आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आराखडा तयार करा- डॉ. राजेंद्र शिंगणे

0
131
 • जिल्हा नियोजन समिती निधीचा घेतला आढावा
 • कोविड नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला प्राधान्याने निधी देणार
 • ऑक्सीजन जनरेशन प्लॅण्टची उभारणी करावी
 • एकूण आराखड्याच्या 33 टक्के निधी मिळणार

  बुलडाणा: कोविड आजारामुळे सर्वत्र आरोग्य संकट निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कोरोना सुरक्षा उपाययोजना लागू करण्यात आलेल्या आहेत. अशा अभूतपुर्व आरोग्य संकटाच्या परिस्थितीत शासन आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम करीत आहे. भविष्यात आरोग्य क्षेत्राला अधिकचा निधी देवून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समिती निधीच्या आढावा बैठकीचे आयोजन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. लाड, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पखाले आदी उपस्थित होते.
  कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीचा निधी प्राधान्याने आरोग्य विभागाला देणार असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  कोविड नियंत्रण उपाययोजनांसाठी या निधीचा उपयोग करण्यात यावा. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत ठेवावा लागणार आहे. कुठल्याही प्रकारे ऑक्सीजनची कमतरता पडायला नको. त्यासाठी ऑक्सीजन जनरेशन प्लॅण्टची उभारणी प्राधान्याने करण्यात यावी. याबाबत कालमर्यादा आखून काम पुर्ण करावे. कार्यान्वयीन यंत्रणांना मागील आर्थिक वर्षात काम पुर्ण केले असल्यास स्पील निर्माण झालेल्या कामांसाठी निधी  देण्यात यावा. त्यामुळे त्यांचे दायित्व पुर्ण होईल. नवीन कामांसाठी 4 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपल्या निधीतून रूग्णवाहिका घेण्याची मागणी करीत आहे. याबाबत संबंधीत यंत्रणांनी तातडीने कारवाई करून रूग्णवाहिकेवरील चालक, त्यांचे मानधन  व रूग्णवाहिकेचा मेंटेनन्सबाबत पुढील नियोजन करावे.
  ते पुढे म्हणाले, आरोग्य विभागानंतर जिल्ह्यातील पालकमंत्री पाणंद रस्त्यांना निधी प्राधान्याने देण्यात येईल. शेतरस्ते हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यामुळे पाणंद रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. पाणंद रस्त्यांमध्ये आतापर्यंत कमी कामे झालेल्या तालुक्यांमध्ये ही कामे करण्यात यावी. जिल्हा परिषदेकडील ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी पैसा द्यावा लागणार आहे. गौण खनिज वाहतुकीमूळे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांसाठी गौण खनिज निधीमधून तरतूद करावी. तसेच अशा खराब झालेल्या रस्त्यांची संबंधीत यंत्रणेने यादी द्यावी. महावितरणने मार्च 2018 पर्यंत पेड पेंडीग कृषि वीज जोडण्यांची सुरू असलेली कामे पुर्ण करावी. तसेच जिल्ह्यातील रोहीत्रांची क्षमतावृद्धी जिल्हा नियोजनच्या निधीमधून करण्यात यावी.
  निधी उपलब्धतेनुसार अत्यावश्यक कामांचे नियोजन करण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, रक्तपेढीचे काम पुर्ण करण्यात यावे. रक्तपेढीच्या मजबूतीकरणाची आवश्यकता आहे. दे. राजा येथे सीएसआरमधून रक्तपेढी सुरू करण्यात आली आहे. त्या धर्तीवर बुलडाणा येथे सुरू करण्याबाबत कारवाई करण्यात यावी. कोरोनाच्या लढाईत शासनाचे घटक म्हणून प्रत्येक विभागाने काम करावे. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून शासनाच्या प्रयत्नांना बळकटी द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी केले.
  सभेचे संचलन सहाय्यक नियोजन अधिकारी मोनिका रोकडे यांनी केले. यावेळी संबंधित विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा नियोजनमधून 33 टक्केच निधी

देशात, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे शासनाने प्राधान्याने आरोग्य विभागाला निधी दिला आहे. त्यामुळे जिल्हा नियेाजन समितीच्या एकूण आराखड्यापैकी 33 टक्केच निधी प्राप्त होणार आहे. तसेच या प्राप्त निधीपैकी 50 टक्के निधी आरोग्य विभागाला देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने कोविड नियंत्रण उपाययोजनांसोबतच आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी निधीचा उपयोग करावा. अत्यावश्यक असणाऱ्या कामांसाठी निधी देण्यात येणार असून त्यानुसार यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here