रस्ते सुरक्षाः स्वतःचे व इतरांच्याही भल्यासाठी

0
17

आजची वाढलेली लोकसंख्या आणि जागतिक स्पर्धा हे मानवाला जीवघेणी ठरत आहे. मनुष्याच्या हव्यास आणि लोभासाठी स्वतःचे प्राण देखील गमावण्यास तयार होत आहे. त्यामध्ये रस्ता सुरक्षा किती महत्त्वाची आहे हा मुद्दा समोर येत आहे. वाढती वाहने आणि प्रदूषण, नको असलेली गर्दी, सर्वांचा एकत्र निवास या गोष्टी अक्षरशः माणसाचा दम काढत आहेत.  सर्व कामकाज आणि उद्योगामुळे शहरीकरणात वाढ होत आहे. याकारणाने तेथील लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गावाकडील लोक देखील शहरात स्थलांतरित होत आहेत. दळणवळण आणि प्रवासासाठी वाहनांची संख्या वाढत आहे. रस्त्यावरून फिरणे कठीण  झाले आहे. याचा परिणामानेच रस्त्यावरील अपघाताची संख्येत वेगाने वाढ होत असून रस्ते अपघातात दगावल्याची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे.

माणूस जवळचे अंतर असले तरी गाडीनेच फिरणे पसंत करतो. त्यामुळे गर्दी मात्र रस्त्यावर झालेली दिसते. मग रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांना त्याचा त्रास होणारच की! रस्त्यावर वाहनांची सुरक्षासुद्धा त्यामुळे धोक्यात येऊ लागली आहे. व्यवस्थित आणि सुरक्षित रस्ता असताना देखील अपघात होतात तर रस्ता खराब असेल तर किती अपघात होत असतील, याचा अंदाज आपण लावू शकतो. याबाबत संपूर्ण देशातील अपघात विषयक माहिती व आकडेवारी एकात्मिक रस्ते अपघात प्रणालीव्दारे संकलीत करण्यात येतो. या प्रणालीव्दारे देशात, राज्यात, जिल्ह्यात तसेच आरटीओ व पोलिस स्टेशन निहाय माहिती प्राप्त होतात.

एकात्मिक रस्ते अपघात प्रणालीव्दारे अकोला जिल्ह्यात विविध कारणाने झालेल्या अपघाताची माहिती याप्रमाणे:

1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये अकोला जिल्ह्यात विविध कारणाने झालेले अपघाताची संख्या 362 आहे. या अपघातामध्ये 145 अपघात गंभीर स्वरुपाचे तर 217 अपघात किरकोळ स्वरुपाचे होते. 362 अपघातामध्ये 414 व्यक्ती जखमी झाले तर 164 जणांचा रस्ते अपघाता मृत्यू झाले. तसेच 1 जानेवारी 2022 ते 20 जुलै 2022 कालावधीत जिल्ह्यातील विविध कारणाने 202 अपघात झाले आहे. या अपघातामध्ये 64 अपघात गंभीर स्वरुपाचे तर 138 अपघात सौम व किरकोळ स्वरुपाचे होते. 202 अपघातामध्ये 209 व्यक्ती जखमी झाले तर 73 जणांचा रस्ते अपघाता मृत्यू झाले आहे.

अपघाताची माहिती एकात्मिक रस्ते अपघात प्रणाली मोबाईल ॲपव्दारेसुद्धा नोंदणी केली जातात. या नव्या तंत्रज्ञानाचा वापरामुळे पोलिसांना अपघात स्थळाची माहिती, अपघाताचे कारणे कळण्यास मदत होत आहे. त्यात जिल्ह्यात वारंवार एकाच ठिकाणी होत असलेल्या अपघातांच्या ठिकाणाला ब्लॅक  स्पॉट संबांधले जाते. ॲपवर नोंदणी झालेल्या या स्पॉटसाठी राष्ट्रीय पातळीवरुन उपाययोजना सूचविल्या जातात. त्यामुळे ब्लॅक स्पॉटची संख्या कमी होण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. तसेच ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला आहे, ते  मोबाईल ॲपवर लगेच दिसेल व अपघातस्थळावर पोहोचणे शक्य होणार आहे. अपघाताचे छायाचित्र, व्हिडीओ ॲपवर अपलोड करतील. सोबतच वाहनांची संपूर्ण माहिती चेसिस क्रमांक, वाहनाचा क्रमांक, चालकाचा परवाना, चालकाचा संपूर्ण माहिती व अपघात कोणत्या कारणामुळे घडला हे सर्व विश्लेषण करुन संबधित अधिकारी-कर्मचारी ही माहिती ॲपवर अपलोड करेल. यामुळे अपघाताची माहिती संबधित पोलिस स्टेशनला प्राप्त होवून मदत कार्य वेगाने केले जातात.  तसेच अपघाताचे कारणे लक्षात येवून अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना केला जातात.

रस्ता सुरक्षा म्हणजे कोणाच्याही जीवावर बेतले जाऊ नये, याचसाठी केलेल्या उपाययोजना! ट्रॅफिकचे नियम हे सर्वांना माहीत पाहिजेत तरच आपण व्यवस्थितरित्या सुरक्षित वाहन चालवू शकतो. मोबाईलवर देखील सर्व रस्ता सुरक्षा नियम वाचू शकता. कुठलेही वाहन असले की त्याची कागदपत्रे, चालक परवाना, इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. यदाकदाचित जर अपघात झाला तर जास्त आर्थिक नुकसान होणार नाही. लहान किंवा 18 वर्षाखालील किशोरवयीन मुलांनी वाहन चालवू नये. चालक परवाना मिळाल्यानंतरच वाहन चालवण्यासाठी घ्यावे नाहीतर स्वतःबरोबर इतर व्यक्तींचा जीव देखील तुम्ही धोक्यात घालू शकता.

ट्रॅफिक पोलिस आणि सरकार हे गर्दीच्या विविध नियमांचे फलक लावत असते. ते फलक आणि त्यावरचे नियम, सूचना या समजल्या पाहिजेत. रस्ते नियमाचे पालन करणे,  स्टॉप सिग्नल आल्यावर थांबणे, कमी वेगात गाडी चालवणे, हॉर्नचा वापर गरजेनुसार करणे, वाहन योग्य गतीने चालवणे आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी न घेणे हे चालकाचे कर्तव्य आहे. रस्ता सुरक्षा त्यामुळे धोक्यात येऊ शकते.  शाळा, मंदिरे, वाचनालये, बागा, जेथे गर्दी जास्त असते अशा ठिकाणी सर्व बाजूंनी बघून, सर्वांची काळजी घेऊन वाहन चालवणे अपेक्षित असते. जर चुकून अपघात झालाच तर त्वरित पोलिसांना कळवावे. रस्ता सुरक्षा ही कोणा एकाची जबाबदारी नाही तर सर्व नागरिकांचे ते कर्तव्य आहे. काळजी जर घेतली नाही तर शारीरिक हानी आणि आर्थिक नुकसान होत असते याचा विचार करावा. सरकार किंवा पोलिस हे सर्व नियम लागू करू शकतात पण ते पाळण्याची नैतिक जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे सुरक्षित वाहन चालवा, व्यवस्थित रस्ता पार करा, आणि सर्व रस्ता सुरक्षेचे नियम पाळा. असे केल्याने स्वतःबरोबर दुसऱ्याचेही प्राण तुम्ही वाचवत असता.


सतिश आनंदराव बगमारे, 
माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

Advertisements
Previous articleअकोला जिल्ह्यात कलम 36 अन्वये स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान: एसपी जी.श्रीधर
Next articleशेतक-यांना त्रास देणा-या कृषी सेवा केंद्राच्या गोदामाची शेतकरी संघटना घेणार झाडाझडती !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here