Tuesday, June 22, 2021
Home Blog

बच्चूभाऊ बनले युसुफ खॉ पठाण, शासकीय कार्यालयांच्या झाडाझडतीसह मारले अवैध धंद्यावर छापे!

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: आपल्या अनोख्या कार्यपद्धतीसाठी प्रख्यात असलेले अकोल्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी सोमवारी, 21 जूनरोजी वेशांतर करून अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देवून झाडाझडती घेतली. दरम्यान त्यांनी स्वस्त धान्य दुकान, पानटप-यावर छापे घालत अवैध गुटखाही जप्त केला.
ना. बच्चू कडू यांनी युसुफखाँ पठाण हे बनावट नाव धारण करून आज सर्वांनाच आश्यर्याचा धक्का दिला. सुरुवातीला त्यांनी महानगरपालिकेचा फेरफटका मारला. विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. दरम्यान त्यांनी मनपा समोर सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा यांची आंदोलकांसोबत भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला. पिएने सरकारी उत्तर देत जबाबदारी टाळली. विशेष म्हणजे एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. ते निघून गेल्यानंतर मात्र पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पातूरकडे वळवला. पातूर येथील कलश व एसबी या दोन पानसेंटर येथे गुटखा मागितला. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात गुटखा मागितला. तो दोन्ही पान सेंटर चालकांनी तुम्हाला जितका पाहिजे तितका देऊ, असे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांना दिले. त्यानंतर पालकमंत्री तहसीलमध्ये तिथे रेशनकार्ड तयार करण्यासाठी गेले. तिथे त्यांना नियमाप्रमाणे कागदपत्रे आणा तसे तयार होत नाही, असे सांगत शासकीय यंत्रणेने टाळले. तर त्या तिथून पालकमंत्र्यांनी एका रेशन दूकानाला भेट देत तांदूळ पाहिजे असे म्हटले. पण, राशन दूकानदाराने आता ऑनलाईन व्यवस्था आहे अशा प्रकारे कुठलाही तांदूळ देऊ शकत नाही असे म्हणत नकार दिला. आज जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केलेल्या वेषांतराने शासकीय यंत्रणा चांगलीच धास्तावली आहे. शासकीय यंत्रणा काम करत नसल्याने आज पालकमंत्र्यांना वेषांतराचा करत त्याचा आढावा घेतला आहे. या वेषांतराची चर्चा सर्वत्र सुरु होती.

ना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान!

– सिल्व्हर प्लेट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव
अकोला: राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू हे युट्युबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या प्रत्येक युट्युबवरील व्हिडिओला लाखो चाहते लाईक्स करतात. त्यामुळे युट्युबवर प्रसिद्ध झालेले पालकमंत्री बच्चू कडू यांचा यूट्यूबने सिल्वर प्लेट व एक प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे.
युट्युबचे दोन प्रतिनिधी हे प्रशस्तीपत्र घेऊन अकोल्यात दाखल झाले होते.  जिल्हाधिकारी कार्यालयात हा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत ना. बच्चूभाऊ कडू यांना सन्मानित करण्यात आले.
राजकीय क्षेत्रातील ते राज्यांमधील पहिलेच नेते आहेत, ज्यांना युट्युबने अशा प्रकारे सन्मानित केले आहे. सोशल मीडिया हे घराघरात पोहोचण्याचे उत्तम साधन झाले आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते, उद्योगपती व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे नाव कमविलेल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा मार्ग अवलंबिला आहे. त्या माध्यमातून ते लाखो नेटिझन्सपर्यंत पोहोचतात. ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या प्रत्येक कॉमेंट्सला, व्हिडिओला, फोटोला नेटिझन्स प्रतिक्रिया देत असतात. अशाच प्रकारे राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू हे युट्युबवर सक्रिय आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक्स केले आहे तसेच प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांच्या युट्युबवर 10 लाखांपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. यामुळे युट्युबने त्यांना सिल्वर प्लेट आणि एक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.

निर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू

शाळा सुरू होणार म्हणून मुख्यालयाकडे निघाले होते शिक्षक!

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
बुलडाणा: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेल्या खड्यात कार पडल्याने पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी १३ जूनच्या मध्यरात्री घडली. यामध्ये लोणार तालुक्यातील अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नांवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. चौघेही जण शिक्षक असून ते मुख्यालयी जाण्यासाठी निघाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ते येलदरी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. याकामासाठी रस्त्याच्या बाजूचाच मोठा खड्डा पडला आहे. या खड्डयात रविवारी मध्यरात्री एक कार पडली. खड्डयातील पाण्यामध्ये कार उलटी झाल्याने पूर्णपणे लॉक झाली. त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही अन त्यातच गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, खड्डयामध्ये वाहनाची लाईट दिसत असल्याने काही गावकºयांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक कार त्यात पडलेली दिसून आली. गावकºयांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर सेनगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभयकुमार माकने, जमादार अनिल भारती, शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन गावकºयांच्या मदतीने वाहनातील चारही मृतदेह बाहेर काढले. सदर मृतदेह सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या मध्ये दोन मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधारकार्ड वरून दोघांची नांवे अंकुश गायकवाड, त्र्यंबक थोरवे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरून त्यांच्या लोणार येथील कुटुंबियांशी संपर्क साधला असून ते काही वेळातच सेनगाव येथे येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इतर दोघांकडे ओळखपत्र सापडले नसल्याने त्यांची ओळख पटली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, १५ जूनपासून शाळा सुरु होत असल्याने शिक्षकांना मुख्यालयी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे हे चौघे जण मुख्यालयी उपस्थित राहण्यासाठी जात असावे अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

कोंबड्या घेऊन जाणारे वाहन पूलात लटकले

शेगाव- अकोट राज्य मार्गावरील पुलाचा काही भाग कोसळला;
नवीन पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराने कोरून ठेवला होता जुना पूल

मंगेश फरपट
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा: अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर असलेला शंभर वर्षापूर्वी चा जुन्या पुलावरून शुक्रवारी  सकाळी कोंबड्या घेऊन जाणारे वाहन पुलावरून जात असताना एका बाजूचा भाग अचानकपणे कोसळला.
यामध्ये वाहन पुलावर लटकले आहे. पूल खचल्याने या राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे. सदरील पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. कंत्राटदाराने जुना पूल कोरून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
शेगाव – अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल बांधलेले आहे. मात्र याच ठिकाणी कवठा बॅरेज तयार करण्यात आल्याने या नदीपात्रात पाणी जास्त थांबविल्या जाणार असल्याने जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. मात्र नवीन पूल तयार करीत असतांना कंत्राटदाराने जुन्यापुलाजवळ खोदकाम केल्याने आज सकाळी या पुलावरून एक वाहन कोंबटया घेऊन जात असतांना पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला. या सदरील वाहन नदीत लटकले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. घटनेनंतर जेसीबीच्या साह्याने कोंबड्याचे बोललो हे वाहन काढण्यात आले. मात्र सदरील पुलाचे एक भाग पंपाने ढासळल्याने या राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.

कॉन्व्हेन्ट शिक्षकांवर आली आत्महत्या करण्याची वेळ

शिक्षण विभागाच्या आदेशामुळे निर्माण झाला नवा पेच
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: राजाने मारले अन पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची, याचा प्रत्यय सध्या शिक्षण क्षेत्रात येत आहे. कोरोना महामारीने गेल्या दीड वषार्पासून शाळा बंद आहेत. त्याचा परिणाम जसा विद्यार्थी व पालकांवर झाला तसाच कॉन्व्हेंटच्या शिक्षकांवरही झाला आहे. एकीकडे शासनाने तसेच न्यायालयाने विद्यार्थ्यांकडून फी वसुली करतांना कुठल्याही प्रकारची सक्ती किंवा अडवणूक करू नये असे आदेश दिल्याने शासन न्यायालय, संस्थाचालक, शिक्षक व विद्यार्थी-पालक यांच्यात नवा पेच प्रसंग उद्भवला आहे.
सर्वोच्च न्यायालय दिल्ली व उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार शुल्क भरणा न केल्याने विद्यार्थ्यांची टी.सी, मार्क्स शिट, निकाल व इतर कागदपत्र अडवता येणार नाही व विद्याथ्यार्ला आॅनलाइन क्लासमधून काढता येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. या आदेशाचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहे. स्वयंअर्थसहायित असणाºया कॉन्व्हेन्टचे संपूर्ण व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाºया फीसवर अवलंबून असते. अशात कोरोना महामारीमुळे शाळा बंद असून शिक्षक इमाने इतबारे आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. शासन तसेच न्यायालयाच्या आदेशामुळे कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी प्राप्त होत नसल्यामुळे शाळा व्यवस्थापनाला शिक्षकांचे वेतन देणे कठीण झाले आहे. त्यामुळे विनावेतन काम करणाºया कॉन्व्हेंटच्या शिक्षकांवर उपासमारीला कंटाळून आत्महत्या करण्याची वेळ आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

विशेष आर्थिक पॅकेज घोषित करण्यात यावे
कोरोनामुळे उद्भवलेल्या पेच प्रसंगामुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी व पालक अडचणीत आले असून त्यावर त्वरित मार्ग निघणे महत्वाचे आहे. कॉन्व्हेन्टचे शिक्षक गेल्या दीड वर्षापासून आॅनलाईन अध्यापन करीत आहेत. परंतु विद्यार्थ्यांची फी वसूल होत नसल्यामुळे शाळा व्यवस्थापन वेतन देण्यास सक्षम नाही. त्यामुळे वेतना अभावी शिक्षकांना उपासमार सहन करावी लागत आहे. या परिस्थितीत शासनाने त्वरित तोडगा काढावा यासाठी आपण लवकरच शिक्षण मंत्राची भेट घेणार असून कॉन्व्हेन्ट शिक्षकांच्या वेतनासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करणार आहे.
– प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष

बुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना! मुलाकडून आईवर अत्याचार

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना जिल्हयातील पिंपळगाव सराई येथे ५ जूनच्या रात्री घडली. आईवर ४५ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या फरार आहे.
बुलडाणा रायपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या पिंपळगाव सराई हमाली करणा-या भामट्याने आपल्या ६५ वर्षीय आईवरच अत्याचार केला. पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच घरी असल्याचा फायदा घेत या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले. रविवारी सकाळी आईने रायपूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. या घटनेची वार्ता गाव परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे या भामट्याला मुलगा, मुलगी असून मुलीचे लग्न सुद्धा झाले आहे. बरेच दिवसापासून तो दारुच्या नशेत पत्नीस व आईस मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर आरोपी मुलगा फरार
रात्री दुष्कृत्य केल्यानंतर भामटा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेण्याच्या सुचना ठाणेदारास दिली. मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता. 

जिल्हाधिका-यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट

माजी महापौराच्या मुलाला पैशांची मागणी
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाने तयार केलेल्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून माजी महापौर अश्विनी हातवळणे यांच्या मुलाला पैशांची मागणी करण्यात आली आहे. बनावट फेसबुक अकाऊंट उघडणा-यांची मजल आता जिल्हाधिका-यांपर्यंत गेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांनी पोलिसांना दिली आहे. बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याचे ऐकण्यात आहे. परंतु प्रशासकीय अधिका-यांच्या नावे बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तातडीचे काम असल्याचे सांगत 12 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे पैसे पाठविण्यासाठी गुगल अकाउंटचा क्रमांकही देण्यात आला होता. अकोल्यातील आणखी काही प्रतिष्ठीत व्यक्तींना अशाच पद्धतीने पैशांची मागणी केल्याचे समजते.

बियाण्यांची थैली, बिलावर शिक्के!

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: सोयाबीन बियाण्यांच्या थैलीवर आणि बिलावर शिक्के मारणाऱ्या तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाला जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विकून स्वतःची जबाबदारी झटकणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकाला 14 जून रोजी कृषी अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या केंद्रचालकावर कोणती कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षीपासूनच सोयाबीन बियाण्यांबाबत वादाला तोंड फुटले आहे. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गेल्यावर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही करण्यात आली होती. त्यामुळे  यावर्षी काही कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी पळवाट काढून बियाणे तर विकणार, परंतु जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे उघडकीस आले आहे. थेट बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न विक्रेते करीत आहेत. ‘सदर सोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईन’, असा शिक्का तेल्हारा तालुक्यातील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने मारला आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून बियाणे निकृष्ट निघाल्यास सरळसरळ हात वर करण्याचा आहे. हा प्रकार उघडकीस येताच कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांनी गणेश कृषी सेवा केंद्र चालकास नोटीस बजावली आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी यांना संबंधित कृष्ण सेवा केंद्राचे रेकॉर्ड तपासणीचे आदेश दिले आहे. त्यासोबतच तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित गणेश कृषी सेवा केंद्रचालक यास 14 जून रोजी कृषी अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शाश्वत शेतीसाठी जैविक शेती हाच सर्वोत्तम पर्याय- ना. संजय धोत्रे

अकोल्यात महासंघ ऑरगॅनिक मिशनची स्थापना

योगेेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क

अकोला: रासायनिक शेतीचे दुष्परिणाम जमिनीचे आरोग्य,अन्नधान्य उत्पादन ते मानवी आरोग्यावर व पर्यावरणावरही दिसून येतात. शेतीच्या शाश्वततेसाठी ‘जैविक शेती’हाच सर्वोत्तम पर्याय असून जैविक पद्धतीने उत्पादीत केलेल्या शेतमालाच्या विक्री , प्रचार, प्रसारासाठी स्थापन झालेल्या ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’मुळे ही चळवळ अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास केंद्रीय मानव संसाधन तथा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी व्यक्त केला.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या 37 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन ‘ महासंघ ऑरगॅनिक मिशन’ या नावाने महासंघ स्थापन केला. तसेच त्याच महासंघाच्या मॉम या ब्रॅण्डचीही निर्मिती केली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ना. धोत्रे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य  साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, महासंघ ऑरगॅनिक मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, श्रीमती साधना पोहरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती निरजा, जैविक शेती मिशनच्या सल्लागार वंदना द्विवेदी, श्रीमती बिनिता शहा,  पी.सी. नायडू,  संचाल्क आत्मा किसनराव मुळे,  सेंद्रीय शेतीचे राज्य समन्वयक  कृषी आयुक्तालय पुणे सुनील चौधरी,   प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे,  उपसंचालक अशोक बाणखेले तसेच महासंघाचे शेतकरी सभासद हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
आपल्या ऑनलाईन संबोधनात ना. धोत्रे म्हणाले की, एकेकाळी अन्नधान्याचा तुटवडा असतांना रासायनिक खते, बी बियाणे, किटकनाशके यांचा शेतीत वापर करण्यास सुरुवात झाली.  यामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली खरी मात्र त्याचे दूरगामी दुष्परिणामही झाले. यामुळे शेतीचा भांडवली खर्च वाढला, उत्पादनाचा खर्च वाढला. त्यामुळे शेती फायद्याची रहात नाही. थोडक्यात आज शेती आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते  शेती रासायनिक पद्धतीने करण्यामुळे अधिक आहेत. जमिनीचे आरोग्य उत्तम राखून उत्तम आहार आणि आरोग्यासाठी पोषणमूल्य असलेल्या कसदार अन्नधान्याची निर्मिती करावयाची असेल तर  जैविक शेती शिवाय पर्याय नाही. या शेतीमुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते. पर्यावरणाची साखळी कायम राखून नैसर्गिक पद्धतीने  दर्जेदार मालाचे उत्पादन होते, असे ना. धोत्रे यांनी सांगितले. ते म्हणाले की विदर्भातील सहा  जिल्ह्यांमधील शेतक-यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या महासंघाला पुढे जाण्यासाठी लागणारी सर्व मदत शासनाच्या वतीने करण्यास आपण कटीबद्ध आहोत,याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
ना. धोत्रे यांच्या हस्ते महासंघाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तर श्रीमती निरजा यांच्या हस्ते  व्यापार माहितीपत्राचे  अनावरण करण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती निरजा, जैविक शेती मिशनच्या सल्लागार वंदना द्विवेदी, श्रीमती बिनिता शहा,  पी.सी. नायडू,  संचालक आत्मा किसनराव मुळे,  प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे,  उपसंचालक अशोक बाणखेले यांनी या उपक्रमास ऑनलाईन सहभागातुन शुभेच्छा देऊन मदतीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्प संचालक आरिफ शाह यांनी केले. या कार्यक्रमास  महासंघाचे पदाधिकारी, सभासद शेतकरी उपस्थित होते.

काय आहे महासंघ ऑरगॅनिक मिशन?
महाराष्ट्र शासनाने सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख  जैविक शेती मिशनची स्थापना केली आहे.  या मिशनचे कार्यक्षेत्र असलेले  अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा हे जिल्हे आहेत.  या मिशनने केंद्र शासनाच्या परंपरागत  कृषी विकास योजनेचे अभिसारण करुन 355 शेतकरी गटांची निर्मिती केली. त्यापैकी 10 गटांचा एक समूह व समूहस्तरावर कंपनी कायद्यान्वये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली. या पद्धतीने स्थापन झालेल्या 37 कंपन्यांनी मिळून ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’नावाने महासंघाची निर्मिती केली आहे. या कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या जैविक पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनांचे  प्रचार, प्रसार व विक्री ‘मॉम’ या ब्रॅण्ड नावाने केले जाणार आहे.

7423 शेतकरी सभासद
सद्यस्थितीत 355 गटांमार्फत 7423 शेतकरी  सभासद आहेत. प्रमाणिकरणाखाली एकूण 10 हजार 804 हेक्टर क्षेत्र असून  लाभार्थ्यांचे क्षेत्र 7100 हेक्टर आहे. सभासद शेतक-यांनी मिळून एक कोटी 65 लाख 74 हजार रुपयांचे भांडवल जमा केले असून आता ही कंपनी आपली उत्पादने एकाच ब्रॅण्डने बाजारात आणेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

बुलडाण्यात दगडाची पेरणी!

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात आज 05 जून रोजी आगळवेगळ आंदोलन करून दगडाची पेरणी करण्यात आली.          काही दिवसांवर खरीप पेरणीचा हंगाम येवू ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामाला लागला आहे. तर काही शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहेत. मागील वर्षी विविध संकटाचा सामना करून शेतकºयांनी खरिपाची पेरणी केली होती. वेळेवर वरुणराजाने साथ दिल्याने खरिपाची पिके चांगलीच बहरली होती. परंतु ही पीके काढणीवर येत नाही तोच, आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांची नासाडी केली होती. हातातोंडाशी आलेला घास निसगार्ने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला होता. त्यामुळे शेतकºयांची उरली-सुरली मदार रब्बी पिकावर होती. उसनवारी वेळ प्रसंगी बँका व पतसंस्थांचे कर्ज काढून शेतकºयांनी जवळपास सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी केली होती. रब्बीसाठी पोषक असे वातावरण असल्यामुळे ही पिके सुध्दा चांगलीच बहरली होती. परंतु ही पिके सुध्दा काढणीवर येत नाही तोच मार्च महिन्यात अवकाळी पावसाने सुरूवात करून दिली होती. त्यामुळे बहुतांश रब्बीची पीके मातीमोल झाली होती.
किती करावा संकटांचा सामना!
या अवकाळी पावसामुळे अनेक रब्बी उत्पादक शेतकºयांचा उत्पादन खर्च सुध्दा निघाला नाही. या संकटाचा सामना करीत नाही तोच मागील वर्षापासून कोरोना या जीवघेण्या आजाराने हाहाकार उडवून दिला आहे. लॉकडॉऊन, संचारबंदी, जमावबंदी मुळे बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे घरातील शेतमाल विक्री करण्यास त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यातच खते व बियाण्याच्या वाढलेल्या भरमसाठ किंमती, मशागतीचे वाढलेले दर, शेतमालाला मिळत असलेला कमी हमी भाव यासह इतर संकटांना सामना करीत शेतकरी कंबर कसून यंदाच्या खरीप पेरणीला सज्ज झाला आहे. परंतु त्याला पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे.त्यातच आर्थीक परिस्थिती बिकट झाली आहे. अशातच मागील वर्षी बोगस बियाण्यामुळे आणि अतिवृष्टीची मदत न मिळाल्याने तसेच पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. सध्या पेरणीचे दिवस असताना बियाणे उपलब्ध नाही, तर  जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढल्याने शेतकºयांना यावर्षी पेरणी कशी करावी ?  हा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे.
आर्थीक मदतीची अपेक्षा
त्यामुळे  शेतकºयांच्या या प्रश्नावर  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लोणार तालुक्यात  दगडाची पेरणी करून  शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. स्वाभिमानीच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने जिल्हावासीयांचे लक्ष वेधले आहे.

Recent Posts

© All Rights Reserved
×

Powered by WhatsApp Chat

× How can I help you?