमधून डिस्चार्ज दिल्याचं सांगितलं.

अनुभव आणि जबाबदारी !
या सगळ्या अनुभवातून जे जाणवलं ते असं…
—-
१) माहितीचा अभाव : माझ्या कामामुळे आणि सहकाऱ्यांमुळे माहितीचा अभाव हा प्रश्न फारसा नव्हता, पण सर्वांच्या बाबतीत असं होत नाही. त्यात व्हॉट्सअप मेसेजचा घोळ सुरु असतोच. होमआयसोलेशनवर #दिनानाथ_मंगेशकर हॉस्पिटलच्या युट्युब चॅनलवर माहितीपर व्हिडीओ चांगले आहेत. Dr. Amol Annadate यांच्या सोशल मीडियावर बरीच माहिती उपलब्ध आहे. डॉ भोंडवेही त्यांच्या फेसबुकवरून महत्वाची माहिती शेअर करत असतात. तरी पब्लिक डोमेनमध्ये पुण्याची स्थानिक माहिती अपुरी पडतेय असं जाणवलं. माहिती नाहीये असं नाहीये पण लोकांपर्यंत पोहचणाऱ्या माध्यमांतून ती दिली जात नाहीये, हे प्रकर्षाने जाणवलं

२) आधार : मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि कोरोनाच्या संसर्गाचा धोका मात्र माणसाला माणसापासूनच लांब रहायला भाग पाडतो. याचा पेशंट आणि त्याच्या कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या नातेवाईक मित्रांपैकी कोणी आजारी असेल तर त्यांना मानसिक आधार द्या. आपल्या सुरक्षिततेसाठी ते आयसोलेट होतात. त्यामुळे त्यांना शक्य असेल ती सर्व मदत करून सहकार्य करा.

३) जाणीव : या आजारावर सतत संशोधन सुरूय. फिक्स असे काही पॅटर्न अजून समोर आलेलं नाहीत. त्यामुळे आपण स्वतःकडे आणि शरीरातल्या बदलांकडे खूप लक्ष द्यायला हवंय. अगदी सौम्य लक्षण असतील तरी टाळाटाळ न करता आपण तातडीने वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.

४) खबरदारी : सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वतः खूप जबाबदारीने वागून संसर्गाचा धोका टाळायला हवा. बाहेर जाणार असाल तर मास्क, सॅनिटायझर वापरणे, घरी परतल्यावर संपूर्ण स्वछता करणे, रोज सकस आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि न चुकता व्यायाम करणे. आपण निरोगी रहाल तरंच कोरोनाचा मुकाबला करू शकाल.

(टीप : हा अनुभव आहे, वैद्यकीय सल्ला नाही)

Advertisements
Previous articleबुलडाणा जिल्ह्यात आज 84 पॉझिटिव्ह
Next articleनांदुरा येथे 17 कोरोना पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here