सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. वसंतभैय्या खंडेलवाल

0
80

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला : शिवर ते रिधोरा पर्यंत अकोला शहरातून जाणाऱ्या जुन्या बायपासचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. आता या रस्त्याच्या मधोमध उंच शोभिवंत झाडे लावण्यात येत आहेत. त्यासाठी आमदार वसंत खंडेलवाल यांनी पुढाकार घेतला आहे. आ. खंडेलवाल यांच्या स्थानिक विकास निधीतून या रस्त्याच्या मधोमध उंच पाम वृक्ष लावण्यात येणार असून सोमवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
अगोदरच प्रशस्त झालेला हा रस्ता आता आणखीच खुलून दिसणार आहे. सोमवारी दुपारी आ. खंडेलवाल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी निमा अरोरा, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, सह. अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, विभाग प्रमुख फुलशास्त्र डॉ. नितीन गुप्ता, आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कामाला प्रारंभ झाला. शिवर येथील मंदिरासमोरून रिधोरा पर्यंत हे सुशोभीकरण करण्यात येईल . रस्त्याच्या मधोमध पाम वृक्षांसह बोगनवेल आणि अन्य वृक्ष रस्त्याची शोभा वाढविणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोरून शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा हा रस्ता या सुशोभीकरनाणे शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणार आहे. 20 फुटांवर एक उंच पाम वृक्ष व त्याच्या मधोमध अन्य लहान शोभिवंत झाडे असे हे नियोजन आहे. या झाडांची उंची आताच 10 ते 12 फूट असून ते 20 ते 30 फुटांपर्यंत वाढणार आहेत.
13 किलोमीटर च्या या रस्त्यात तीनशे मोठी आणि बाराशे अन्य अशी जवळपास दीड हजार झाडांची वृक्षराजी प्रवाशांना आनंद देणार आहे. वृक्षांची चांगली वाढ झाल्यानंतर पाम वृक्षांच्या नावानेच हा रस्ता ओळखला जाणारा आहे. बायपासवर लावलेल्या या सर्व वृक्षांच्या देखभालीची जबाबदारी कृषी विद्यापीठाने स्विकारली असून या झाडांना नियमितपणे पाणी देण्याचे काम महानगर पालिकेची यंत्रणा करणार आहे. यासंबंधीचा करार करण्यात आला आहे. शहराच्या चारही बाजूनी रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या सर्वच रस्त्यांवर असेच सुशोभीकरण करण्यात येईल , त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी आ. वसंत खंडेलवाल यांनी दिली. स्थानिक विकास निधीसह वेगवेगळ्या कंपन्यांचा सीएसआर फंडचाही त्यासाठी वापर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपरोक्त मान्यवरांसह उद्योजक प्रमोद खंडेलवाल, नितीन बियाणी, निखिल अग्रवाल, विजय तोष्णीवाल, मनीष लड्डा, मनोज खंडेलवाल, लक्ष्मीकांत डागा, सुशील शर्मा, अश्विन लोहिया, कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.किशोर बिडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements
Previous articleकृषी विद्यापीठाच्या कायम ऋणात राहील : प्रल्हाद शर्मा
Next articleपोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांची बदली करू नका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here